ब्रॅड डीEducation and Employment: केरळच्या तरुणाला बेरोजगारीची समस्या सतावते आहे. ती मोठ्ठी समस्या आहे. पण त्याच्या डोक्यात जग मोठ्ठं आहे. त्याला राज्य अपुरं पडतंय. महाराष्ट्राच्या काही भागांत उलटा धोका दिसतो. राज्य तर मोठ्ठं आहे, अर्थव्यवस्था मोठ्ठी आहे, शहरं मोठ्ठी आहेत, संधीही आहेत, पण तरुणांच्या सार्वजनिक कल्पनाविश्वाला एखाद्या स्थानिक नेत्याच्या मतदारसंघाएवढं लहान केलं जातंय. केरळमधल्या तरुणाचा प्रश्न आहे, “माझ्या क्षमतेएवढी संधी कुठे आहे?” मराठी तरुणाला आपण प्रश्न असा विचारायला शिकवतोय, “आपले साहेब, दादा, आण्णा, भाऊ, तात्या कुठे आहेत?” .केरळचा भूगोल म्हणजे एक प्रचंड मोठ्ठा सिनेमाचा सेट वाटतो. महाराष्ट्रात अल्लड आणि उत्साही भासणारा सह्याद्री गोवा आणि कर्नाटकमार्गे केरळात येईपर्यंत उंच भारदस्त रुबाबदार पिळदार पुरुषाचं रूप घेतो. पूर्वेला हा मजबूत देखणा सह्याद्री आणि पश्चिमेला अरबी समुद्र यांच्यातल्या चिंचोळ्या पट्टीत केरळ वसला आहे..Agrowon Diwali Article: शेतीतून जगण्याचे बळ अन् समृद्धी मिळाली.केरळ म्हणजे ३८,८६३ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला समुद्रकिनारा, बॅकवॉटर, ४१ पश्चिमवाहिनी नद्या आणि प्रचंड मोठ्ठे हिरवेगार डोंगर. तिरुअनंतपुरम् (तोंडी बोलण्यात ‘त्रिवेंद्रम्’, कॉस्मो एनआरआय जनतेसाठी ‘त्रिवांड्रुम्’) ही राजधानी असली तरी सगळ्यात मोठ्ठं शहर कोची आहे. स्थानिक उच्चार कोच्ची. केरळचं उच्च न्यायालय कोचीत आहे. व्यापार आणि पैसा कोचीत आहे. आंतरराष्ट्रीय बंदर आणि भारतीय नौदलाचा तळही कोचीतच आहे. मल्याळम सिनेमातले बरेचसे तारे-तारका, लेखक आणि दिग्दर्शक कोचीत राहतात. कोचीचं एक उपनगर आहे त्रिकाक्करा. उपनगर असूनही त्रिकाक्कराला स्वतःची स्वतंत्र नगरपालिका आहे. एर्नाकुलम जिल्ह्याची जिल्हा परिषद त्रिकाक्करामध्येच आहे. तर या त्रिकाक्करा शहरात मी गेली साडेतीन वर्षं राहतो आहे..केरळचं क्षेत्रफळ भारताच्या एकूण भूभागाच्या जेमतेम १.२ टक्के आहे. पण या चिंचोळ्या पट्टीत २०११ च्या जनगणनेनुसार सव्वातीन कोटींहून अधिक माणसं राहत होती. देशाच्या क्षेत्रफळाच्या सव्वा टक्क्याहून कमी जागेत भारताच्या सुमारे २.८ टक्के लोकसंख्या राहते. केरळ नकाशावर चिंचोळं दिसत असलं तरी माणसांनी, घरांनी, गावांनी आणि शहरांनी ते चांगलंच दाट भरलेलं आहे. केरळ आणि तमिळनाडूच्या सीमेवर सलग भिंतीसारख्या उभ्या असलेल्या सह्याद्रीला केरळच्या पलक्कड आणि तमिळनाडूच्या कोइमतूर या जिल्ह्यांच्या हद्दीवर असणारी ‘पलक्कड गॅप’ छेद देते. या चाळीसेक किलोमीटर रुंदीच्या फटीतून मॉन्सूनचे गदगदलेले वारे तमिळनाडूत शिरतात. या वाऱ्यांचा कोइमतूर आणि त्यापलीकडच्या तमिळनाडूच्या हवामानावर मोठा प्रभाव आहे..केरळ-तमिळनाडू सीमेवरच्या सह्याद्रीतून लहानमोठ्या नद्या केरळमध्ये उतरतात. केरळमध्ये अधिकृतपणे मोजल्या जाणाऱ्या ४४ नद्यांपैकी ४१ पश्चिमेकडे वाहत अरबी समुद्राला मिळतात. बाकी तीन पूर्वेकडे वाहतात. महाराष्ट्रात नदी म्हटले की शेकडो किलोमीटरचा प्रवास डोळ्यासमोर येतो. केरळमध्ये डोंगर आणि समुद्र यांच्यात अंतरच कमी असल्यामुळे इथल्या बहुतेक नद्यांना फार लांब जायची चैन नाही. डोंगरातून उतरायचं, गावंशहरं ओलांडायची आणि समुद्रात जमा व्हायचं. याच फिल्मी भूगोलाने केरळचा इतिहास घडवला आहे!.Agrowon Diwali Article: शेती सुखाची करणे शक्य आहे का?.काळी मिरी केरळमधून जगभर गेली. जगभरातून नव्या कल्पना आणि नवे विचार केरळमध्ये येत राहिले. अरब, ज्यू, ख्रिश्चन, पोर्तुगीज, डच, आणि ब्रिटिश अशा वेगवेगळ्या लोकांच्या पावलांचे ठसे या चिंचोळ्या किनारपट्टीवर पडत गेले. व्यापाराबरोबर धर्म आले, भाषा आल्या, खाद्यसंस्कृती आल्या, नवी तंत्रं आली आणि राजकीय कल्पना आल्या. हा सिलसिला गेली अडीच हजार वर्षं सुरूच आहे..अडीच हजार वर्षं बाहेरचं जग या चिंचोळ्या पट्टीत येत राहिलं आणि केरळही बाहेरच्या जगाकडं पाहत राहिलं. पूर्वी जहाजातून अरब, पोर्तुगीज, मसाले, धर्म आणि कल्पना येत होत्या. आता विमानातून मल्याळी पोरं दुबई, बंगळूर, लंडन, बर्लिन आणि टोरोंटोकडे जातात. इंटरनेटमधून उतरलेलं जग त्यांच्या मोबाइलमध्ये येऊन बसलं आहे. या सगळ्या देवाणघेवाणीचा सर्वांत रंजक परिणाम मला केरळच्या भूगोलात किंवा इमारतींत दिसत नाही, तर तो इथल्या तरुणांच्या डोक्यात दिसतो..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.