स्वाती सातपुते Inspiring Women Farmer Story: नीलिमाची कहाणी केवळ शेतीमधील बदलाची कहाणी नाही तर शेतीवरील अरिष्टाच्या काळात तग धरून राहणाऱ्या शेतकरी महिलांची प्रातिनिधिक कहाणी आहे. या महिला आपल्या प्रयोगामधून एक अधिक शाश्वत शेती व्यवस्था निर्माण होणे शक्य आहे हे दाखवून देत आहेत. आज महिला दिनाच्या अनुषंगाने नीलिमाची प्रेरणादायी कहाणी. .भारताच्या एकूण सकल उत्पादनात कृषी क्षेत्राचा वाटा साधारण १८ ते १९ टक्के. अर्थातच एकूण अर्थव्यवस्थेत हे मोठं व अत्यंत महत्त्वाचं क्षेत्र. अशा या कृषी अर्थव्यवस्थेत ८० टक्के ग्रामीण महिला सहभागी आहेत. पण भूधारक केवळ १३ टक्के महिला आहेत. शेतीचं अर्ध आभाळ डोक्यावर असणाऱ्या महिलांचं स्थान म्हणावं तेवढं लक्षात घेतलं जात नाही. शेती क्षेत्रात आजवर अनेक संकटं आली. काही पर्यावरणीय तर काही योग्य धोरणरचनेच्या अभावाने निर्माण झालेली. कृषी क्रांती, अधिक धान्य पिकवा मोहिमा, बाजारीकरण, रासायनिक खते, कीडनाशके यांचा अतिवापर यामुळे हे संकट अधिक गडद झालं. .यामुळे आर्थिक विवंचनेला तोंड द्यावंच लागलं, त्यासोबतच कुटुंबाची पोषण आणि सुरक्षिततेची घडी ही विस्कटली. यातूनच कित्येक शेतकऱ्यांनी आत्महत्या ही केल्या. त्याचा सर्वांत जास्त परिणाम शेतीशी घट्ट नातं असणाऱ्या शेतकरी महिलांवर झाला. परंतु या सर्व परिस्थितीमध्येही तग धरून या समग्र दृष्ट चक्राला भेदण्याचे महिला आपल्या परीने प्रयत्न करत आहेत..Women Success Story: वडिलांचे शेती प्रेम, तळमळीने डॉक्टर कन्या झाली शेतकरी.शाश्वत शेती व्यवस्थेच्या दिशेने...२०२१ मध्ये सोपेकॉम आणि महिला किसान अधिकार मंच (मकाम) या संस्थेने प्रेरणा ग्रामविकास संस्था, यवतमाळ यांच्या सोबत पर्यावरणस्नेही स्वावलंबी प्रयोगाची सुरुवात करण्यात आली. प्रयोगातून रासायनिक खते, कीटकनाशके, आणि एकसुरी पीक पद्धतीला फाटा देऊन स्थानिक उपलब्ध साधन सामग्री आणि ज्ञानाच्या आधारे पर्यावरण पूरक शेती पद्धतीला प्रोत्साहन देण्यात आले. आज प्रयोगात विदर्भ आणि मराठवाड्यातील २०० हून अधिक महिला शेतकरी या पद्धतीने शेती करत आहेत. नीलिमा रेंगे त्यातीलच एक..यवतमाळ जिल्ह्यात प्रेरणा ग्रामविकास संस्थेच्या माधुरी खडसे आणि आशा कर्रेवार निलीमासारख्या अनेक आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांच्या बरोबर काम करत आहेत. त्यांनी अगदी प्रतिकूल परीस्थितीमध्ये स्वत:च्या हिमतीवर शेतीत बदल घडवून आणला आहे. नीलिमाची कहाणी केवळ शेतीमधील बदलाची कहाणी नाही तर शेतीवरील अरिष्टाच्या काळात तग धरून राहणाऱ्या शेतकरी महिलांची प्रातिनिधिक कहाणी आहे. या महिला आपल्या प्रयोगामधून एक अधिक शाश्वत शेती व्यवस्था निर्माण होणे शक्य आहे हे दाखवून देत आहेत. आज महिला दिनाच्या अनुषंगाने नीलिमाची प्रेरणादायी कहाणी..नीलिमाच्या नवऱ्यानं आत्महत्या केली, तेव्हा तिचं वय होतं २७ वर्षे. अशात गर्भवती. पतीच्या मृत्यूची नोंद ‘शेतकरी आत्महत्या’ म्हणून झाली. त्यामुळं सरकारकडून एक लाखाची मदत मिळाली. पण ‘मुलगा आमचा मेला, मदत हिला कशासाठीॽ’ या रागातून सासरची मंडळी रुसली. नातं तोडलं. एकतर वैधव्य त्यात बाळंतपण - छाती धडधडत राहिल, अशी भीती नि वेदना - सामना करायला एकटी नीलिमा..मनानं खचलेली. शरीरानं अशक्त. त्यामुळं बाळंतपण सीझेरिअन झालं. खर्च आला २५ हजार. नशीब नवऱ्याच्या आत्महत्येमुळं मिळालेली सरकारी मदत होती. म्हणून निभावलं. पण आता पदरी बाळ होतं. आणि समोर प्रश्न होता ‘एकटीनं जगायला धीर लागतो. धाडस कुठून आणायचंॽ’.नवऱ्यानं शेतीवरील कर्जाला कंटाळून आत्महत्या केलेली. नवऱ्यामागे पत्नीला शेतजमिनीचा वारसा हक्क मिळतो. पण नीलिमाला तो नाकारला गेलाय. त्यांनी सासरशी संघर्ष केला. आपलं मूल सासऱ्यांपुढे ठेवलं, ‘या मुलाचा हक्क तरी द्या!’ म्हणून त्या लढल्या. लोकलाजेने सासऱ्यांनी नातवाचा हक्क मान्य केला. नीलिमाचं नाव सातबारावर लावलं नाही, पण तीन एकर जमिनीचा ताबा मिळविण्यात त्या यशस्वी झाल्या..Women Success Story : सांगलीच्या दुष्काळी 'वाझर'मध्ये महिलेनं शेतीत फोडला 'पाझर'.त्यातल्या अर्धा एकरात २०२१ पासून स्वावलंबी शेती सुरू केली. स्वावलंबी शेती सुरू करण्याच्या आधी पासून त्या ‘मकाम’शी जोडलेल्या होत्या. ‘मकाम’च्या नेतृत्व विकास प्रशिक्षणांच्या माध्यमातून त्या खंबीर झाल्या. आज त्या आपल्या शेतात उभं राहून म्हणतात, “भीती धरली, तर आपण कुठंच जाऊ शकत नाही.”.नीलिमाताईंचं शेत घरापासून चार कि.मी. दूर. एकटीनं शेतात येणं, रानातल्या दाट गवताआड राबणं तसं जोखमीचं. कुणी हात धरला, अडवलं तर? हे दडपण आहेच, शिवाय जंगली जनावरांचीही भीती. पण नीलिमाताई म्हणतात, “भीती आपण धरायचीच नाही, डुकराची भीती असते, पण मी मोबाइल ऑन करून मागं पाहत राहते, समोर चालत जाते.” नीलिमा हँडसेटवर गाणी लावून शेतात काम करतात. त्यामुळं मनही रमतं, नि जनावरंही दूर राहतात..विदर्भात मोठ्या प्रमाणावर बीटी कपाशी जातींची लागवड होते. कास्तकारांमध्ये या ‘कॅश क्रॉप’ची लागवड सवयीची झालीय. याहून वेगळा पर्याय निवडायला कुणी धजावत नाही. पण खर्च-कर्ज आणि कीडनाशक फवारणीचे दुष्परिणामही खूप आहेत. किडी आता कीडनाशकांना देखील जुमानत नाही. त्यामुळं पिकं हातची जातात, नि कर्जात दबलेले शेतकरी आत्महत्यांकडे वळतात. या समस्येवर स्वावलंबी शेती हा एक पर्याय. पण क्वचितच एखादा कास्तकार स्वावलंबी शेतीचा मार्ग निवडतो. ‘कॅश क्रॉप पॅटर्न’च्या मृगजळाकडं दुर्लक्ष करणं सोपं नाही. नीलिमानं ‘मकाम’च्या मार्गदर्शनात हे धाडस केलं..“बोरू मला म्हाईतच नव्हता न्, मी पहिल्यांदीच बोरू लावला न् त्याचं खत केलं पराटीला.” नीलिमाताई सांगतात, “चांगलं टवटवीत पीक झालं.” ‘मकाम’नं बांधावर बफर झोन म्हणून लावायला बोरू बियाणे दिले. हे हिरवळीचे पीक जमिनीत जिरवल्यास उत्तम खत तयार होते. ‘मकाम’नं शेणखतासाठीही मदत पुरवली. बियाणंही दिलं. या मदतीच्या जोरावर नीलिमाताईंनी स्वावलंबी शेतीकडे वळण्याचं धाडस केलं. त्यांनी अर्धा एकर मध्ये नॉन बीटी कापूस, तूर, मूग, उडीद, मटकी आणि सोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांची लागवड केली. हे पाहून बांधालगतच्या शेतकऱ्यांना वाटलं, की या बाईचं डोकं फिरलंय. नीलिमा सांगतात, “लोकं हसायची, हे का अर्ध्या एकरात नास केल्यावानी करतेय बा म्हणायची.”.“सेंद्रिय शेती सुरू केली त्याच वर्षी आठ पायल्या मूग झाला.” नीलिमा स्वावलंबी शेतीचा अनुभव सांगतात, “चार पायल्या उडीद झाले. खर्च कमी झाला. उत्पन्न चांगलं आलं. आता मी ठरवलंय सारं रान सेंद्रियच करायचं.” आपली आधीची रासायनिक आणि स्वावलंबी शेतीच्या प्रयोगाची जमीन यातला फरक सांगताना त्या म्हणतात, “ही (स्वावलंबी शेतीखालची) जमीन पाहा ना कशी भुरभुशीत हाये. मला असं वाटाय लागले, तणनाशक मारू मारू, आता आपण उत्पन्न घेऊ, पण पुढं आपल्याला उत्पन्न कमी हुईल. जमिनीत जिवाणूच नसले तर आपली जमीन कड्डी होत जाईन.” जमिनीची प्रत, सुपीकता कशी बदलते याचा अनुभव नीलिमांनी घेतलाय. त्यामुळं त्यांचा कल स्वावलंबी शेतीकडे झुकतोय..“गावातले सगळे शेतकरी नगदी पीक घेतात. कुणाच्याच शेतात भाजीपाला नाही.” केवळ नीलिमाच्या शेतातच सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला असल्यानं आसपासच्या महिला नीलिमांच्या शेतात आवर्जून येतात. भाज्या आणि धान्य मागतात. तेव्हा नीलिमा या महिलांना सांगतात - “तुम्हाले असे मूग खायले पाहिजे असण त् तुम्ही पण स्वावलंबी शेती करा.”.महिला झाल्या एकत्र...नीलिमाताईंनी गावातील महिलांना प्रेरणा द्यायला सुरुवात केली. स्वावलंबी शेती प्रयोगात सुरुवातीला त्यांच्या गावातून कमी प्रतिसाद होता. पण नीलिमाताई महिलांशी चर्चा करू लागल्या, “आज दोन किलो मूग विकत आणून खायला परवडते काॽ आपल्या वावरातच पिकवलं, तर कितीबी खाता येते.” नीलिमानी फक्त सल्लेच दिले नाहीत, तर आपल्याकडील गावरान बियाणं महिलांना दिले. आता त्यांच्या पुढाकारानं गावात दहा महिला स्वावलंबी शेतीच्या प्रयोगात जोडल्या गेल्या आहेत..स्वावलंबी शेतीत तुलनेनं उत्पन्न कमी येतं, तरीही ही शेती का करता? या प्रश्नावर नीलिमाताई म्हणतात, “उत्पन्न कमी हुईल, पण असं वाटलं का, करून पाह्यल्याशिवाय आपल्याला काही उपयोग पडणार नाही, त्यात आम्ही मिश्र पीक घेतलं. आपल्या शेतातील भाजी आपण किती खाणारॽ मग मी दुसऱ्यालाबी दिली. आनंद वाटला. आणि स्वावलंबी शेतीचा निर्णय मी घेतलाय. कुणाला इचारलं नाय. नवरा होता, तेव्हा ते त्याच्याच मतानं सगळं करायचे, आता मीच बी आणतो, गाडीवानाला फोन करून बोलवतो, घरचे लोक म्हणतात, ही कसं करते बाय एवढंॽ जे आलं ते काम ही करत राहते, त् हीचं इंटेलिजन हिलेच माहितेय बा!”.महिलांची आयडॉलनीलिमाताईंचं इंटेलिजन्स - बुद्धिमत्ता दिसून येत आहे. स्वतंत्र ओळख मिळतेय. एकेकाळी नवऱ्याच्या आत्महत्येनं खचलेली, नीलिमा आज गावातील महिलांची आयडॉल झालीय. छोट्या गावापुरतं असलं, तरी नीलिमाचं हे यश कुठल्याही इंडियन आयडॉलपेक्षा कमी नाहीय. नीलिमासारख्या अशा अनेक महिला शेतकरी आज शेतीवरील अरिष्टाला तोंड देत बदल घडवून आणत आहेत. हे बदल केवळ त्यांच्या शेतीत होत नसून त्यायोगे कौटुंबिक सामाजिक स्तरावर देखील होत आहेत. शेतकरी म्हणून ओळख मिळावी म्हणूनही प्रयत्न करत आहेत. अशा महिलांच्या शेतीला, त्यांच्या प्रयोगाला पाठबळ मिळावे यासाठी व्यापक सर्वसमावेशीत धोरणाची गरज आहे. बहुतांश ग्रामीण महिलांची उपजीविका शेती आधारित असल्याने शेती संदर्भात धोरण निर्मिती करत असताना महिला शेतकऱ्यांचा विचार व्हायला हवा. हे वर्ष जागतिक महिला शेतकरी वर्ष म्हणून ही घोषित झालेले आहे, त्या निमित्ताने सुद्धा या विचाराला अधिक बळकटी देऊया.swatisatpute२३६@gmail.com (लेखिका सोपेकॉम संस्थेत कार्यरत आहेत.)(ही कथा ‘सोपेकॉम’ने प्रकाशित केलेल्या ‘पुष्कळा’ या संग्रहामधून घेतलेली आहे. पुस्तिकेचे लेखन प्रशांत खुंटे यांनी केले आहे. तर लेखनसाह्य स्वाती सातपुते यांचे आहे.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.