Life Philosophy : आयुष्याच्या टिचल्या गारा 

पुन्हा केव्हातरी भरपूर पाऊस पडला की नदीला पूर यायचा. गावकरी पूर बघायला जायचे. चर्चा करायचे- अबब मागच्यावेळीपेक्षा प्रचंड पाणी की हो. अफाट, अफाट की हे. यंदा नदी जरा जास्तच गावाकडं सरकली म्हणायचं, का गाव नदीकडं सरकलं म्हणायचं ?
Life
Life Agrowon

- कल्पना दुधाळ

नदीच्या काठावर वसलेलं एक छोटंसं गाव होतं. नदीकाठच्या सुपीकतेची समृद्धी अंगाखांद्यावर मिरवणारं. हाकेच्या अंतरावर नदी आहे, हे गावक-यांना आपलं भाग्य वाटायचं. मूळचे गावकरी, नोकरीधंद्याच्या निमित्तानं, व्यापाराच्या निमित्तानं रहायला आलेले लोक या सगळ्यांना गावानं सामावून घेतलं होतं. शेतीच्या बरकतीबरोबर उद्योगधंदे भरभराटीला आले होते. सगळे दिवस सारखे नसतात हे सांगताना, आपल्या हाताची पाच बोटं तरी कुठं सारखी असतात हे गावातली माणसं एकमेकांना समजवायची. अशा समजूतदार माणसांच्या सोबतीनं आयुष्यातले चढउतार सहज पार व्हायचे. बघता बघता छोटंसं गाव मोठ्ठं झालं. विस्तारलं. पावसाळ्यात धो-धो पाऊस पडला की नदीचं पाणी वाढायचं. लोक नदी बघायला जायचे.  पाणी बघून लोकांचे डोळे फिरायचे, अबब किती पाणी. पाण्याचे लोट डोळ्यात साठवत ते परत फिरायचे. कधी पाऊस गुंगारा द्यायचा. दुष्काळ पडायचा, माणसं होरपळून निघायची. पण त्यातूनही मार्ग काढायची. 

पुन्हा केव्हातरी भरपूर पाऊस पडला की नदीला पूर यायचा. गावकरी पूर बघायला जायचे. चर्चा करायचे- अबब मागच्यावेळीपेक्षा प्रचंड पाणी की हो. अफाट, अफाट की हे. यंदा नदी जरा जास्तच गावाकडं सरकली म्हणायचं, का गाव नदीकडं सरकलं म्हणायचं ? काही म्हणा. पण जर हे पाणी गावाकडं उसळलं तर काही खरं नाही गावाचं. ह्ये, असं होणारच नाही. एवढं पाणी येत नसतंय. आता पूररेषा आखली पाहिजे राव. हे काही खरं नाही. उगं कुठं जागा दिसंल तिथं घरं, झोपड्या उभारणं बरं नाही. तर काय, ही नदी एखाद्या वेळेला धोका द्यायला बसली. आखली की पूररेषा, हे बघा इथनं त्या तिथवर नदीची जागा नदीला सोडायची मग काय घरंबिरं बांधायची ती बांधा. हां आंगं आस्सं.

कधी नदीचीच तहान भागत नव्हती, तर कधी नदी दुथडी भरून वहायची. एखादं वर्ष दुष्काळाच्या नावावर. लोक म्हणायचे, मागच्या वर्षी तरी पावसानं पडून कुठं बोंब मारली ? दरवर्षी पाऊस कमी कमी पडत चाललाय. कशाचा पूर येतोय ? आला तरी एवढ्या लांब पाणी येत असतंय काय ? ह्ये, उगं गावकरी घाबरतेत. चालू द्या आपलं. नदीला एवढी जागा रिकामी सोडायची म्हणजे खेळंय का काय ? माणसांनी रहायचं कुठं ? असं करता करता नदीकाठची झाडी जाऊन तिथं इमारतींचे जंगल वाढले. खडपाणाच्या वाटांच्या जागी सिमेंटचे डांबरी रस्ते झाले. कुठं नदीकाठचे चढ उकरून नेले तर कुठं भराव घालून ठेवले. लोक म्हणाले, आता गावाचा विकास झाला असं म्हणता येईल.

पुढं झालं असं की, एका वर्षी इतका पाऊस पडतो, इतका पाऊस पडतो की धरणं भरून वाहू लागतात. नदीचं पाणी नदीत, वरून पडणाऱ्या पावसाचं पाणी नदीत, धरणातलं पाणी नदीत, काय करेल नदी ? नदीला खरं वहावंच लागतं. मग वाट मिळंल तसं पाणी पसरतं. अगोदर नदीकाठच्या शेतात पाणी घुसतं. पुढं पुढं सरकत रहातं. हळूहळू गावापर्यंत येतं. गावात घुसतं. लोक गावातनं बाहेर पडायला तयार नसतात. पाणी पुढं सरकतंच रहातं. घरादारात घुसतं. तरी माणसांना नदीवर विश्वास वाटत असतो. माणसांचं मन घरातनं निघत नाही. आयुष्याच्या कमाईचं घर, सामान, किडूकमिडूक कसं सोडून जायचं ? पण पाणी वाढतंच जातं. गावात पाणीच पाणी. 

 अख्ख्या गावाला पाण्यानं वेढा घातला. आता ? कसंही करून जीव वाचले पाहिजेत. गाव सोडलं नाही तर काही खरं नाही. धरणीनं आधार काढून घेतला, आभाळाचं छत फाटलं, काय करायचं ? कुठला रस्ता कुठंय, कुठं जायचं, कसं जायचं ? पाण्यानं भूल पाडली होती. माणसांचे आवाज विरलेले, फक्त पाण्याचा, पावसाचा आवाज. म्हाता-या कोता-यांनी उभ्या जन्मात अशी झड बघितली नव्हती, असा पूर बघितला नव्हता. पूर कसला महापूर ! तरण्याताठ्यांच्या वाचा गेलेल्या. पोरासोरांचे हाल. मुकी जित्राबं दावणीला ठेवावी का दावी मोकळी करावी ? कुत्र्यामांजरांचं काय करायचं ? माणसापेक्षा जास्त इमानदारी दाखवली होती त्यांनी. आता कुठं जा म्हणायचं. आपल्याबरोबर तरी कसं न्यायचं ? कुठं न्यायचं ? आपलाच ठावठिकाणा नाही. याआधी दुसऱ्या गावात सोडून चुकवून परत आलो तरी आठवडाभरात पुन्हा दारात उभी राहिली होती. आपल्याला बघून किती आनंद त्यांच्या डोळ्यात. पायात घुटमळत जीव सोडले. परत कधी कुठं सोडून दिलं नाही. आता काय करायचं ? माफ करा रे मुक्याजिवांनो. जगलोवाचलो तर पुन्हा घर उभारू. पुन्हा गोळ्यामेळ्यानं राहू. दावी मोकळी केली, कोंबड्यांवर दगडं भिरकवली. तरी कुणी लांब जाईनात. काय म्हणायचं यांना ? कसं हाकलायचं ? काय करायचं ?

Life
Life Is Beautiful : जगणं सुंदर आहे!

गावाचा समुद्र होतो. समुद्रात कागदाचा तुकडा तरंगावा तसं गाव दिसायला लागतं. गावकरी म्हणतात, असं कधी झालं नव्हतं खरं. कधी म्हणजे कधीच नव्हतं. आता शिवारं हवार झाली होती. पिकातलं पाणी फुटून एकमेकांच्या वावरात गेलं तरी जिवावर उठायची माणसं. आता सगळेच पाण्याखाली. बांधसुद्धा हुडकावे लागणार.  पाण्यानं शेतंशिवारं धुवून नेली. मातीची घरं मातीत मिसळली.  माणसं बेघर झाली. मग माणसांनी मिळंल तिथं निवा-याला आसरा घेतला. जवळपासच्या गावात पाव्हण्यारावळ्यांकडं आधार घेतला. कुणी लांबच्या पाहुण्याकडं पोचलं, तर तिथं प्ययला पाणी नाही. कुणाचा कुणाशी संपर्क नाही. तरी कसंबसं धडपडून पोचले तिथपर्यंत तर जगल्यावाचल्याच्या भेटीगाठी. अवंढे गिळू गिळू शब्द गोठलेले. ज्या नावांनी जीव वाचवायचे त्याही पलटल्या पुरात. कुणी झाडाच्या बुडख्यांना धरून दिवस काढले. बुडत्याला काडीचे आधार. जीव प्याराच असतो कुणालाही. पुढं पूर, मागं पूर. पोहायला येत नाही. पोहायला शिकायचं तेव्हा कुठंसुद्धा पाणी सापडलं नाही. असं अचानक पुरात सापडल्यावर पोहता येईल ? कुणी आधार दिला तरच जीव वाचणार आता, नाहीतर हा शेवटचा श्वास….  

तर भिजलेल्या पाखरांगत माणसं. भिजून सुकायची, अजून भिजायची. अंगात थंडी भरलेली. म्हाता-याच्या पायात धसकाट घुसून चिडलेलं. मलमपट्टी चालू. पाण्यात पाय भिजवू नका असं डाक्टरनं सांगितलेलं. आता कसं कोरडं ठेवायचं ? कुणाच्या अंगात आधीच थंडीताप. कुणाची तान्ही लेकरं. औषधाच्या पिशव्या विसरल्या घरात. पोरंसोरं विचारायची, दादा दाराला कुलूप लावलेलं असलं तरी घरात पाणी जातं का ? माझं दप्तर भिजंल का वो दादा ? मी दप्तर खिडकीत ठेवलंय. मी खुंटीला अडकवलंय. तिथवर नाय ना पाणी जाणार. काय सांगायचं लेकरांना ? अनेकांच्या अनेक त-हा. दुःखाचे, वेदनेचे महापूर.

पुढं चला, पुढं चला म्हणत बचावासाठी आलेले लष्कराचे जवान, मदतीला आलेली माणसं पूरग्रस्तांना बोटीकडं ढकलायची. पण गावकऱ्यांच्या डोळ्यातलं गाव निघत नव्हतं. गावातनं पाय निघत नव्हतं. ज्या दगडाधोंड्यातनं वाटा हुडकत फिरलो तिथंनं बाहेर पडायला बोटींच्या वाटा बघाव्या लागतील, असं कधी कुणाला स्वप्न तरी पडलं होतं का ? आक्रीतय ह्ये आक्रीत. माघारी वळून वळून गावाकडंच बघताना ढगफुटी झाल्यागत डोळ्यातनं धारा. काय नव्हतं गावात ? काय नव्हतं दुकानात ? काय नव्हतं घरात ? आयाबायांचे जीव संसाराच्या काडीकाडीत. लेकराबाळांची बालपणं हिसकून नदीनं वाहून नेलेली. काय करायचं काय ? अंगावरच्या भिजक्या कपड्यांवर या जगात उघडी पडलेली माणसं. रिकामे हात कुणापुढं पसरायचे ? पुन्हा हिंमत कशी धरायची ? कधी परत येऊ ? 

पुराच्या बातम्या गावोगावी गेल्या. टीव्हीवर दिसल्या. लोक पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आले. माणसांत देव दिसू लागले. दुष्काळी लोकांनी पावसाला शिव्या घातल्या. पुरातल्या लोकांनी पावसाला शिव्या घातल्या. असला तरी, नसला तरी पाऊस वाईट ठरला. लोकांना पुन्हा पूररेषेची आठवण झाली. चर्चांना उत आला- अरे देवा, पुररेषा आपण पाळलीच नाही की. उलट नदीच्या प्रवाहात हे इतके अडथळे करून ठेवले. मग पाणी पसरणार नाहीतर काय. साध्या भरलेल्या पाण्याच्या बादलीत काही टाकलं तरी तेवढं पाणी खाली सांडतंय. हा तर निसर्गय. त्याच्यात किती अडथळे आणले, तो गप्प. निसर्गावर मात करायचं ठरवलं, तरी गप्प. किती ढवळाढवळ करा, निसर्ग गप्प. कच-याचे ढीग ढकला पाण्यात, वाट्टेल ते आणा, टाका पाण्यात, कारखान्याचं पाणी, सोडा नदीत. आपण आपली सोय बघतोय. निसर्ग कधीतरी बोलेल, भांडेलच ना. कसं भान विसरलो आपण ? अशा संकटांना माणूससुद्धा कारणीभूत असतो. फक्त ही जाणीव पुरानं करून दिली. आपल्या दुःखाची उत्तरं जमिनीवर असताना आभाळावर राग काढून काय फायदा ?  

या गावासारखी अनेक गावंच्या गावं आठदहा दिवस पाण्याखाली गेली होती. पाऊस थांबली तरी पूर ओसरत नव्हता. पाण्याची पातळी अगदीच हळूहळू कमी होत होती. टुकूटुकू बघत कुठंतरी आस-याला माणसं टेकली होती. कुणीकुणी मदत करायला पुढं आले. कुणी चार घास दिले, कुणी घोटभर पाणी दिलं. कुणी सुकलेल्या टॉवेलची घडी कुडकुडत्या अंगावर टाकली. माणसांला माणूसकी भेटली. 

शाळेच्या पुस्तकातली कणा कविता लोकांना पुन्हा आठवली, तीपण अशावेळी की जेव्हा तशीच वेळ त्यांच्यावर आली. गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, होय सर फक्त लढ म्हणा ! सर कुठे दिसेनात. की अडकले याच महापूरात ? लोक सरांना हुडकू लागले. सर सापडेनात. सरांनी लोकांना पूररेषा शिकवली होती. लोकांनी तोंडपाठही केलं होतं, पुररेषा म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर. पण त्यानंतर जे विसरलं ते आज लख्ख आठवलं. जे पुस्तकात असतं ते विसरून जायचं असतं असंच वाटायचं आजवर लोकांना.  पर्यावरण संरक्षण म्हणजे पशुपक्ष्यांचं, वाघ सिंहाचं संरक्षण असं वाटायचं लोकांना. पण आता पर्यावरण संरक्षण म्हणजे स्वतःचंसुद्धा संरक्षण असंपण वाटायला लागलं. 

Life
Rural Social Structure : गावाच्या गोतावळ्यात मागे पडलेली माणसं

या गावासारखी असंख्य गावं होती, असंख्य माणसं होती. पाऊस थांबला, पूर ओसरला.  आता गावात माघारी जायचं तर, काय बघायला लागणार याची मनानं तयारी करतानाही मनाला अजून खरं वाटत नव्हतं. चिखलगाळ तुडवत माणसं घरी चालली होती. शेतातलं होतं नव्हतं ते कुजून गेलेलं. जगल्यावाचल्या झाडाझुडपांवर पुरानं ओरबाडून नेल्याच्या खुणा. माती वहावलेल्या अंगावरच्या खाणाखुणा दाखवत होती. दावणी मोकळ्या झाल्या होत्या. कुठं गेली असतील ? हुंदके फुटत होते. जिवापाड जपून वाचवलेली काही जित्राबं खपाटी पोटानं दावणीला परत येत होती. काय घालायचं त्यांना ? माणसांना काही ना पोटाला मिळतंय. वैरणकाडी कुठनं आणायची ? रस्ते रडत होते. माणसं मुकी झाली होती. पशूपाखरं, कीडामुंगीचा तपास नव्हता. कुठं गेले असतील, इतके जीवजंतू ? डोकं भणाणणारे वास पसरलेले. घरात साठून राहिलेल्या पाण्यानं घराला घरपण ठेवलं नव्हतं. हेच आपलं घर, हे मनाला पटत नव्हतं. हे किराणा मालाचं दुकान, मेडिकल, कपड्यांचं दुकान, संगणक केंद्र, झेरॉक्स सेंटर, बेकरी, हॉटेलं, मंदीरं असलेलं हेच गाव होतं ना ? दरवाजे उघडले की डोळे फाटत होते. काळीज पिळवटत होतं. खालच्या घाणीतनं पाय उचलत नव्हते, कसं साफ करायचं ? 

आता मदतीचे ओघ येत होते, कमी होत होते. पूनर्वसनाचे विषय रंगत होते, मागं पडत होते. पूरग्रस्तांच्या चर्चा निवल्या होत्या. पण गावकऱ्यांच्या मनातले पूर मात्र ओसरले नव्हते. परिस्थितीनं दिलेले फटके बुजले नव्हते. जखमा भरून आल्या नव्हत्या. काय काय गमवावं लागलं या विचारांनी कोलमडलेली माणसं बळंच उभी रहात होती. एकमेकांना धीर देत होती, आधार देत होती. पूराच्या एका फटक्यानं आपल्याला किती वर्षे मागं लोटलं याचा अंदाज घेत होती. पाहुण्यारावळ्यांचे जन्माचे उपकार आठवत होती. जवानांची मदत डोळ्यापुढनं जात नव्हती. राज्याच्या वेगवेगळ्या भागातनं मदतीला अनेक हात सरसावले होते. आज ते आहेत, उद्या आपण असू या सहभावनेनं माणसं मदत करत होती. औषधोपचार करत होती. समाजमाध्यमांवरनं आवाहन करून मदत गोळा करून पाठवली जात होती. 

गावातल्या पुराची गोष्ट लिहिली जात होती, तेव्हा पुराच्या जखमा ओल्या होत्या. त्या कोरड्या होईपर्यंत या गोष्टीसारख्या अनेक गोष्टी लिहिल्या गेल्या. एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे गेल्या. पुढच्यास ठेचा मागचा शहाणा हे लक्षात येत होते. आयाबायांच्या डोळ्यांचे पदर कमरेला खोचले गेले. पुन्हा उभं राहण्यासाठी सगळं गाव धडपडायला लागलं. घराला घरपण येऊ लागलं. पुन्हा शाळा भरू लागली. पुन्हा कणा कविता घुमू लागली. पावसाचा निबंध लिहिताना, पोरांना पूर आठवू लागला. नदीची माहिती लिहिताना पोरं लिहायची, नदीला पुररेषा असते. पूर भेदणा-या माणसांच्या कथा सांगितल्या गेल्या, लिहिल्या गेल्या. मनामनाला हात घालत माती म्हणाली, उठ, उभा रहा. हवा म्हणाली, विसर पठ्ठ्या. हे जग लढण्यासाठी आहे, जगण्यासाठी आहे. एका पुराच्या अनेक कहाण्या चिखलापाण्यात वाहून गेल्या. अनेक नव्यानं जन्माला आल्या. उध्वस्त झालेली माणसं उभारण्याच्या वेडानं झपाटून आयुष्याच्या टिचलेल्या गारा सांधत पुन्हा नव्यानं उभी राहू लागली. इथं एका पुराची गोष्ट संपली नाही तर सुरू झाली होती. या गोष्टीत प्रकाश होळकर या कवीची एक कविता मिसळली होती,

घर गेले दार गेले

नुस्ता नुस्ता नुस्ता वारा

कोण वेडी वेचत बसली

आयुष्याच्या टिचल्या गारा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com