
Latur News : कृषी विभागाच्या लातूर विभागातील पाच जिल्ह्यात यंदा रब्बीचे क्षेत्र वाढण्याची आशा आहे. पाच विभागात आतापर्यंत ११० टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली असून अजूनही काही भागात पेरण्या सुरुच आहेत. कृषी विभागाकडून १० जानेवारीपर्यंत अंतिम पेरणी क्षेत्र निश्चित केले जाते. गेल्यावर्षी ११६ टक्के क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या झाल्या होत्या.
यंदा त्यात वाढ होणार असली तरी ज्वारी व गव्हाच्या क्षेत्रात घट होऊन हरभरा पिकाचे क्षेत्र वाढण्याची आशा आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक १४० टक्के तर परभणी जिल्ह्यात सर्वात कमी ९१ टक्के क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत. लातूर जिल्ह्यात १२७ टक्के, हिंगोली जिल्ह्यात १०१ तर धाराशिव जिल्ह्यात ९९ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.
खरिपातील तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. दुसरी कापूस वेचणी सुरु असून शंभर टक्के वेचणी पूर्ण झाली आहे. रब्बीच्या पेरणीत आतापर्यंत रब्बी ज्वारीची सर्वसाधारण तीन लाख ७१ हजार ८५७ पैकी तीन लाख २४ हजार ७४६ हेक्टरवर (८७ टक्के) पेरणी झालेली आहे. गेल्यावर्षी तीन लाख ९२ हजार ८१४ हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली होती.
दहा जानेवारीपर्यंत रब्बीच्या पेरण्या होत असल्या तरी यंदा ज्वारीचे क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे. ज्वारी सध्या वाढीच्या अवस्थेत असून ज्वारीवर काही प्रमाणात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. गव्हाच्या पेरणीला यंदा कमी प्राधान्य असले तरी विभागातील एक लाख ६५ हजार १९ पैकी एक लाख ५६ हजार ५१९ (७४ टक्के) हेक्टरवर पेरणी झाली असून हे पीक रोप ते वाढीच्या अवस्थेत आहे.
गेल्यावर्षी गव्हाची पेरणी ८३ टक्के क्षेत्रावर झाली होती. यामुळे यंदाही गव्हाच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता कमी असल्याचे दिसत आहे. हरभऱ्याची सात लाख ८६ हजार १२४ पैकी दहा लाख दोन हजार ४८४ (१२७ टक्के) हेक्टरवर पेरणी झाली असून रोप ते वाढीच्या अवस्थेत आहे.
गेल्यावर्षी १२८ टक्के क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली होती. पेरण्यांना अजून २० दिवस उरले असल्यामुळे यंदा हरभऱ्याच्या क्षेत्रात किंचित वाढ होण्याची आशा आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळूनयेत आहे. करडईची १९ हजार ५३१ पैकी २७ हजार ७३३ (१४२ टक्के) हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्यावर्षी १७८ टक्के क्षेत्रावर करडईची पेरणी झाली होती. यंदा त्यात थोडी घट होण्याची शक्यता दिसून येत आहे. सध्या करडईवरही काही भागात मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
लातूर विभागातील रब्बी पेरणीचा तपशील
जिल्हा सरासरी पेरणी क्षेत्र (हेक्टर) प्रत्यक्ष पेरणी
लातूर २,८०,४३९ ३,५७,२५७ १२७.३९
धाराशिव ४,११,१७२ ४,०७,२८६ ९९.०५
नांदेड २,२४,६३४ ३,१४,४९३ १४०
परभणी २,७०,७९४ २,४७,३६५ ९१.३५
हिंगोली १,७६,८९१ १,७९,९३३ १०१.७२
एकूण १३,६३,९३० १५,०६,३३५ ११०.४४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.