
- मतीन शेख
हवेत गारठा, पोटात भुकेची आग, मनात नोकरी मिळवण्याची इर्षा. हे सगळं अंगाशी घेवून शंभरएक तरणीबांड पोरं १० रुपयाच्या शिवभोजन थाळीसाठी जीवाचा आटापिटा करत ताटकळ थांबलेली आहेत.
सकाळी हे चित्र पाहिलं अन् पोटात कालवा कालव झाली.
पोलिस भरतीसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून कोल्हापुरात आलेली ही पोरं.
सकाळी रेल्वे स्टेशन जवळच्या शिवभोजन थाळी मिळवण्यासाठी लागलेली यांची रांग पाहुन मनोमन पहिला प्रश्न हाच उमटला की, 'हाच का आपला तरुणांचा देश?'
नव्या संकल्पने प्रमाणे 'न्यू इंडिया'.
आई बापाने दिलेला मोजकाच पैसा खिशातून संपू नये म्हणून १० रुपयाच्या अन्नासाठी या पोरांनी असं रस्त्यावर त्या अन्नाची वाट पाहत रांगा लावाव्यात हे आपलं, देशाचं अन् या व्यवस्थेच दुर्दैव.
घरातलं दारिद्र्य दुर व्हावं, आई बापाचं कष्ट कमी व्हावं, नोकरी मिळावी या उद्देशानं धावणाऱ्या पोरांच्या पोटाला चिमटाच म्हणावा की हा.
भले बापानं जरा जास्तीचे पैसे दिले तरी, ही पोरं चांगल्या हॉटेल मध्ये गेलो तर जास्तीचे पैसे द्यावे लागतील म्हणून तिकडे जाणारच नाही याची गॅरंटी आहे.
घामाची, कष्टाची त्यांच्याकडे जाण असते. २०१३ ला पुण्यात पोलिस भरतीला गेलो होतो. खडकी जवळ भरती प्रक्रिया होती.
रनिंगचा इव्हेंट पुणे विद्यापीठात घेतलेला. ५ किमी धावून झालं होतं.
पोटात भुकेचा आगडोंब माजला. मागच्या गेटने विद्यापीठाच्या बाहेर पडलो.
जेवणाचा शोध घेतला. १०० रुपयाला राईस प्लेट. हॉटेल मालकाने पोरं बघून रेट वाढवला होता.
खिश्यात परवा फडात कुस्ती मारलेलं इनाम १००० भर रुपये शिल्लक होतं.
वरुन वडीलांनीही दिलेलं, पण जेवणाला शभंरची नोट मोडायला नको म्हणून अख्या विद्यापीठाला वळसा घालून ३० रुपयाचे दोन समोसे खाऊन भुकेच्या डोंबावर पाणी ओतलं.
जवळपास पास दहा वर्षाचा काळ गेला. पण सध्याच्या 'न्यू इंडिया'चा उदयानंतर ही या बेरोजगार पोरांच्या भुकेचा निखारा विझला नाही हे देशाचे की या तरुणांचं दुर्दैव...?
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.