Kolhapur Agriculture Department : मागच्या काही दिवसात वळीव पावसाने दिलेली साथ यानंतर हवामान खात्याकडून यंदा चांगला पाऊस होणार असल्याचा माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यात खरिप हंगामासाठी शेतकरी तयारीला लागला आहे. दरम्यान, यावर्षी जिल्ह्यातील एक लाख ९६ हजार १७० हेक्टरवर खरिपाची पेरणी केली जाणार आहे. एक लाख ४९ हजार टन खतांचा पुरवठा केला जाणार आहे. यामध्ये आतापर्यंत १० हजार ६०६ टन खतांचा पुरवठा झाला आहे.
जिल्ह्यात खरिपाच्या पेरणीसाठी शेती आणि शेतकरी सज्ज झाला आहे. शुक्रवारपासून रोहिणी नक्षत्र सुरू होत आहे. या नक्षत्रात चांगला पाऊस होईल; पण वादळी वारेही वाहतील, असा अंदाज आहे. प्रशाकीय पातळीवर विविध बी-बियाणे, खते, औषधांसह कृषी साहित्यांचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात भाताची ९५ हजार हेक्टरवर पेरणी केली जाणार आहे. २३ हजार ९४० क्विंटल बियाणे उपलब्ध केले जाणार आहेत.
भातासह ज्वारी, तूर, मूग, उडीद, भुईमूग, मका, नाचणी व सोयाबीन असे एकूण ३७ हजार ७७१ टन बियाणांचा पेरा होईल. यावर्षीच्या खरीप हंगामासाठी लागणाऱ्या सर्व खतांची मागणी व साठा केला आहे. जिल्ह्यात एक लाख ४९ हजार टन खतांचा पुरवठा केला जाणार आहे. गेल्यावर्षी एक लाख ५७ हजार २५१ टनांचा साठा केला होता. यापैकी एक लाख ३२ हजार २८५ टन खतांचा पुरवठा झाला होता.
गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी खतांचा साठा कमी केला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक युरिया खतांची मागणी होत आहे. ४९ हजार ८०० टनांपैकी आतापर्यंत ४ हजार १७१ टन खतांचा पुरवठा झाला आहे. तसेच, एमओपी, एस.एस.पी, डी.ए.पी, संयुक्त खते अशी एकूण एक लाख ४९ हजार टन पुरवठा केले जाणार आहे. आतापर्यंत या सर्व खतांचा १० हजार ६०६ टन पुरवठा केला आहे.
वळीव पाऊस सुरू झाल्यापासून रासायनिक खतांची मागणी वाढली आहे. वळीव पाऊस उसासाठी सर्वाधिक पोषक असतो. त्यामुळे शेतकऱ्यांकडून मोठ्या पावसाची वाट पाहिली जात आहे. दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वळीव पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे.
बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई
बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. शेतकऱ्यांना चांगले आणि खात्रिशीर बियाणे दिले जावे यासाठी कृषी विभागाकडून सूचना दिल्या आहेत. या सूचनांचे तंतोतंत पालन झाले पाहिेजे, असेही नमूद केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.