
Nanded News : खरीप हंगामाचे नियोजन (Kharif Season Management) करताना प्रशासकीय पातळीवर शासन योग्य ती खबरदारी घेत आहे. तथापि शेतकऱ्यांनीही पुरेसा पाऊस जोपर्यंत होत नाही तो पर्यंत पेरणीच्या मोहापासून स्वत:ला दूर ठेवले पाहिजे.
कृषी तज्ज्ञ आणि कृषी विभाग (Agriculture Department) वेळोवेळी ज्या काही सूचना देतील त्याचे पालन करून खरीप हंगामाचे नियोजन शेतकऱ्यांनी करावे, असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.
डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे सोमवारी (ता. १) खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते.
या वेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता बा. क. शेटे, कार्यकारी अभियंता ए. एस. चौगले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री म्हणाले, की बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना चांगल्या बियाण्यांच्या नावाखाली चुकीचे, उगवण क्षमता कमी असलेले बियाणे दिले जातात. यात शेतकऱ्यांची होणारी फसवणूक ही मोठ्या आर्थिक हानीची होऊ शकते.
प्रकल्पातील पाणी जपून ठेवावे
जागतिक हवामानातील बदल व त्यांचे होणारे दुष्पपरिणाम आपण सारेच अनुभवत आहोत. सद्यःस्थितीत धरणात उपलब्ध असलेला पाणीसाठी आपल्याला जरी समाधानकारक वाटत असला तरी या पाण्याचे अधिक काळजीपूर्वक काटेकोर नियोजन केल्याशिवाय पर्याय नाही.
हवामान तज्ज्ञांनी अलनिनो व इतर घटकामुळे जुलै ते ऑगस्ट या कालावधीत उष्णता अधिक आणि पावसाचे प्रमाण कमी, अशी स्थिती दर्शविली आहे. भविष्यातील हे आव्हान लक्षात घेता विविध प्रकल्पांतील पाणी पिण्यासाठीही जपून ठेवावे लागेल असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.