Sunflower Cultivation : खरीप सूर्यफुलाच्या लागवडीसाठी कोणत्या गोष्टी ध्यानात घ्याल?

Kharif Season : सूर्यफूल हे कमी कालावधीत येणारे पीक असल्याने बहुविध, दुबार पीक, क्रमिक पीक व आंतरपीक पद्धतीस योग्य ठरते.
Sunflower Farming
Sunflower FarmingAgrowon
Published on
Updated on

डॉ. मोहन धुप्पे, डॉ. शिवशंकर पोले, डॉ. प्रशांत आंबिलवादे

Sunflower Farming Management : सूर्यफूल हे कमी कालावधीत येणारे पीक असल्याने बहुविध, दुबार पीक, क्रमिक पीक व आंतरपीक पद्धतीस योग्य ठरते. सूर्यफुलात तेलाचे प्रमाण ३५ ते ४० टक्के आहे. या पिकाची पाने, खोड व फुले यांच्या विशिष्ट रचनेमुळे हे पीक सर्वसाधारण जमिनीत व समशीतोष्ण कटिबंधात घेता येते.

संकरित वाणामध्ये अधिक अन्ननिर्मिती क्षमता व तयार केलेल्या अन्नाचा अधिक उत्पादनासाठी वापर होतो. तसेच संकरित वाणांमध्ये स्वफलधारणेचे अधिक प्रमाण, दिलेल्या अन्नद्रव्याचा कार्यक्षम वापर करून अधिक उत्पादन देण्याची क्षमता असते. त्यामुळे संकरित वाणांची निवड करावी.

जमीन

मध्यम ते भारी, ओलावा टिकवून ठेवणारी, उत्तम निचरा असणारी व जमिनीचा सामू ६.५ ते ८.० असणारी जमीन सूर्यफूल लागवडीसाठी निवडावी. पाणथळ किंवा आम्लयुक्त जमीन लागवडीसाठी टाळावी.

हवामान

सूर्यफुलाची चांगली वाढ व अधिक उत्पादनासाठी ५०० मि.मी. पर्जन्यमान आवश्यक आहे. समशीतोष्ण कटिबंधातील पीक असल्याने बियाणे उगवण, रोपाची वाढ होण्यासाठी थंड हवामान लागते. फुलधारणेपासून ते पीक येईपर्यंत स्वच्छ प्रकाश व जास्त तापमान आवश्यक आहे. फुलधारणेच्या अवस्थेत पाऊस पडल्यास बीजधारणेवर विपरीत परिणाम होतो. फुलोऱ्याची अवस्था पावसात सापडणार नाही, याबाबत दक्ष असावे.

तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा कमी व ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्यास परागीकरणावर, उत्पादनावर व तेलाच्या प्रमाणावर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. साधारणतः २५-३० अंश सेल्सिअस तापमानात सूर्यफूल पिकाची वाढ चांगली होते. त्यामुळे पेरणीची वेळ साधणे महत्त्वाचे आहे.

Sunflower Farming
Sunflower Farming : दुष्काळात सूर्यफुलाचा आधार, माळरानावर घेतलं सूर्यफुलाचे विक्रमी उत्पादन

पेरणीची वेळ

खरीप हंगामात जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात पेरणी करावी. पेरणी शक्यतो टोकण पद्धतीने करावी. त्यासाठी हेक्टरी ५ किलो बियाणे पुरेसे. पाभरीद्वारे पेरणी केल्यास हेक्टरी ८ ते १० किलो बियाणे लागते. प्रति हेक्टरी रोपांची संख्या ५५ हजार ठेवणे महत्त्वाचे आहे.

पूर्वमशागत

एक नांगरणी करून दोन वखराच्या पाळ्या द्याव्यात. शेवटच्या वखर पाळीआधी प्रति हेक्टरी ५ ते १० टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे.

वाणांची निवड

सरळ वाणांपेक्षा संकरित वाण जास्त उत्पादनक्षम, खत व पाण्यास प्रतिसाद देणारे आहेत. हे वाण एकाच वेळी परिपक्व होऊन कापणीस तयार होतात. त्यामुळे सूर्यफुलाच्या सुधारित किंवा संकरित वाणांची लागवडीसाठी निवड करावी. (तक्ता १)

बीजप्रक्रिया

जमिनीद्वारे उद्‍भविणाऱ्या रोगांपासून रोपाचे संरक्षण, चांगल्या उगवणीसाठी बीजप्रक्रिया करणे गरजेचे आहे.

अ) रोग व्यवस्थापनासाठी बीजप्रक्रिया (प्रति किलो बियाणे)

आपल्या परिसरातील रोगाच्या प्रादुर्भावाप्रमाणे पुढील पैकी योग्य त्या घटकाची बीजप्रक्रिया करावी. (लेबल क्लेम नाही, पण विद्यापीठ शिफारस)

मूळकुज, खोडकुज किंवा अन्य बुरशीजन्य रोग ः कार्बेन्डाझिम ३ ग्रॅम.

केवडा ः मेटॅलॅक्झील अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) ३ मि.लि.

शेंडेमर ः थायामेथोक्झाम ४ ग्रॅम

ब) किडीच्या व्यवस्थापनासाठी बीजप्रक्रिया - इमिडाक्लोप्रीड ४ ग्रॅम. त्यानंतर

क) नत्र व स्फुरदाची उपलब्धता होण्यासाठी ः अॅझेटोबॅक्टर व पी.एस.बी. प्रत्येकी २५ ग्रॅम.

बियाणे व लागवड पद्धत

पेरणीचे अंतर : भारी जमिनीत ६० × ३० सें.मी.; मध्यम जमिनीत ४५ × ३० सें.मी.

पेरणीची पद्धत : पेरणी टोकण पद्धतीने करावी. एका ठिकाणी दोन बिया टोकाव्यात.

पेरणी पाभरीने केल्यास ६० सें.मी. पाभरीचा वापर करून ८ ते १० किलो बियाणे हेक्टरी पेरण्यास वापरावे.

Sunflower Farming
Sunflower Sowing : कृषी विभागाकडून ३०० हेक्टरवर सूर्यफूल प्रकल्प

पीक पद्धती

आंतरपीक : तूर + सूर्यफूल (३:३), सोयाबीन + सूर्यफूल (२:१) व भूईमूग + सूर्यफूल (६:२)

क्रमिक पीक :

कोरडवाहू क्षेत्र : सोयाबीन - सूर्यफूल, मूग, उडीद - सूर्यफूल, सूर्यफूल - हरभरा

बागायती क्षेत्रात : भुईमूग - सूर्यफूल - तीळ, कापूस - सूर्यफूल, तूर - सूर्यफूल व ज्वारी - सूर्यफूल.

आंतरमशागत

सूर्यफुलाच्या अधिक उत्पादनासाठी प्रति हेक्टरी रोपांची संख्या ५५ हजार ठेवणे महत्त्वाचे आहे. मात्र तिफणीने केलेल्या पेरणीमध्ये हेक्टरी रोपांची संख्या ही कमी किंवा अधिक होते. त्याचा परिणाम उत्पादनावर होतो म्हणून पेरणीनंतर १५ दिवसांनी विरळणी करावी. एका ठिकाणी फक्त एकच जोमदार रोप ठेवावे व दोन रोपांमधील अंतर ३० से.मी. राहील असे पाहावे. सूर्यफूल पीक ४५ दिवसांपर्यंत तणविरहित ठेवावे यासाठी २-३ वेळा कोळपणी व खुरपणी करावी. रासायनिक तण नियंत्रण करायचे असल्यास, तक्त्यातील तणनाशकांचा वापर करता येईल. (त्यासाठी तक्ता क्र. ३ पाहा.)

पाणी व्यवस्थापन

सूर्यफूल पिकास जमिनीचा प्रकार, हवामान व पिकाच्या कालावधीनुसार ६०० ते १००० मि.लि. पाणी लागते. पीकवाढीच्या संवेदनशील काळात पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. कळी धरणे (३०-४० दिवस). फूल उमलणे (५५-६५ दिवस) दाणे भरणे (६५-७० दिवस)

हस्त परागीकरण

सूर्यफुलात परागीकरणासाठी मधमाश्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यासाठी प्रति हेक्टरी मधमाश्यांच्या ५ पेट्या ठेवल्यास सूर्यफुलाचे उत्पादन तर वाढतेच सोबत मधाचे उत्पादनही मिळते. जर मधमाश्यांचे प्रमाण कमी असेल तर योग्य परागीकरण होण्यासाठी व बी भरण्याचे प्रमाण वाढण्यासाठी सूर्यफुलाचे पीक फुलोऱ्यात असताना एक दिवसाआड सकाळी ८-११ या वेळेत एक आठवडा फुलावर मऊ कापडाने हात फिरवल्यास बी भरण्याच्या प्रमाणात २५-३० टक्के वाढ दिसून आली आहे. पीक फुलोऱ्यात असताना शक्यतो कोणतीही फवारणी करू नये. त्याचा विपरीत परिणाम होतो.

तक्ता १ : सूर्यफूलाचे सुधारित व संकरित वाण

सुधारित वाण

वाण कालावधी (दिवस) तेलाचे प्रमाण (%) सरासरी उत्पादन

(क्वि./हे.) वैशिष्ट्ये

लातूर सूर्यफूल - ८ ८५-९० ३६-३७ १२-१४ केवडा रोग प्रतिबंधक, कमी उंचीचे व कमी कालावधीत तयार होणारे वाण.

फुले भास्कर ९०-९५ ३६-३७ १५-१६ अधिक उत्पादनक्षम.

एस.एस.- २०३८ (भानू) ९०-९५ ३७-३८ १४-१५ अधिक उत्पादनक्षम, उंच वाढणारा व तेलाचे प्रमाण अधिक.

संकरित वाण

लातूर संकरित सूर्यफूल-१७१ ९०-९५ ३४-३५ १८-२० केवडा रोग प्रतिबंधक, कोरडवाहू व बागायती लागवडीसाठी योग्य.

लातूर संकरित सूर्यफूल -३५ ८५-९० ३७-३८ १५-१६ केवडा रोग प्रतिबंधक, कोरडवाहू लागवडीसाठी योग्य.

के.बी.एस.एच.-४४ ९०-९५ ३५-३६ १६-१८ कोरडवाहू व बागायती लागवडीसाठी योग्य.

डी.आर.एस.एच.-१ ९२-९८ ३८-४० १४-१६ तेलाचे प्रमाण अधिक व उंच वाढणारे.

फुले रविराज ९०-९५ ३४-३५ १६-१७ कोरडवाहू व बागायती लागवडीसाठी योग्य.

अकोला संकरित सूर्यफूल -२७ ८५-९० ३६-३७ १४-१५ कमी कालावधीत तयार होणारे वाण, कोरडवाहू लागवडीसाठी योग्य.

तक्ता २ : खत व्यवस्थापन

अ) मुख्य अन्नद्रव्याचे व्यवस्थापन :

वाण व जमीन नत्र : स्फुरद : पालाश (किलो/हे.) खते देण्याची वेळ

संकरित वाणास ६०:३०:३० यापैकी निम्मे नत्र, सर्व स्फुरद व सर्व पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. तर नत्र खताचा दुसरा हप्ता पेरणीनंतर ३०-३५ दिवसांनी द्यावा.

सुधारित वाणास ४०:३०:३० संपूर्ण मात्रा एकदाच पेरणीच्या वेळी द्यावी.

खोल काळ्या जमिनीत ९०:४५:४५ यापैकी निम्मे नत्र, सर्व स्फुरद व सर्व पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. तर नत्र खताचा दुसरा हप्ता पेरणीनंतर ३०-३५ दिवसांनी द्यावा.

ब) सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन :

१) २५ किलो गंधक प्रति हेक्टरी पेरणीच्या वेळेस दिल्यास बियाण्यात १.५ ते २.५ टक्का तेलाचे प्रमाण वाढते.

२) पिकाच्या अधिक उत्पादनासाठी पेरणीनंतर २०, ४० व ५० दिवसांनी १५ ग्रॅम युरिया + ५ ग्रॅम डी.ए.पी. खत प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

३) माती परीक्षणानुसार झिंक सल्फेट १० किलो, मॅग्नेशिअम सल्फेट १०-२०किलो व बोरॅक्स ५ किलो प्रति हेक्टरी पेरणीच्या वेळी दिल्यास उत्पादनात वाढ होते.

तक्ता ३ : रासायनिक तणनियंत्रण :

तणनाशकाचे नाव प्रमाण प्रति हेक्टर प्रमाण प्रति १० लि. पाणी वापरण्याची वेळ

पेन्डीमिथॅलीन (३० ई.सी.) २.५०-३.३० लिटर २५-३३ मि.लि. पेरणीनंतर, परंतु उगवणीपूर्वी

ऑक्सिक्लोरफेन (२३.५ ई.सी.) ४२५ मिलि ४.२५ मि.लि. पेरणीनंतर, परंतु उगवणीपूर्वी.

(*लेबल क्लेम नाही, पण विद्यापीठ शिफारस) (*हेक्टरी ७५० ते १००० लि. पाणी वापरावे.)

डॉ. मोहन धुप्पे, ९६२५३५२४३७

(गळीत धान्ये संशोधन केंद्र, लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com