Maharashtra village development through water conservation: महाराष्ट्रामध्ये सध्या पाणी व्यवस्थापन आणि हवामान बदल यांचा प्रश्न अत्यंत गंभीर स्वरूप धारण करत आहे. राज्यातील धरणांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत काही धरणात काही प्रमाणात अधिक पाणीसाठा उपलब्ध असला, तरी वाढती उष्णता, बाष्पीभवनाचे वाढते प्रमाण आणि संभाव्य ‘एल निनो’ परिस्थितीमुळे आगामी काळात पाण्याचे संकट अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार २०२६ मध्ये महाराष्ट्रात विशेषतः मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि पर्जन्यछायेच्या भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे..एल निनो सक्रिय झाल्यास त्याचा सर्वाधिक परिणाम मराठवाडा, विदर्भ आणि राज्यातील पर्जन्यछायेच्या भागांवर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पाऊस कमी झाल्यास खरीप शेती धोक्यात येईल, भूजल पातळी आणखी खाली जाईल आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनेल.परिणामी, शेतीवर अवलंबून असलेल्या ग्रामीण कुटुंबांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. विशेषतः ऊस तोड मजूर म्हणून पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकाकडे होणारे हंगामी स्थलांतर पुन्हा तीव्र होण्याची शक्यता आहे. जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी महाराष्ट्रातील दुष्काळी भागात जलसंधारण, भूजल पुनर्भरण आणि योग्य पीक पद्धतीचा अवलंब तातडीने करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे..Water Storage Management: पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करा : जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष.मराठवाड्यातील बीड जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक दुष्काळग्रस्त जिल्ह्यांपैकी एक मानला जातो. कमी आणि अनियमित पर्जन्यमान, भूजल पातळीतील सतत होणारी घट, कोरडवाहू शेती आणि अपुरी सिंचन व्यवस्था यामुळे येथील ग्रामीण अर्थकारण दीर्घकाळ अस्थिर राहिले आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान सुमारे ६७४ मिमी असून, पावसाचे दिवस केवळ ३० च्या आसपास आहेत. परिणामी, खरीप हंगामानंतर मोठ्या प्रमाणावर पाण्याची टंचाई निर्माण होते. विशेषतः गेवराई तालुक्यासारख्या भागात उन्हाळ्यात विहिरी, कूपनलिका आणि तलाव कोरडे पडतात. .यामुळे शेती आणि रोजगाराचे प्रश्न गंभीर बनतात. बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बंजारा समाज वास्तव्यास असून, त्यांचे जीवन पारंपरिकपणे शेती, पशुपालन आणि मजुरीवर आधारित आहे. मात्र स्थानिक रोजगाराच्या मर्यादा आणि पाण्याअभावी शेती अस्थिर झाल्याने हजारो कुटुंबांना दरवर्षी ऊस तोड मजूर म्हणून पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकात स्थलांतर करावे लागते. नोव्हेंबर ते एप्रिल या कालावधीत संपूर्ण कुटुंबे गाव सोडून जात असल्याने मुलांचे शिक्षण, महिलांचे आरोग्य आणि सामाजिक जीवनावर गंभीर परिणाम होतो. अशा परिस्थितीत जलसंधारण आणि स्थानिक रोजगार निर्मिती हेच या भागातील परिवर्तनाचे मुख्य साधन ठरू शकते..जलसंधारणातून घडणार ग्रामीण परिवर्तनाचा आदर्शजयराम नाईक तांडा (ता. गेवराई, जि. बीड) हे सुमारे १५०० लोकसंख्या असलेले गाव आज ग्रामीण परिवर्तनाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. गावात सुमारे ३२० कुटुंबे असून त्यामध्ये ७३९ महिला आणि ७६१ पुरुषांचा समावेश आहे. गावातील ० ते ११ वयोगटातील मुलांची संख्या सुमारे ९५ असून, पहिली ते पाचवीपर्यंत शिकणारे सुमारे १०० विद्यार्थी आहेत.काही वर्षांपूर्वीपर्यंत हे गाव दुष्काळ, पाण्याची टंचाई, हंगामी स्थलांतर आणि अस्थिर शेती व्यवस्थेमुळे ओळखले जात होते. मात्र २०२२ नंतर या गावाने लोकसहभाग, जलसंधारण आणि शाश्वत शेतीच्या माध्यमातून विकासाचा नवा मार्ग स्वीकारला आहे. आज या गावात घडत असलेला बदल केवळ एका गावापुरता मर्यादित नसून तो मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागांसाठी प्रेरणादायी मॉडेल ठरत आहे..२०२२ मध्ये जयराम तांड्यातील सुमारे ६२.५ टक्के कुटुंबे ऊस तोडीसाठी स्थलांतरित होत होती. नोव्हेंबर ते एप्रिल या सहा महिन्यांच्या कालावधीत संपूर्ण कुटुंबे गाव सोडून पश्चिम महाराष्ट्र किंवा कर्नाटकात जात असत. या स्थलांतराचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर, महिलांच्या आरोग्यावर आणि गावाच्या सामाजिक संरचनेवर होत होता.आज मात्र हे चित्र मोठ्या प्रमाणावर बदलले आहे. स्थलांतराचे प्रमाण आता केवळ १५.६२ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. गावातील नागरिकांचे मत आहे, की तलावातील गळती पूर्णपणे थांबविण्यात यश आले, तर हे स्थलांतर जवळपास शून्यावर येऊ शकते. (संदर्भ : स्थानिक स्रोत) या परिवर्तनामागे मुख्य आधार ठरला तो जलसंधारण आणि ओढा खोलीकरणाचा..Water Conservation Management: पाण्याचे दुर्भिक्ष कमी करण्यासाठी जलसंधारणाचे उपाय.जयराम तांड्याजवळून वाहणारा आणि सिंदफणा नदीला मिळणारा सुमारे सात किलोमीटर लांबीचा ओढा गाळाने पूर्णपणे भरला होता. परिणामी, पावसाळ्यात पूरसदृश स्थिती निर्माण होत होती, तर उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई भासत होती.गाव तलावाची साठवण क्षमता कमी झाली होती आणि परिसरातील विहिरी आणि कूपनलिका मार्चनंतर कोरड्या पडत होत्या. या समस्येचा अभ्यास करून लोकसहभागातून ओढा खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले..पाणीदार टीमगावाचा एक कृतिशील गट तयार होतो. या संपूर्ण प्रक्रियेत गावातील तरुण मंडळी, लोकप्रतिनिधी, महिला समाविष्ट असतात. पाण्याचा ताळेबंद, शिवारफेरी, जलस्रोत पाहणी त्यांची सद्यःस्थिती या बाबी प्रत्यक्ष पहिल्याने त्यांच्या क्षमता मोठ्या प्रमाणावर विकसित होतात. आणि ते लोकसहभागाचा भाग बनतात.याच लोकांचा गाभा गट तयार होतो. पुढील कामाची जबाबदारी त्यांचीच असते. तथापि त्यांची क्षमता बांधणी करण्यात येते. ज्यामध्ये भूरचना, पाण्याचा प्रवाह, मातीचा पोत, गावचे पाणी काही दशकपूर्ती कसे होते? आजची स्थिती काय याचा देखील त्यांना अंदाज येतो..पाण्याअभावी झालेल्या किंवा होत असलेल्या समस्यांचा झळा त्यांनी पाहिलेल्या असतात, सोसलेल्या असतात. गट. तट विसरून पाणी समस्येवर मात करण्यासाठी ते मनाने एकत्र येतात आणि पाणीदार गावाचे ते जलदूत, जलसेवक बनतात..नदी की पाठशाला यांच्या तांत्रिक सहकार्याने गेल्या पाच वर्षांत पाचेगाव पंचक्रोशीत नदी, ओढे आणि जलस्रोत यांचा अभ्यास आणि पुनरुज्जीवनाचे महत्त्वपूर्ण काम करण्यात आले आहे. जयराम नाईक तांडा येथे सुमारे चार किलोमीटर आणि पाचेगाव परिसरात पाच किलोमीटर नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामे यशस्वीपणे पूर्ण झाली आहेत. या कामासाठी आर्थिक साह्य ही नभांगण फाउंडेशनतर्फे मार्फत देण्यात आले..जयराम नाईक तांड्यावरील या कामांचे परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागले आहेत. गावात सुमारे ७५ एकर क्षेत्रावर रेशीम शेती सुरू झाली आहे. पूर्वी फक्त खरीप हंगामावर अवलंबून असलेली शेती आता दुबार पिकांकडे वळली आहे. सुमारे ८०० एकर जमिनीवर खात्रीने खरीप, रब्बी आणि काही प्रमाणात उन्हाळी पिके घेतली जात आहेत. यामुळे पिकांची घनता जवळपास २०० टक्क्यांपर्यंत वाढली आहे. म्हणजेच ९०० एकर क्षेत्रावर वर्षभरात जवळपास १,८२५ एकरांवर पिके घेतली जात आहेत. हे ग्रामीण अर्थव्यवस्थेतील मोठे परिवर्तन मानले जाते. विशेष म्हणजे या विकास प्रक्रियेत केवळ शेतीच नव्हे, तर शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यांनाही प्राधान्य देण्यात आले आहे. .आधुनिक डिजिटल शाळा, आरोग्य शिबिरे, महिला आरोग्य उपक्रम, तरुणांसाठी रेशीम शेतीसारखे उद्योग आणि स्थानिक रोजगार निर्मिती यामुळे गावातील सामाजिक जीवनातही सकारात्मक बदल घडू लागले आहेत. या सर्व प्रक्रियेचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे लोकसहभाग. गावकऱ्यांनी गाळ स्वखर्चाने उचलण्याची तयारी दर्शविली आहे. शासन, सामाजिक संस्था आणि ग्रामस्थ यांचे संयुक्त प्रयत्न झाल्यास दुष्काळग्रस्त भागातही शाश्वत परिवर्तन घडू शकते, याचे हे उदाहरण आहे.- डॉ.सुमंत पांडे ९७६४००६६८३(माजी कार्यकारी संचालक, जलसाक्षरता केंद्र, यशदा, पुणे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.