Citrus Farming: संत्रा लागवडीत पाणी आणि खतांचा कार्यक्षम वापर तसेच रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासह उत्पादन वाढ साधण्यासाठी इंडो-इस्राईल तंत्रज्ञान प्रभावी ठरते. या तंत्राने गादीवाफ्यावर घन लागवड, दुहेरी ठिबक सिंचन, फर्टिगेशन, शास्त्रीय छाटणी आणि अचूक पीक व्यवस्थापन आदी बाबींचा एकत्रित अवलंब केल्यास संत्रा उत्पादकता आणि फळांची गुणवत्ता सुधारण्यास मदत मिळते..संत्रा हे विदर्भातील प्रमुख नगदी फळपीक असून, हजारो शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचा कणा मानले जाते. मात्र गेल्या काही वर्षांत हवामानातील बदल, कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव, अपुऱ्या सिंचन सुविधा, अयोग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि निकृष्ट दर्जाची कलमे आणि पारंपरिक बाग व्यवस्थापनामुळे संत्रा उत्पादकतेवर परिणाम होत आहे. अनेक बागांमध्ये झाडांची वाढ अनियंत्रित होत असल्याने प्रकाश आणि हवेचा पुरेसा प्रवेश होत नाही. परिणामी, फळधारणा आणि फळांची गुणवत्ता घटते..Orange Cultivation : संत्रा उत्पादकांसाठी स्वतंत्र संशोधन केंद्राला मान्यता द्या .या पार्श्वभूमीवर इंडो-इस्राईल तंत्रज्ञान संत्रा उत्पादकांसाठी आशादायक पर्याय ठरत आहे. इंडो-इस्राईल तंत्रज्ञानामध्ये गादीवाफ्यावर लागवड, घन लागवड पद्धती, दुहेरी ठिबक सिंचन, फर्टिगेशनद्वारे अन्नद्रव्य व्यवस्थापन, शास्त्रीय छाटणी आणि अचूक पीक संरक्षण अशा विविध तंत्रांचा समावेश होतो. या तंत्रज्ञानाचा एकत्रित अवलंब केल्यास झाडांची वाढ नियंत्रित राहते, अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर होऊन उत्पादनात वाढ साधणे शक्य होते. या तंत्रांचा नियोजनबद्ध वापर केल्यास हेक्टरी २५ ते ३० टनांपर्यंत उत्पादन मिळू शकते..हवामान व जमिनीची निवडसंत्रा पिकासाठी १० ते ३५ अंश सेल्सिअस तापमान अनुकूल मानले जाते. उष्ण व दमट हवामानात फळांची वाढ आणि दर्जा चांगला राहतो. वार्षिक ६२० ते १२०० मिलिमीटर पर्जन्यमान आणि ५० ते ५३ टक्के सापेक्ष आर्द्रता संत्रा लागवडीसाठी पोषक ठरते..लागवडीसाठी मध्यम काळी, खोल, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू ५.५ ते ७.५ दरम्यान असावा. चुनखडीचे प्रमाण जास्त असल्यास झाडांच्या वाढीवर आणि अन्नद्रव्य शोषणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लागवडीपूर्वी मृदा परीक्षण करून जमिनीची सुपीकता आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता तपासणे आवश्यक आहे..दर्जेदार कलमांची निवडयशस्वी संत्रा बागेचा पाया म्हणजे दर्जेदार कलमे. नागपुरी संत्रा किंवा नागपूर सीडलेस यांसारख्या सुधारित जातींची निरोगी, जातिवंत आणि भरपूर तंतुमय मुळे असलेली कलमे निवडावीत. जबेरी किंवा रंगपूर लाइम खुंटावर तयार केलेली कलमे अधिक योग्य ठरतात. कलमे शासकीय, कृषी विद्यापीठ किंवा अधिकृत रोपवाटिकेतूनच घ्यावीत. निकृष्ट किंवा रोगग्रस्त कलमांमुळे बागेची उत्पादकता सुरुवातीपासूनच कमी होण्याची शक्यता असते..गादीवाफ्यावर घन लागवडइंडो-इस्राईल तंत्रज्ञानातील सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे गादीवाफ्यावर लागवड. गादीवाफ्यांमुळे अतिरिक्त पाण्याचा निचरा वेगाने होतो. त्यामुळे मुळांच्या भागात पाणी साचत नाही आणि फायटोप्थोरा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते..लागवडीपूर्वी जमीन खोल नांगरून भुसभुशीत करावी. पाण्याचा निचरा होण्यासाठी बागेभोवती चर तयार करावेत. उत्तर-दक्षिण दिशेत गादीवाफे तयार करणे फायदेशीर ठरते. गादीवाफ्याची जमिनीलगतची रुंदी ३ मीटर, वरच्या भागाची रुंदी २ मीटर आणि उंची ४० ते ५० सेंमी ठेवावी. दोन गादीवाफ्यांतील अंतर ६ मीटर ठेवून प्रत्येक वाफ्यावर ३ मीटर अंतरावर कलमे लावावीत. यामुळे ६ बाय ३ मीटर अंतराची घन लागवड शक्य होते. प्रत्येक गादीवाफ्यावर ३ मीटर अंतरावर १ बाय १ बाय १ फूट इतक्या लांबी, रुंदी आणि खोलीचे खड्डे घ्यावेत. प्रत्येक खड्ड्यात ५ ते १० किलो शेणखत व १ किलो सिंगल सुपर फॉस्फेट मिसळावे..या पद्धतीमध्ये ६ बाय ३ मीटर अंतरावर घन लागवड केली जाते. पारंपरिक ६ बाय ६ मीटर लागवडीत हेक्टरी सुमारे २७७ झाडे बसतात, तर ६ बाय ३ मीटर अंतरावर हेक्टरी सुमारे ५५५ झाडांची लागवड करता येते. त्यामुळे उपलब्ध जागेचा अधिक कार्यक्षम वापर होऊन सुरुवातीच्या वर्षांमध्ये अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते..Turmeric Cultivation: हळद लागवडीसाठी जमिनीची पूर्वतयारी कशी करावी?.कलम लागवडसंत्रा कलमांची लागवड पावसाळ्यात जून-जुलैमध्ये करावी. दक्षिण-उत्तर दिशेने तयार केलेल्या गादीवाफ्यावर दोन झाडांमध्ये ३ मीटर इतके अंतर ठेवून लागवड करावी. कलम खड्ड्याच्या मधोमध लावावे. कलमांचा डोळा दक्षिणेला व जमिनीपासून २० ते २५ सेंमी उंचीवर ठेवावा. यामुळे जोराच्या वाऱ्यापासून डोळा खराब होणार नाही. कलम पॉलिथिन पिशवीतून काढताना रोपांची मुळे तुटणार नाहीत याची काळजी घ्यावी..सिंचन व्यवस्थापन, फर्टिगेशनझाडाचे वय, हंगाम आणि जमिनीच्या प्रकारानुसार दुहेरी लॅटरल ठिबक सिंचन पद्धतीने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. संत्रा झाडांच्या मुळांचा कार्यक्षम विस्तार प्रामुख्याने १२० सेंमी परिघ आणि २४ सेंमी खोलीपर्यंतच मर्यादित असल्याने अचूक सिंचनाला विशेष महत्त्व आहे. या पद्धतीमुळे मुळांच्या परिसरात समान ओलावा राखला जातो, पाण्याची बचत होते आणि मुळांची वाढ चांगली होण्यास मदत मिळते..झाडांची वाढ, फुलधारणा आणि फळ विकासाच्या काळात पाण्याचा ताण बसणार नाही, याची काळजी घ्यावी. झाडाच्या बुंध्याजवळ पाणी साचणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी. सिंचनासाठी वापरण्यात येणारे पाणी क्षारमुक्त किंवा कमी क्षारयुक्त असावे..ठिबक सिंचनाद्वारे नत्रयुक्त खते दिल्यास अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर होतो. स्फुरद आणि पालाशयुक्त खते शिफारशीनुसार दिल्यास झाडांची वाढ, फुलधारणा आणि उत्पादनक्षमतेत सुधारणा होते..कलमांची निगालागवडीनंतर कलमांना बांबूच्या काठ्यांचा आधार द्यावा. खुंटावर येणारे फुटवे वेळोवेळी काढून टाकावेत. सुरुवातीच्या काळात झाडे जमिनीपासून सुमारे ६० सेंमी उंचीपर्यंत एकखोडी वाढवावीत. त्यानंतर सर्व दिशांनी समान वाढणाऱ्या चार ते पाच मुख्य फांद्या ठेवाव्यात. उन्हाळ्यात सेंद्रिय किंवा प्लास्टिक आच्छादनाचा वापर केल्यास जमिनीतील ओलावा टिकून राहतो..छाटणी तंत्रज्ञानइंडो-इस्राईल तंत्रज्ञानातील सर्वांत प्रभावी घटक म्हणजे शास्त्रीय पद्धतीने छाटणी. छाटणीमुळे नवीन फुटवे येतात, झाडांच्या आतील भागात सूर्यप्रकाश पोचतो आणि फळधारणेस पोषक वातावरण तयार होते. आंबिया बहरासाठी डिसेंबर-जानेवारीमध्ये, तर मृग बहरासाठी जूनमध्ये छाटणी करावी. फांद्यांच्या शेंड्याकडील ४० ते ५० सेंमी भाग छाटल्यास नवीन फुटी जोमाने फुटतात. छाटणीमुळे फळधारणा होणाऱ्या फांद्यांचे प्रमाण वाढते. झाडाचा आकार नियंत्रित राहतो.- डॉ. सुरेंद्र पाटील ९८८१७३५३५३(फळशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला ).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.