Natural Resources : नैसर्गिक साधनसंपत्ती जपण्यासाठी संस्थात्मक प्रयत्न

Agriculture Planning : हिवरे बाजारमध्ये लोकसहभागातून नैसर्गिक साधनसंपत्तीचे व्यवस्थापन करत गावकऱ्यांनी शाश्‍वत विकास साधला आहे. ग्रामस्थांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी ग्रामपंचायत व संस्थात्मक पातळीवर राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती घेऊ.
Agriculture Planning
Agriculture PlanningAgrowon

डॉ. चंद्रशेखर पवार, डॉ. चंद्रशेखर पवार

Conservation of Natural Resource : पाणलोटातून उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर नैसर्गिक साधन संपत्तीचा विकास होतो. मात्र त्याच्या पुढील शाश्‍वत व्यवस्थापनासाठी लोकसहभाग आवश्यक असतो. लोकसहभागासाठी ‘सहभागी ग्रामीण मूल्यावलोकन (Participatory Rural Appraisal, PRA) या तंत्राचा वापर केला जातो. हिवरेबाजारमध्ये असलेली पाणीटंचाई अधोरेखित केल्यानंतर त्यावर मात करण्यासाठी लोकसहभागीय आराखडा तयार केला गेला.

त्या अंतर्गत पाणलोट विकासाची कामे करण्यात आली. यामध्ये वर्ष २००९-१० पर्यंत महाराष्ट्र शासनाकडून रु. ६६ लाख, लोकवर्गणी रु. २१ लाख असा सर्वसाधारण ८७ लाख रुपये निधी जलसंधारण उपक्रमांवर खर्च केला गेला. जलसंधारणाच्या कामातून पाणी उपलब्धता वाढून शेती उत्पादकताही वाढली. शेतीपूरक व्यवसायांना चालना मिळाली.

याचा एकत्रित परिणाम म्हणून १९९८ मध्ये हिवरेबाजार ग्रामपंचायतीस प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय उत्पादकता पुरस्कार (कोरडवाहू क्षेत्र वर्गवारीमध्ये) मिळाला. हिवरेबाजारने पाणी उपलब्ध झाल्यानंतरही पारंपरिक ज्वारी, बाजरी या पिकांबरोबर कमी पाणी लागणाऱ्या कांदा, बटाटा व अन्य फळबागांना प्राधान्य दिले.

पर्जन्यमान ३५० ते ४०० मिलिमीटर असून, उन्हाळ्यातही पिके घेणे शक्य झाले आहे. गावामध्ये गुरे चारणाऱ्यांची समिती करून सरसकट चराईबंदी केली गेली. डोंगरक्षेत्रात ५००० ते ६००० मेट्रिक टन इतका चारा उपलब्ध होतो. त्यातून दुग्ध व्यवसाय वृद्धिंगत झाला. सध्या हिवरेबाजारमध्ये रोज ५५०० ते ६००० लिटर दुधाचे संकलन होते. शेती आणि पूरक व्यवसायातून नागरिकांना आर्थिक स्थिरता मिळाली. याशिवाय हिवरेबाजारचा पर्यावरणीय निर्देशांकही अन्य कोणत्याही गावापेक्षा उत्तम आहे.

Agriculture Planning
Agriculture Development Plan : गावपातळीवर करा शेती विकासाचा आराखडा

ग्रामीण सहभागी मूल्यावलोकनाच्या तंत्रामध्ये सर्वप्रथम नैसर्गिक साधनसंपत्तीचा नकाशा तयार करून त्याबाबतच्या समस्यांबाबत ग्रामसभेमध्ये निर्णय घेण्यात आला. ग्रामस्थांसोबत शिवारफेरीच्या माध्यमातून शिवारातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. हिवरेबाजार हे गाव पर्जन्यछायेच्या प्रदेशातील म्हणजेच कमी पर्जन्यमानाचा असल्याने पारंपारिक पीक पद्धती (ज्वारी, बाजरी) बदलतानाही कमी पाण्यामध्ये उत्पादन देणाऱ्या पिकांची निवड गावकऱ्यांनी ठरवून केली आहे.

माथा ते पायथा या व्यवस्थापनाला या घटकांची जोड मिळाल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी २० ते २५ फुटांवर आली आहे. दरमहा पाणलोट समितीकडून विहिरीतील पाणीपातळी मोजली जाते. ज्या आधारे जलसंकल्प तयार करून उपलब्ध पाण्यानुसार पिकांची निवड ग्रामसभेत केली जाते. ग्रामसभेचे निर्णय ग्रामस्थ तंतोतंत पाळतात. ग्रामस्थांच्या या प्रामाणिक प्रयत्नामुळे १९९८ मध्ये पुन्हा राज्य शासनाचा रु. दोन लाखाचा आदर्श गाव पुरस्कार व यशवंत या संस्थेस आदर्श बिगर शासकीय संस्था म्हणून मिळाला.

१९९८ मध्ये गावात ४१० शौचालयांची निर्मिती ग्रामपंचायतीद्वारे केली. त्यामुळे ग्रामपंचायतीला महाराष्ट्र शासनाचा रु. ५ लाखांचा संत तुकडोजी महाराज निर्मल ग्राम आणि स्वच्छता पुरस्कार २०००- २००१ या वर्षासाठी मिळाला. या साऱ्यामागे खंबीर नेतृत्व करणाऱ्या पोपटराव पवार यांना वनराई, पुणे या संस्थेने आदर्श सरपंच असा पुरस्कार दिला.

पुन्हा २००२- ०३ या वर्षी स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार ग्रामपंचायतीला देण्यात आला. सन २००८ मध्ये नॅशनल जिऑग्राफिक या जगप्रसिद्ध दूरचित्रवाहिनीने हिवरेबाजार या गावाची यशोगाथा जगभर प्रसारित केली. याच वर्षी केंद्र सरकार भारत यांनी हिवरेबाजारला पाणीदार गाव घोषित केले.

हिवरेबाजारमधील संस्थात्मक रचना

पाणलोट क्षेत्र विकासासाठी ग्रामपंचायतीने यशवंत कृषी ग्राम व पाणलोट विकास संस्था या संस्थेची निर्मिती केली. या संस्थेचा आर्थिक लेखाजोखा ग्रामसभेमध्ये दरवर्षी मांडण्यात येतो. त्याचा हिशोब गावातील फलकावर मांडला जात असल्याने व्यवहारात पारदर्शकता राहते. गावामध्ये सद्यःस्थितीत ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी कार्यरत आहे. अल्पभूधारक व अन्य गरजू शेतकऱ्यांना पतपुरवठा केला जातो.

त्याची शंभर टक्के वसुली होते. मुंबादेवी दूध उत्पादक संस्थेच्या माध्यमातून गावातील दुधाचे संकलन केले जाते. गावात महिला बचत गट बचतीतून नवनवीन उपक्रम करतात. ग्रामविकास तरुण मंडळ, भजनी मंडळ हे वर्षभर कार्यरत असते. गावामध्ये वैयक्तिक अथवा सामाजिक कार्यामध्ये कर्णकर्कश यंत्रणा लावण्यावर बंदी असल्याने आवाजाचे प्रदूषण होत नाही. गावातील शिवारनिहाय वीज वितरण समिती स्थापन केली आहे.

Agriculture Planning
Natural Resource : निसर्गसंपदा वाचविण्याची अनोखी चळवळ

वीजबिल प्रलंबित असलेल्या शेतकऱ्याला तात्पुरती मदत केली जाते. हे शेतकरी पैसे उपलब्ध झाल्यानंतर समितीला पैसे परत करतात. विजेचा पुरवठा अखंड चालू राहतो. परिणामी, पिकांच्या सिंचनाला फटका बसत नाही. गावामध्ये ग्रामस्वच्छता समितीच्या आधिपत्याखाली स्वच्छता समिती, शौचालय समिती, नळ पाणीपुरवठा समिती (जी महिलांद्वारे चालविली जाते.), घनकचरा समिती, बायोगॅस समिती, ग्राम शिक्षण समिती इ. उपसमित्या कार्यरत आहेत.

या समितीच्या शिल्लक व फायद्यातून गावातील शाळेत मुलांना व्यायामासाठी खेळणी व यंत्रे बसवली आहेत. हिवरेबाजार ग्रामपंचायती मध्ये राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या शाखेचे उद्‌घाटन तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते २० नोव्हेंबर २००९ रोजी ऑनलाइन स्वरूपात झाले होते. एकाच दिवशी हिवरेबाजार मधील ६५ महिलांच्या नावे ६५ लाख रुपये खात्यामध्ये भरण्यात आले होते.

गावात तंटामुक्त समिती असून, ती तंटा मिटविण्यासोबतच सामाजिक सलोख्यासाठी काम करते. ग्रामपंचायतीने छोटे मोठे कार्यक्रम, लग्नकार्य यासाठी मोठे सभागृह बांधले असून, त्यात सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. पाण्याच्या ताळेबंदासाठी हिवरेबाजार शाळेतील आठवी, नववी व दहावी या कक्षेतील विद्यार्थ्यांद्वारे पाणीपातळी दर महिन्याच्या १ व १६ या तारखांना मोजली जाते.

अशा प्रकारे संस्थात्मक रचना उभारल्याने विद्यार्थ्यांपासून प्रत्येक नागरिक हा ग्रामपंचायतीची जोडला गेला आहे. हिवरेबाजारमध्ये केवळ एक मुस्लिम कुटुंब असले, तरी त्यांच्यासाठी मशीद बांधली आहे. याशिवाय गावामध्ये भूमिहीन कुटुंबांना जमिनी ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात आल्या आहेत, यामुळे गावात प्रत्येक कुटुंबाकडे शेत जमीन आहे. या संस्थात्मक रचनेमुळे प्रत्येक नागरिक हा जबाबदार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने हिवरेबाजारमध्ये यशवंतराव चव्हाण एकात्मिक ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्र बांधण्यात आले आहे. त्याचा वापर ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, प्रशासकीय अधिकारी यांना ग्रामीण विकासविषयक कार्यक्रमांसाठी केला जातो. ग्रामविकासाचे हिवरेबाजारचे प्रत्यक्ष उदाहरण शेजारीच असल्याने हे गावनेतृत्व, प्रशासकीय अधिकारी ऊर्जेने प्रेरित होऊन बाहेर पडतात.

पाणलोट क्षेत्र विकास व व ग्राम व्यवस्थापनाच्या तत्त्वांची प्रत्यक्षातील पाहणी व अभ्यासासाठी प्रादेशिक सहकार्यासाठी दक्षिण आशियायी संघटन (सार्क नेशन्स), जागतिक बँक सल्लागार, जर्मनी, अमेरिका, इंग्लंड, नेदरलँड, दक्षिण आफ्रिका, ओमान, वेस्टइंडीज, ऑस्ट्रेलिया या देशातील नामवंत, तज्ञ व प्रशासकीय व्यक्ती, भारत प्रशासन सेवेतील अधिकारी, परराज्यांतील नागरिक इ. सुमारे बारा लाखांहून अधिक नागरिक, विद्यार्थी, प्रशासकीय अधिकारी, सरपंच, उपसरपंच यांनी भेटी दिल्या आहेत.

टीप : या लेखातील माहितीसंदर्भात पोपटराव पवार, दीपक पवार, हबीब सय्यद यांची व हिवरेबाजार ग्रामपंचायतीने मोलाची मदत केली आहे.

पाणलोट क्षेत्रांचे व्यवस्थापन व उत्तर दायित्व

गावातील ग्रामवन समिती गेल्या ३५ वर्षांपासून अखंड कार्यरत आहे. ग्रामवन समिती वर्षभर कार्यरत राहते. विशेषतः उन्हाळ्यामध्ये डोंगरामध्ये वणवे पेटण्याच्या घटना घडतात. त्या टाळण्यासाठी, विझविण्यास ती तत्पर असते. या समितीच्या कर्तव्य तत्परतेमुळे गावात दहा लाख झाडे जिवंत असून, या नैसर्गिक आच्छादनामुळे इथल्या परिसंस्था समृद्ध आहे. हिवरेबाजारच्या पाणलोट क्षेत्रातून गाळ होऊन जाण्याचे प्रमाण शून्यावर आले आहे. खरेतर हे फक्त सदाहरित जंगलांमध्येच घडते. पण पावसानंतर हिवरेबाजारमधील ओढे स्वच्छ व नितळ वाहतात.

डॉ. चंद्रशेखर पवार, ९९२३१२२७९१, (इंदिरा महाविद्यालय, ताथवडे, पुणे)

डॉ. सतीश पाटील, ९४२२७०७२६१, (प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com