Pune News : राज्यातील चार लाख शेतकऱ्यांची ‘ई-केवायसी’ अद्यापही झालेली नाही. त्यामुळे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे.
कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी अलीकडेच या योजनेच्या कामाचा आढावा घेतला. ई-केवायसीसाठी गेल्या सहा डिसेंबरपासून राज्यात विशेष मोहीम सुरू आहे. ही मोहीम येत्या १५ जानेवारीला समाप्त होईल. योजनेचा लाभ मिळण्यासाठी जमिनीचा तपशील अद्ययावत हवा, बँक खाते आधार संलग्न व ई-केवायसी हवी अशा तीन अटी सक्तीच्या करण्यात आल्या आहेत.
‘पीएम-किसान’चा चौदावा हप्ता वाटला जात असताना तीन अटींचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या राज्यात अवघी ७० लाख होती. परंतु कृषी विभागाने सातत्याने प्रयत्न करीत पंधराव्या हप्त्याच्या वाटपावेळी ही संख्या ८४ लाखावर नेली.
कृषी संचालक दिलीप झेंडे यांच्याकडून योजनेचा विस्तार करण्यासाठी सातत्याने आढावा घेतला जात आहे. विशेष म्हणजे राज्यात सध्या सुरू असलेल्या ई-केवायसी मोहिमेमुळे आतापर्यंत ८६.४८ लाख शेतकऱ्यांना योजनेच्या कक्षेत आणले गेले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
...अशी करा शेतशिवारातून ई-केवायसी
आपल्या भ्रमणध्वनीमध्ये https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.project.pmkisan&pcampaignid=web_share या लिंकवर क्लिक केल्यानंतर ‘पीएमकिसान-जीओआय’ हे उपयोजन (अॅप) डाउनलोड करावे.
तेथे आपला आधार क्रमांक व भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करावा. ओटीपी क्रमांक टाकून बेनिफिशरी स्टेस्टस या रकान्यात माहिती भरावी. डॅशबोर्ड पान उघडल्यानंतर तळाला ई-केवायसीसाठी ‘येथे क्लिक करा’ अशा निळ्या अक्षरातील ओळीवर क्लिक करावे.
- हे आहेत योजनेचे ग्राम समन्वयक अधिकारी ः कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवक (काही अडचण असल्यास शेतकऱ्यांना या तिघांपैकी एकाशी संपर्क करता येईल.)
- स्वतःच्या भ्रमणध्वनीवरून ई-केवायसी करणे शक्य नसल्यास ः अशा वेळी पोस्टात जावे. तेथे डीबीटी एनेबल्ड खाते उघडावे. हे खाते विनाशुल्क उघडताच ई-केवायसी आपोआप होते.
- शेतकऱ्याला प्रत्यक्ष कुठे जावे लागत नाही ः लॅंड सीडिंगसाठी (जमिनीचा तपशील जोडण्यासाठी) शेतकऱ्याला तहसील कचेरीत प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज नाही.
- कुठे प्रत्यक्ष जावेच लागते ः आधार सीडिंगसाठी (आधार क्रमांक बॅंक खात्याला जोडण्यासाठी) प्रत्यक्ष बॅंकेत जावेच लागते. तसेच ई-केवायसीसाठी देखील स्वतःच्या भ्रमणध्वनीसमोर राहून किंवा पोस्टात शेतकऱ्याला स्वतः जाऊन चेहऱ्याची ओळख (फेस रिकग्निशन) सक्तीचे आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.