.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी रविवारचा (ता. २८) दिवस दिलासा देणारा ठरला. चार ते पाच दिवसांपासून वाढणारे पंचगंगेचे पाणी रविवारी सकाळी सहापासून दुपारी तीन वाजेपर्यंत पाच इंचांनी उतरले. कृष्णा व वारणा नद्यांच्या पाण्याच्या पातळीत ही एक ते दोन इंचांनी घट झाल्याने कोल्हापूरसह सांगली व सातारा जिल्ह्यांतील नागरिकांनी सुटकेचा विश्वास टाकला.
रविवारी दुपारपर्यंत पाण्याखाली असणारे मार्ग हळूहळू मोकळे होत आहेत. तीन वाजेपर्यंत ८७ बंधारे पाण्याखाली होते. विविध नद्यांवरील सात बंधारे खुले झाले आहेत. शनिवारी (ता.२७) सकाळपासून धरण क्षेत्रातही पावसाचा जोर काहीसा मंदावला. अन्य भागातही थांबून थांबून हलक्या सरी होत होत्या.
पावसाचा जोर कमी झाल्याने शनिवारी सायंकाळी सात वाजता राधानगरी धरणाचे सहापैकी चार दरवाजे बंद झाले. यामुळे पंचगंगेचे वाढणारे पाणी स्थिर होण्यास मदत झाली. केवळ धरणातूनच पाणी नदीपात्रात येत असल्याने सर्वच नद्यांच्या पाण्याची वाढणारी गती कमी झाली.
जिल्ह्यात आलेली अभूतपूर्व पूरपरिस्थिती लक्षात घेऊन पूरग्रस्तांचे पुनर्वसन जलदगतीने व्हावे ह्या उद्देशाने कोल्हापूर जिल्ह्यातील महापूरात देण्यात येणाऱ्या विविध मदतकार्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध संघटना, व्यावसायिकांसोबत नियोजन बैठक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली.
पूर निवारणासाठी प्रशासनाकडून तयारीला सुरुवात झाली असून घरांची पडझड, शेतीचे नुकसान तसेच इतर पूरग्रस्तांना पुरामुळे झालेला त्रास या बाबत प्रशासनाकडून पंचनामे, नागरिकांना मदत करण्याचे काम सुरू झाले आहे.
नुकसान सुरूच
पावसाचा जोर मंदावला असला तरी शनिवारी (ता. २७) दिवसभर नद्यांचे पाणी वाढत असल्याने अनेक शिवारे जलमय झाली आहेत. यामध्ये लहान ऊस व खरीप पिकांचा समावेश आहे. कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.
अलमट्टीतून सव्वा तीन लाखांचा विसर्ग
सांगली कोल्हापूर आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यांतील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असला तरी अलमट्टी धरणात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे अलमट्टी धरण व्यवस्थापनाने शनिवारी (ता. २७) रात्री धरणातून २५ हजार क्युसेकने विसर्ग वाढवून तो ३ लाख २५ क्युसेकने केला आहे.
सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र धरण पाणलोट परिसरात संततधार पाऊस होता. त्यामुळे धरणात पाण्याची आवक होती. रविवारी सकाळी अलमट्टी धरणात पाण्याची आवक २ लाख ५४ हजार ८२९ क्युसेकने होत असून ३ लाख २५ हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
रविवारी सकाळी आठ वाजता पाणीसाठा ७१.७१ टीएमसी आहे. शनिवारी रात्री पाच वाजल्यापासून ते रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत २.९८ टीएमसीने धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे.
कोयना धरण क्षेत्रात जोर ओसरला
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग स्थिर ठेवण्यात आला आहे. धरण क्षेत्रातील कोयना ५७, नवजा ८९ व महाबळेश्वर १०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात प्रतिसेकंद ३९,६४१ क्युसेक पाण्याची आवक होत आहे.
शनिवारपासून पावसाचा जोर कमी झाला असल्याने विसर्गात वाढ करण्यात आलेली नाही. सध्या सांडव्यावरून ३०,००० व पायथा वीज गृहातून २१०० असा एकूण ३२,१०० क्युसेक विसर्ग कायम आहे. धरणात रविवारी सकाळी आठ पर्यंत ८४.०३ टीएमसी (७९.८४ टक्के) पाणीसाठा झाला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.