Orchard Integrated Management : मृग बहरात यशस्वी फुलधारणेसाठी एकात्मिक व्यवस्थापन

Orange Orchard : संत्रा बागेतून हमखास व शाश्वत उत्पादन मिळविण्याकरिता झाडांचे आरोग्य अत्यंत महत्त्वाचे ठरते. झाडाच्या आरोग्यामध्ये पानांची संख्या व पानांचा आकार महत्त्वाचा असतो.
Orange
OrangeAgrowon

Orange Update : भारतात संत्रा या पिकाखाली ४.२८ लाख हे. क्षेत्र असून, ५१.०१ लाख टन उत्पादन होते. सरारारी उत्पादकता ९.३ टन प्रति हेक्टर एवढी आहे. देशात दशकभरापूर्वीपर्यंत संत्रा उत्पादनामध्ये वर्चस्व असलेल्या महाराष्ट्राची सद्यःस्थिती चिंताजनक आहे.

लागवड क्षेत्रामध्ये दुसऱ्या स्थानी असलेले हे राज्य उत्पादनामध्ये तिसऱ्या स्थानी आहे. उत्पादकता फक्त ७.४३ टन प्रति हेक्टरी असल्याने उत्पादकतेमध्ये चक्क १० व्या स्थानापर्यंत घसरण झाली आहे. या मागील कारणांचा विचार केला असता बहराच्या नियोजनामध्ये येणाऱ्या अडचणी हे अत्यंत महत्त्वाचे कारण ठरत आहे.

संत्रा बागेतून हमखास व शाश्वत उत्पादन मिळविण्याकरिता झाडांचे आरोग्य अत्यंत महत्त्वाचे ठरते. झाडाच्या आरोग्यामध्ये पानांची संख्या व पानांचा आकार महत्त्वाचा असतो. त्यासाठी मृग, हस्त व आंबिया अशा तीनही हंगामात येणाऱ्या नवीन पालवीची काळजी घेणे गरजेचे आहे. सुदृढ झाडावर किमान ३० ते ४० हजार निरोगी पानांची संख्या असावी.

या नवतीसोबत फुलेसुद्धा येतात. संत्र्यामध्ये प्रामुख्याने दोन हंगामात फुले येतात. आंबिया बहरात जानेवारी -फेब्रुवारी महिन्यामध्ये, तर जून-जुलैमध्ये येणाऱ्या मृग बहरात. योग्य परिस्थितीमध्ये प्रति झाड जवळपास एक लाखापर्यंत फुले येतात. काढणीपर्यंत जास्तीत जास्त १००० फळे ठेऊन उच्च प्रतीचे उत्पादन घेण्याचे नियोजन असावे.

Orange
Orange Orchard : योग्य परिस्थितीतच संत्रा बागांचा ताण सोडावा

संत्रा झाडे जमिनीतून नियमितपणे अन्नद्रव्य आणि पाणी शोषून घेत असतात. त्यामुळे संत्रा झाडांची वाढ सारखी सुरू राहते. आंबिया बहर हा नैसर्गिक बहर असून, थंडीच्या काळात बागांना नैसर्गिकरीत्या ताण बसतो. ती विश्रांती अवस्थेत जाऊन झाडांची वाढ थांबते. फांद्यामध्ये अन्नसाठा होते. मात्र मृग बहरात ही परिस्थिती नैसर्गिकरीत्या निर्माण होत नाही.

बहर घेण्यासाठी कृत्रिमरीत्या झाडांची वाढ थांबवून झाडास विश्रांती द्यावी लागते. यालाच आपण ताण देणे असे म्हणतो. यामुळे झाडांच्या वाढीकरिता खर्च होणारी अन्नद्रव्ये झाडांच्या फांद्यामध्ये साठवली जातात. त्याचे योग्य प्रमाण होताच पोषक हवामान मिळताच बहराची फुले नवीन नवतीसोबत दिसू लागतात. त्याकरिता खालील प्रमाणे मृग बहर व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे.

-अन्नसाठ्याच्या योग्य उपयोग होण्यासाठी मार्च महिन्यात नवीन नवती येऊ नये, यासाठी मार्च ते जून या काळात बहुतांश बागायतदारांनी योग्य ती काळजी घेतली असेल. विशेषतः मार्च ते जून या कालावधीत पाणी व नत्रयुक्त खतांचा वापर बंद केलेला असेल. आता ताण तोडण्यासाठी बागेत सिंचनाची पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी

- अधिक पावसाच्या स्थितीमध्ये बागेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी चर घेऊन ठेवावेत.

-संपूर्ण वाढ झालेल्या उत्पादनक्षम बागेत शक्यतो आंतरपीक घेणे टाळावे. आंतरपिकाची अन्नद्रव्ये, पाणी, हवा व सूर्यप्रकाशासाठी मुख्य पिकासोबत स्पर्धा होऊ शकते. बागेतील पुढील कामांच्या नियोजनातही अडथळा येऊ शकतो.

-आंतरपीक घ्यावयाचे असल्यासच फक्त झाडाच्या बाहेरील घेरामध्ये मूग, उडीद, सोयाबीन सारखीच पिके घेता येतील.

-ताण सोडण्यापूर्वी बोर्डो मिश्रणची एक फवारणी घ्यावी. नंतर पोटॅशिअम नायट्रेट (१३:००:४५) दीड किलो प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

-मृग बहराकरिता पोषक हवामान - बहर येण्याकरिता किमान ३ इंच पाऊस, आवश्यक तापमान हे ३८ अंश सेल्सिअसपेक्षा कमी असावे. आर्द्रता ही कमीत कमी ६५ टक्के असावी.

- मृग बहर फळांच्या वाढीच्या अवस्थेनुसार ९००:३००:३०० ग्रॅम नत्र : स्फुरद : पालाश प्रति झाड एकूण पाच टप्प्यात विभागून द्यावे.

एकात्मिक पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना शेणखताची मात्रा ३० किलो प्रति झाड आणि बाग ताण सोडताना पहिल्या टप्प्यात नत्र

२७० ग्रॅम (५२८ ग्रॅम युरिया) १२० ग्रॅम स्फुरद (७५० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट) अधिक ३० ग्रॅम पालाश (पोटॅश ५० ग्रॅम) प्रति झाड या प्रमाणे बाहेरील घेरात मातीआड द्यावे. सोबतच जमिनीत पुरेसा ओलावा असताना जैविक निविष्ठांचा वापर करावा.

कुजलेल्या शेणखतासोबत मिसळून व्हीएएम (VAM) ५०० ग्रॅम अधिक ॲझोस्पिरिलम जिवाणू १०० ग्रॅम अधिक पीएसबी १०० ग्रॅम अधिक ट्रायकोडर्मा हरजियानम १०० ग्रॅम प्रति झाड द्यावे. सोबतच सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसत असेल तर त्यानुसार झिंक, बोरॉन, फेरस आणि मॅग्नेशिअम १०० ते २०० ग्रॅम प्रति झाड शिफारशीप्रमाणे द्यावे.

संपूर्ण बहरातील खतांचे नियोजन असे करावे

मृग बहार --- नत्र (९०० ग्रॅम/झाड) --- स्फुरद (३०० ग्रॅम/झाड) --- पालाश (३०० ग्रॅम/झाड)

महिना --- प्रमाण (टक्के) --- नत्र --- युरिया --- प्रमाण (टक्के) --- स्फुरद --- सिंगल सुपर फॉस्फेट --- प्रमाण (टक्के) --- पालाश --- म्युरेट ऑफ पोटॅश

जून --- ३० --- २७० --- ५८६ --- ४० --- १२० --- ७५० --- १० --- ३० --- ५०

ऑगस्ट --- ३० --- २७० --- ५८६ --- ३५ --- १०५ --- ६५६ --- १० --- ३० --- ५०

ऑक्टोबर --- २० --- १८० --- ३९० --- २५ --- ७५ --- ४६९ --- ३० --- ९० --- १५०

डिसेंबर --- १० --- ९० --- १९५ --- ० --- ० --- ० --- २५ --- ७५ --- १२५

फेब्रुवारी --- १० --- ९० --- १९५ --- ० --- ० --- ० --- २५ --- ७५ --- १२५

एकूण --- १०० --- ९०० --- १९५३ --- १०० --- ३०० --- १८७५ --- १०० --- ३०० --- ५००

Orange
Orange Orchard Management : अमरावतीच्या योगेश झाडे यांनी केलंय उत्कृष्ठ संत्रा नियोजन

-फूट निघण्यास मदत होण्यासाठी १२:६१:०० दीड किलो अधिक फॉलिक ॲसिड ५ ग्रॅम अधिक बोरॉन १५० ग्रॅम अधिक झिंक १५० ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी घ्यावी.

-या कालावधीत पावसात खंड पडल्यास तुषार सिंचन, रेन पाइप किंवा ठिबकद्वारे बागेत व बागेच्या सभोवती पाणी द्यावे. दहा दिवसाच्या अंतराने पोटॅशिअम नायट्रेट एक टक्के (एक किलो प्रति १०० लिटर या प्रमाणे) फवारणी करावी.

-याच्या उलट म्हणजे फूल धारणेच्या कालावधीत एक आठवड्यापेक्षा जास्त काळ सतत पाऊस सुरू राहिल्यास फुलांची गळ होऊन फळधारणेवर विपरीत परिणाम होतो. अशा परिस्थितीत फळधारणेसाठी व चांगल्या वाढीसाठी जी.ए.३ (१० पीपीएम म्हणजे) १ ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम १०० ग्रॅम अधिक बोरॉन ३०० ग्रॅम प्रति १०० लिटर या प्रमाणे फवारणी करावी. यात चिलेटेड बोरॉन असल्यास १०० ग्रॅम आणि साधे बोरॉन असल्यास ३०० ग्रॅम प्रमाण ठेवावे.

- फळगळ होत असल्यास जून ते जुलै महिन्यात बोरॉन ३०० ग्रॅम अधिक जिबरेलिक आम्ल (१५ पीपीएम म्हणजे) दीड ग्रॅम अधिक , १३:००:४५ हे खत (१.५ % म्हणजेच) दीड किलो अधिक कॉपर ऑक्सिक्लोराईड ३०० ग्रॅम प्रति १०० लिटर या प्रमाणे फवारणी घेतल्यास फायदेशीर ठरते.

संपर्क - निवृत्ती पाटील, ९९२१००८५७५, (विषय विशेषज्ञ - उद्यानविद्या, सुविदे फाउंडेशन, कृषी विज्ञान केंद्र, वाशीम)

(या लेखामध्ये डॉ. पीडीकेव्ही अकोला आणि राष्ट्रीय लिंबूवर्गीय संशोधन केंद्राच्या शिफारशी वापरलेल्या आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com