
Pune News : बिबट व मानव यांच्यातील संघर्ष टाळण्याच्या नादात बिबट्याला पकडून इतरत्र स्थलांतरित करण्याचा उपाय फोल ठरला आहे. त्याच्या स्थलांतरामुळे समस्या सुटत नसून उलट ती उग्र होत असते. त्यामुळे बिबट्याच्या अधिवासाला किंवा त्याच्या अस्तित्वाला सामंजस्यपूर्वक मान्यता देणे हाच एक पर्याय आपल्या हाती आहे, असे वन्यजीव जीवशास्त्रज्ञ ऋषिकेश वाघ यांनी सांगितले.
‘एआय’चा वापर स्वागतार्ह
पर्यावरणशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतलेल्या श्री. वाघ यांनी राज्यासह देशातील विविध वन्यजीव अभ्यास प्रकल्पात भाग घेतलेला आहे. मुंबईतील ‘पॉलिसी अॅडव्होकेसी रिसर्च सेंटर’ (पीएआरसी) येथे वन्यजीव संशोधन उपक्रमात विशेष तज्ज्ञ म्हणून ते कामकाज पाहात आहेत. नाशिकच्या भागातील बिबट्यांचा वावर, मेळघाटातील वाघ, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तसेच मध्य प्रदेशातील झलाना अभयारण्यात बिबट्यांचा त्यांनी अभ्यास केला आहे.
‘‘बिबट्यांची वाढती संख्या ही राज्याच्या वन्यजीव क्षेत्रासाठी वैभवाची बाब आहे. त्यामुळे बिबट्यांचे हल्ले नेमके का वाढले, त्यांचे अधिवास कसे सुरक्षित करता येतील, भीती बाळगण्याऐवजी त्यांचे सहजीवन कसे मान्य करता येईल अशा मुद्दांचा सरकारी यंत्रणेला गांभीर्याने अभ्यास करीत उपाय योजावे लागतील.
जुन्नर भागात अलीकडेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करीत बिबट्याच्या आगमनाची सूचना देणारा ‘एआय-कॅमेरा’ नागरी भागात बसवला आहे. वन खात्याने टाकलेले हे पाऊल स्वागतार्ह आहे,’’ असे श्री. वाघ यांचे म्हणणे आहे.
बिबटे माणसांना घाबरतात
नर बिबट पाच किलोमीटरपासून ते एक हजार किलोमीटरपर्यंत स्वतःचे भ्रमणक्षेत्र तयार करू शकतो. साधारणतः पाच ते सहा किलोमीटरच्या क्षेत्रात एक बिबट्या चार माद्यांना सामावून घेतो. एका बिबट्याला पकडले तरी त्याची जागा घेण्यास इतर क्षेत्रातील आणखी चार-पाच बिबटे तयार असतात. त्यामुळे मूळ समस्या तशीच राहते. बिबट्या तसा एकलकोंडा व मानवापासून दूर राहणारा प्राणी आहे. बिबट्याने उगाच त्याची मूळ स्वभाववृत्ती सोडून केवळ खाद्य म्हणून मानवी शिकार केलेली नाही.
मानव अचानक समोर येता तो केवळ पळून जाण्यास प्राधान्य देतो. मात्र त्याला पर्याय नसला किंवा जास्त भेदरला तरच स्वसंरक्षणार्थ हल्ला करण्याचा पर्याय तो निवडतो. शेतात काम करताना आपले भक्ष्य समजून गैरसमजाने बिबट्या हल्ला करतो. परंतु रहिवासी वस्तीत रात्री झोपलेल्या माणसाला सोडून फक्त त्याच्या जवळील कुत्र्याला पळवून नेण्यास बिबट्या प्राधान्य देतो. तो अत्यंत हुशार असून प्रतिकूल परिस्थितीत जगण्याचे कौशल्य बिबट्याने प्राप्त केले आहे. त्यामुळे त्याची भीती न बाळगता ग्रामीण भागात जनजागृती झाल्यास बिबट्याविषयीचे गैरसमज निश्चितपणे दूर होऊ शकतील, असे श्री. वाघ यांनी सांगितले.
पकडलेला बिबट्या मूळ जागी जातो
एका ठिकाणाहून पकडून दुसऱ्या भागात सोडलेला बिबट्या संभ्रमावस्थेत असतो. त्याला त्या भागाशी जुळवून घेण्यात अडचणी येतात. बहुतेक वेळा अनेक मैलांचा प्रवास करीत बिबट आपल्या मूळ अधिवासात परततो. त्यामुळे त्याला पकडून स्थलांतरित करण्याचा पर्याय फोल ठरतात, असे मत श्री. वाघ यांनी नोंदवले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.