
डॉ. अरविंद पांडागळे, डॉ. खिजर बेग
Cotton Update : कापूस पिकाच्या जागतिक उत्पादकता (७५० किलो) आणि राष्ट्रीय उत्पादकता (४३९ किलो रुई) पाहता महाराष्ट्राची उत्पादकता (३२९ किलो) फारच कमी आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्राच्या कापूस क्षेत्रापैकी मोठ्या प्रमाणात कोरडवाहू लागवड होते.
कोरडवाहू शेतकऱ्यासाठी कापूस हे महत्त्वाचे नगदी पीक आहे. अशा स्थितीमध्ये या शेतकऱ्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी अनुरूप लागवड पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे.
विदेशातील लागवड पद्धतींचा अभ्यास करून त्यांच्या प्रमाणेच भारतातही कमी अंतरावर लागवड करून हेक्टरी रोपांची संख्या वाढविल्यास उत्पादकता वाढविता येऊ शकते, यावर संशोधन सुरू झाले. मात्र भारतात प्रामुख्याने संकरित कापूस वाणांची लागवड होते.
या बियाण्यांच्या किमती अधिक असल्याने उत्पादन खर्चात वाढ होते. सोबतच अधिक वाढ असणाऱ्या संकरित वाणांची लागवड कमी अंतरावर केल्यास झाडांमध्ये दाटी होऊन त्याचे दुष्परिणाम होण्याची भीती असते. यासाठी मागील दहा वर्षांत संशोधन होऊन कोरडवाहू भागातील शेतकऱ्यासाठी सघन कापूस लागवड पद्धत विकसित करण्यात आली आहे.
सघन लागवड पद्धत म्हणजे काय?
कपाशीची लागवड कमी अंतरावर करून हेक्टरी / एकरी झाडांची संख्या म्हणजेच घनता वाढविणे, यालाच सघन लागवड पद्धत म्हटले जाते. सघन लागवड पद्धतीमध्ये योग्य लागवडीचे अंतर, त्यासाठी अनुरूप वाणांची निवड, पिकाची वाढ नियंत्रित ठेवण्यासाठी वाढ व्यवस्थापन आणि वाढविलेल्या झाडांच्या संख्येसाठी पुरेसा अन्नद्रव्यांचा पुरवठा या बाबींवर लक्ष केंद्रित करावे लागते.
१) लागवडीचे अंतर :
-रोपांची संख्या वाढविण्यासाठी लागवडीचे अंतर कमी करायचे असते. त्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये केलेल्या संशोधनानुसार बीटी कापूस वाणांच्या लागवडीसाठी ९० × ३० सेंमी (३ × १ फूट) अंतराची शिफारस केलेली आहे.
म्हणजेच दोन ओळींतील अंतर ९० सेंमी (३ फूट) ठेऊन दोन झाडांतील अंतर ३० सेंमी (१ फूट) ठेवावे. या अंतरावर लागवड केल्यास एक एकर क्षेत्रामध्ये १४५२० रोपे बसतील.
-सर्वसाधारणपणे महाराष्ट्रात विभागनिहाय व माती प्रकारानुसार कपाशीची लागवड ३ × २ फूट, ४ × १.५ फूट, ३ × ३ फूट, ४ × ३ फूट, ५ × १ फूट, ६ × १ फूट अशा विविध अंतरावर करण्यात येते. म्हणजेच या विविध पारंपरिक अंतरावरील लागवडीमध्ये एकरी झाडांची संख्या ७२६०, ४८४०, ३६३०, ८७१२ अशी असते. पारंपरिक लागवड पद्धतीपेक्षा सघन लागवडीमध्ये एकरी झाडांची संख्या दुप्पट ते चारपट राहते. या सघन लागवडीमध्ये एका झाडाला सरासरी २० बोंडे / कैऱ्या लागतील, असे अपेक्षित आहे.
२) वाणांची निवड :
सामान्यतः बीटी कापूस लागवडीमध्ये दीर्घ कालावधीची, वाढ अधिक असणारे व खत आणि सिंचनास प्रतिसाद देणारे संकरित वाण मोठ्या प्रमाणात वापरले जातात. तथापि, सघन लागवड पद्धतीसाठी आटोपशीर ठेवण असणारे (कॉम्पॅक्ट) वाण निवडणे आवश्यक आहे.
म्हणजेच असे वाण की ज्यांच्या फांद्यांची लांबी आणि झाडाची उंची कमी आहे. बाजारातील बहुतांश वाण या निकषांमध्ये बसत नाहीत. काही निवडक कंपन्यांचे विशिष्ट वाणच सघन लागवडीस उपयुक्त आहेत. त्यामुळे सघन लागवडीसाठी उंची आणि फांद्यांची लांबी कमी असणारेच वाण निवडावे.
३) वाढरोधकाचा वापर :
सघन लागवडीमध्ये झाडांची वाढ आटोक्यात (उंची तीन फुटांपर्यंत) ठेवण्यासाठी वाढरोधकांचा वापर करणे आवश्यक आहे. याकरिता मेपीक्वाट क्लोराइड या वाढरोधकाच्या १२ मिलि प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे दोन वेळा फवारण्या कराव्या लागतील. यापैकी पहिली फवारणी पिकास पाते लागण्याच्या काळात (सरासरी ४५ दिवस) व दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांनी म्हणजेच ६० दिवसांच्या (फुले लागण्याच्या) काळात करावी.
फवारणी करताना जमिनीमध्ये ओल असणे आवश्यक आहे. जमिनीमध्ये ओल नसल्यास पाऊस होईपर्यंत ३-४ दिवस फवारणीसाठी थांबावे अथवा उपलब्धता आल्यास संरक्षित सिंचन देऊन फवारणी करावी.
या वाढरोधकाच्या फवारणीमुळे कापूस पिकाच्या कांड्यांमधील अंतर कमी होते. म्हणजेच शाकीय वाढीसाठी वापरले जाणारे अन्नघटक फुले लागणे आणि बोंडाच्या वाढीकरिता वापरली जातात. म्हणजेच झाडाची उंची आणि फांद्यांची लांबी आटोक्यात राहते, पण फुले आणि बोंडांची वाढ होते. सघन लागवडीमध्ये पिकाची वाढ जास्त झाल्यास अपेक्षित उत्पादन मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. (* लेबल क्लेम आणि ॲग्रेस्को शिफारस दोन्ही आहे.)
४) खत व्यवस्थापन :
आपण सघन लागवडीमध्ये झाडांची एकरी संख्या वाढविलेली असते. त्यांची वाढ आटोक्यात ठेवूनही या वाढलेल्या झाडांपासून अपेक्षित वाढीव उत्पादन यांचे एकत्रित एकरी जैविक वजन (शाकीय वाढ + कपाशीचे वजन) अधिक होणार आहे.
या कापसाच्या वाढलेल्या जैविक उत्पादनासाठी आवश्यक अन्नपुरवठा करण्यासाठी आपल्या विभागात पारंपारिक पद्धतीने बीटी कापूस पिकासाठी असलेल्या शिफारशीपेक्षा (पारंपरिक शिफारस १२० N ः ६० P ः ६० K) यापेक्षा स्फुरद आणि पालाशची मात्रा २५ टक्के अधिक द्यावी.
मात्र नत्राची एक व दोन महिन्यांनी द्यावयाची मात्रा देण्यापूर्वी पिकाची वाढ पाहूनच निर्णय घ्यावा. वाढ समाधानकारक असल्यास नत्राची मात्रा वाढवू नये. अन्यथा, नत्राची मात्रा जास्त होऊन शाकीय वाढ जास्त होईल आणि पाते-फुले यांची संख्या कमी होईल. म्हणून नत्रयुक्त खतांचा वापर कमी करावा.
संपर्क - डॉ. अरविंद द. पांडागळे (सहायक कृषिविद्यावेत्ता), ७५८८५८१७१३, डॉ. खिजर स. बेग (कापूस विशेषज्ञ), ७३०४१२७८१०, (कापूस संशोधन केंद्र, नांदेड अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.