
Jalana News : जालना : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० मधून उभारण्यात आलेला बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण येथील सौर वीज प्रकल्प नववर्षाच्या सुरुवातीला बुधवारी (ता. १) कार्यान्वित करण्यात आला. यामुळे त्या परिसरातील ६ गावांतील सुमारे ११०० कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते फित कापून या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट, जालना मंडलाचे अधीक्षक अभियंता संजय सरग, भाजपचे जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, विधानसभा प्रमुख अनिल कोलते, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास मदन, एमईआयएलचे महाव्यवस्थापक अभिषेक गांगुली तसेच किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव जगताप, पंचायत समिती सदस्य तथा भाजपचे जिल्हा चिटणीस हरिश्चंद्र शिंदे, भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान मात्रे, युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस गणेश कोल्हे, तालुकाध्यक्ष भगवान बारगाजे, नगरसेवक पद्माकर जऱ्हाड, शिवसेना तालुका संघटक भगवानराव मदन, सरपंच कैलास मदन, उपसरपंच कैलास दाभाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० मधून महावितरणच्या उपकेंद्राच्या ५ किमी परिघातील जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यातून निर्माण होणारी वीज महावितरणच्या उपकेंद्रांतील फीडरद्वारे परिसरातील कृषिपंपांना दिवसा पुरवण्यात येत आहे. सौर प्रकल्प उभारण्यासाठी प्राधान्याने शासकीय जमिनी घेण्यात येत आहेत. केळीगव्हाण येथील ५ मेगावॅट क्षमतेचा सौर वीज प्रकल्पातून परिसरातील ६ गावांतील ११०० कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा केला जाणार आहे.
या वेळी आमदार कुचे म्हणाले, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे शेतकऱ्यांची दिवसा विजेची मागणी पूर्ण होऊन त्यांना दिलासा मिळेल. या योजनेतील जिल्ह्यातील दुसरा प्रकल्प बदनापूर मतदार संघात सुरू झाला आहे. या प्रकल्पासाठी आपण जागा मिळवून दिली. तसेच या योजनेसाठी महावितरणाला सर्वतोपरी सहकार्य केले.
शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने महावितरणच्या माध्यमातून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबवण्यात येत आहे. त्यामुळे दिवसा वीज मिळणे शक्य होईल.
- नारायण कुचे, आमदार, बदनापूर
कृषिपंपांना ऑटोस्विच लावल्यामुळे ट्रान्सफॉर्मर व उपकेंद्रावर विजेचा भार वाढतो. हा भार कमी होण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑटोस्विच काढून पंपास कॅपॅसिटर बसवावेत, जेणेकरून व्होल्टेज सुधारून सुरळीत वीजपुरवठा होईल.
- पवनकुमार कछोट, मुख्य अभियंता, महावितरण छत्रपती संभाजीनगर परिमंडल
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.