Nagar News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुंबईला मराठा समाजासोबत निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांचे नगर जिल्ह्यातील मिडसांगवीपासून नगर (बाराबाभळी) पर्यंत रविवारी (ता.२१) जोरदार स्वागत करण्यात आले.
ढोलताशांच्या निनादात जागोजागी फुलांची उधळण झाली. महिलांनी रांगोळी काढली होती. दरम्यान, रॅलीत सहभागी आंदोलकांसह मोठ्या प्रमाणात वाहने सहभागी असल्याने नगर- पाथर्डी- पाडळसिंगी महामार्ग काही काळ बंद ठेवावा लागला व मार्गावरील वाहतूक अन्यत्र वळवली.
मातोरी (ता. शिरूर कासार) मुक्कामानंतर मुंबईकडे जाणारी मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा रविवारी (ता. २१) सकाळी पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी येथे आली. त्यानंतर खरवंडी कासार, येळी, पाथर्डी, निवडुंगे, तीसगाव, करंजी मार्गे बाराबाभळी (नगर) येथे मुक्कामी आली.
पाथर्डी तालुक्यातील आगसखांड येथे साधारण चार ते पाच लाख लोक जेवतील एवढी दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. तेथे मनोज जरांगे यांनी कार्यकर्ते, मराठा समाजाशी संवाद साधला.
मिंडसांगवीपासून बाराबाभळी (नगर) पर्यंत प्रत्येक गावांतील लोक स्वागतासाठी रस्त्यावर थांबले होते. महिलांनी रस्त्यावर रांगोळ्या काढल्या, सर्वच ठिकाणी जेसीबीतून फुलांची उधळण करण्यात आली. पदयात्रेत जागोजागी पाथर्डी, शेवगाव, नेवासा, कर्जत, जामखेड तालुक्यांतील लोक मुंबईला जाण्यासाठी सहभागी झाले.
दरम्यान, पदयात्रेत मोठ्या प्रमाणात नागरिक, वाहने सहभागी असल्याने नगरहून, तिसगाव, पाथर्डी मार्गे मराठवाड्यात जाणाऱ्या वाहनांची अडचण झाली. जागोजागी स्वागत होत असल्याने नगरला यायला रात्री उशिर झाला होता.
नगर- पाथर्डी- मिंडसांगवीपर्यंत वाहतूक बंद ठेवावी लागली. आज (ता. २२) नगर येथून सुपा मार्गे पदयात्रा शिरूर (घोडनदी) येथे पुणे जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. पुण्यात खराडी बायपास येथे मुक्काम आहे. दुपारी सुपा येथे जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.