Ornaments : फॅशननुसार बदलले दागिने

एकशेवीस वर्षांत ग्रामीण महाराष्ट्रातील दागिन्यांचे आकर्षक जग सुद्धा प्रचंड बदलले आहे. आजही भारतीय स्त्रियांसाठी दागिने हाच सर्वांत आवडता व चर्चेचा विषय असू शकतो.
Ornaments
OrnamentsAgrowon
Published on
Updated on

एकशेवीस वर्षांत ग्रामीण महाराष्ट्रातील दागिन्यांचे (Maharashtrian Jewelry ) आकर्षक जग सुद्धा प्रचंड बदलले आहे. आजही भारतीय स्त्रियांसाठी दागिने (Jewelry) हाच सर्वांत आवडता व चर्चेचा विषय असू शकतो. दागिन्यांमध्ये भौगोलिक क्षेत्रानुसार पूर्वीसुद्धा फरक होता व आजही तो प्रकर्षाने जाणवतो. आता शहरी भागात हलक्या वजनाचे व जास्त आधुनिक डिझाइन असणारे तर ग्रामीण भागात जास्त वजनाच्या व पारंपरिक दागिन्यांना (Traditional Jewelry) पसंती दिली जाते.

१९५०-६० पर्यंत शाळेत जाणारी श्रीमंतांची मुले सोन्याची भिकबाळी घालत असत. हीच भिकबाळी आता नव्याने फॅशन म्हणून कानांमध्ये दिसत आहे. मानवाला धातूंचा शोध लागला तेव्हापासून धातूचे दागिने वापरण्याची पद्धत रुळली असावी. रामायण आणि महाभारताच्या काळापासून म्हणजे पाच ते सात हजार वर्षांपूर्वी सुंदर दिसण्यासाठी अलंकार वापरण्याची सुरुवात झाली. सुमारे दोन हजार वर्षे मौल्यवान रत्ने पुरवणारा भारत हा जगातला एक महत्त्वाचा देश होता. जगभरातले व्यापारी वेगवेगळ्या वस्तू देऊन येथून रत्ने घेऊन जात असत. राजेशाहीच्या काळात भरजरी अलंकार हे सत्तेचे, समृद्धीचे व प्रतिष्ठेचे लक्षण मानले गेले.

मोती, शिंपले, दगड, हाडांपासून बनवलेले दागिने आदिमानव काळापासून वापरात होते. धातूचा शोध लागल्यानंतर अलंकाराचे जगच बदलून गेले. एखादी व्यक्ती मरण पावल्यानंतर मृत देहाबरोबर सोने पुरण्याची पद्धत सुरू झाली. त्यामुळेच इजिप्तच्या पिरॅमिडमध्ये, मम्मीसोबत आणि कबरींमध्ये आजही पुरातत्त्व खात्याला सोन्याचे अलंकार आढळतात. इ.स. पूर्व १२०० ते १५०० या मध्यकालीन युगात राजे व सरदार यांनी आपला दर्जा दाखविण्यासाठी अंगावर सोने, चांदी आणि जडजवाहीर वापरण्यास सुरुवात केली. समाजातील गरीब लोक तांबे किंवा अन्य धातूचे अलंकार वापरीत.

Ornaments
Agriculture Labors : मजूर खरंच मजेत आहेत का ?

पूर्वीच्या अलंकारामध्ये धार्मिक प्रभाव होता. हीच अलंकाराची शैली नव्या रूपात टेंपल ज्वेलरी म्हणून भारतात नव्याने आली आहे. बहुतेक अलंकारांमध्ये आकार हे निसर्गातील पाने, फुले, देवदेवतांची चित्रे या आधारे बनवले गेले आहेत. विशिष्ट रत्ने विशिष्ट आजारासाठी वापरण्याची पद्धत होती. विविध राशींचे खडे व त्या राशींमध्ये असणारे धोके व आजार त्यांना प्रतिबंध करण्यासाठी रत्नांचा वापर होत होता.

१८ व्या शतकात हिऱ्यांना पैलू पाडून त्यांना अधिक चमकदार बनवण्याचे तंत्रज्ञान अधिक प्रगत झाले. गेली दोन शतके हिऱ्यांना ज्वेलरीमध्ये मानाचे स्थान मिळाले आहे. जगभर फिरणाऱ्या, स्थलांतरित होणाऱ्या व पर्यटक नागरिकांमध्ये हिऱ्यांचे दागिने वापरण्याचा कल वाढला आहे. हिरे आता घड्याळामध्ये, दातांमध्ये व पुरुषांमधील अनेक दागिन्यांमध्ये दिसू लागले आहेत.

Ornaments
Agriculture Recruitment : विभागीय परीक्षेद्वारे होणार कृषी पर्यवेक्षक भरती

१९ व्या शतकात औद्योगिक क्रांतीनंतर सामाजिकदृष्ट्या अनेक देश ढवळून निघाले. त्याचा परिणाम सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांवर झाला. अनेक छोटी छोटी यंत्रे व मशिनरी याद्वारे अधिक नाजूक काम करण्याचे तंत्रज्ञान प्रगत झाले. मध्ययुगीन काळातील शैली आणि आधुनिक काळातील डिझाईन यांचा संगम होऊ लागला. हौस म्हणून डिझाइनची साडी, पंजाबी ड्रेस आणि जिन्स वर शोभेल अशी वेगवेगळी ज्वेलरी वापरण्याकडे कल वाढला आहे. रेडिमेड ज्वेलरी, एक ग्रॅम गोल्ड, रंगीत खडे, रंगीत मोती, ऑक्साइड, प्लॅटिनम यांचा वापर वाढला आहे आणि क्राफ्ट ज्वेलरी, नावाची मशिरीचा वापर न करता हाताने बनवलेली ज्वेलरी ही नवी शाखा विकसित होत आहे.

पूर्वीच्या काळी भारतामध्ये सोन्याचा धूर निघायचा असे म्हणायचे. फक्त दागिन्यांविषयी लिहायचे म्हटले तरी अनेक पाने खर्च करावी लागतील. केशरचना करतानाच वेगवेगळी पदके केसांमध्ये वापरून सौंदर्य खुलवले जाई. नाग, चंद्र, सूर्य, स्वस्तिक, केवडा या चित्रांची पदके घालून आंबाडा सजवण्याची पद्धत होती. भांगामध्ये भागी, बिजवरा, बोर, बिंदी अशी आभूषणे लावली जात. कान टोचून घालायची कर्णभूषणे हे आपल्या संस्कृतीचे लक्षण मानले गेले. पेशव्यांच्या काळात मोत्याचे किंवा सोन्याचे मणी वापरून कुळ्या केलेली कुडी हे अलंकार प्रसिद्ध होते.

झुंबर, बाली, वेल, बोकर, झुमके, कर्ण फुले अशी कर्णभुषणे प्रसिद्ध पावली. हाताचा विचार केला तर बोटावर घालायचे दागिने, दंडावर घालायचे दागिने, मनगटावर घालायचे दागिने असे तीन ठळक प्रकार पडतात. पायामध्ये घालायचे पैंजण, पाळे, चाळ, तोरड्या व पायांच्या बोटांमध्ये घालायचे अंगुष्ठा, जोडवी, मासोळी, वेढणी असे अनेक प्रकारचे दागिने घातले जात. पायात घालायचे अनेक दागिने हे चांदीचे किंवा तांब्याचे असत. लहान मुलांच्या पायात तांब्याचे वाळे घालण्याची पद्धत आहे.

हिंदू संस्कृतीत मंगळसूत्र हा सौभाग्यवती स्त्रीचा महत्त्वाचा अलंकार आहे. मंगळसूत्रांनाच कंठा, गोफ, पोत, गुंठन, डोरले, बिरडे अशी अनेक नावे त्यांच्या प्रकारानुसार पडली. दंडावरच्या दागिन्यांमध्ये बाजूबंद, नागबंद, नागोडा, बाभी, तोळे बंद, वेढा असे अनेक चांदीचे दागिने मनगटांवर वापरायच्या पाटल्या, गोट, गजरा, जंबे, बांगड्या असे दागिने वापरले जात. अलंकारांचे जग आता प्रचंड विस्तारले असून, ज्वेलरी डिझाइन हे नवे करिअर बनू पाहत आहे. थेट शरीरामध्ये सर्जरी करून डायमंड, सोने, चांदी बसवण्यापर्यंत ही फॅशन पोहोचली. ‘शरीर हा एक दागिना आहे’ हे अनेक वर्षे आपण ऐकत असलेले सुभाषित मात्र शरीरावर दागिने बसवून मानवजात खोटे ठरवत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com