Indigenous Catfish: देशी मागूर संवर्धन: फायदे, तंत्र आणि बाजारपेठ

Fish Farming: देशी मागूर माशामध्ये सुमारे १५ टक्के प्रथिने, १.८ टक्का चरबी, ४.२० टक्के कर्बोदके आणि ६.७० टक्के लोहाचे प्रमाण असते. या माशाला भारतात चांगली मागणी आहे. गोड्या पाण्याच्या भागात देशी मागूर संवर्धनाला संधी आहे.
Magur Fish
Magur FishAgrowon
Published on
Updated on

महेश शेटकार, डॉ. स्वप्नजा मोहिते, श्रीनाथ गव्हाणे

Fish Conservation: देशी मागूर (क्लॅरियस बॅट्रॅकस) मासा हा वॉकिंग कॅटफिश म्हणून ओळखला जातो. हा मासा त्याच्या लांब मिश्यांमुळे कॅटफिश माशांमध्ये समाविष्ट होतो. देशी मागूर हा बिहार राज्याचा राज्य मासा आहे. मागूर गोड्या पाण्यातील चवदार माशांपैकी एक आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, पंजाब, हरियाना आणि बिहार यांसारख्या अनेक राज्यांमधील ग्राहक इतर कोणत्याही माशांपेक्षा मागूर माशाला प्राधान्य देतात. हा मासा शिकारी (मांसाहारी) स्वभावाचा आहे.

तो पाण्यातील विविध जलचर प्राणी खातो. चांगली मागणी आणि प्रतिकूल हवामानाचा सामना करण्याची क्षमता यामुळे मत्स्यपालनासाठी निवडला जातो. मानवी आहारात एक पोषक व चविष्ट अन्न म्हणून याचा वापर केला जातो. या माशामध्ये सुमारे १५ टक्के प्रथिने, १.८ टक्का चरबी, ४.२० टक्के कर्बोदके आणि ६.७० टक्के लोहाचे प्रमाण असते. या माशाला भारतात जास्त मागणी आणि उच्च बाजार मूल्य आहे. गोड्या पाण्याच्या तलावामध्ये देशी मागूर संवर्धनाला चांगली संधी आहे.

तलावाचे नियोजन

तलाव आयताकृती असावा. शेतीचे क्षेत्रफळ १,००० ते १०,००० चौ.फूट असावे. तळ्याची खोली कमीत कमी दोन मीटर असावी. ज्या बाजूने पाणी बाहेर काढणार आहात, तिकडे जमिनीस हलकासा उतार असावा. पाणी बाहेर सोडण्याच्या ठिकाणी बारीक मेशच्या जाळ्या असाव्यात, जेणेकरून पिल्ले बाहेर जाणार नाहीत.

तलावाच्या बाहेरच्या बाजूला सेटलिंग टॅंक आणि बायोफिल्टर टॅंक तयार करावेत. यामुळे वापरलेले पाणी पुन्हा वापरता येते किंवा हे खतयुक्त पाणी शेतीसाठी उपयुक्त ठरते. मासे बाहेर पडू नयेत म्हणून बांधाची उंची जास्त असावी. जैव सुरक्षेच्या दृष्टीने तलावाला पक्षिविरोधक जाळी लावावी.

Magur Fish
Fish Production: रोड मॅप मत्स्योत्पादन वाढीच्या धोरणाचा!

बीजांचा आकार

तलावामध्ये ०.३ ग्रॅमपेक्षा कमी आणि १ ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे बीज शक्यतो सोडू नये. त्याची साठवण्याची घनता ८-१० नग प्रति चौ.मी. इतकी असावी.

मे ते सप्टेंबर या कालावधीत देशी मागूर माशाचे खात्रीलायक बीज सीफा (केंद्रीय गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धन संस्था, भुवनेश्‍वर) केंद्रामध्ये उपलब्ध असते. खासगी मत्स्य बीज उत्पादन केंद्रावरून खरेदी करताना तज्ज्ञांचा सल्ला घेऊन देशी मागूर (क्लॅरियस मागूर) हेच बीज आहे का, हे तपासून पाहावे.

पाणी व्यवस्थापन

माशांसाठी पाण्याचे गुणधर्म हे अत्यंत महत्त्वाचे असतात. पाण्याच्या गुणवत्तेवर वाढ अवलंबून असते, त्यामुळे तलावातील पाण्याचे योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे असते.

मत्स्यसंवर्धन तलावाची पाणी व्याप्त खोली १-१.५ मीटर असावी. यापेक्षा अधिक खोली असल्यास पाण्याच्या व्यवस्थापनासाठी अडचण निर्माण होते. तापमान साधारणपणे २७ ते ३१ अंश सेल्सिअस असावे.

पाण्याचा सामू हा ७ ते ८.५, विद्राव्य प्राणवायू हा

५ ते ७ पीपीएम, पाण्याची क्षारता ०.१ ते ०.५

पीपीएम, अल्कलीनीटी ५० ते १५० मिलिग्रॅम प्रति लिटर, जडता ७५ ते २०० मिलिग्रॅम प्रति लिटर आणि अमोनिया ०.१ पेक्षा कमी असावा. पाणी खूप

हिरवट व वास येत असल्यास संवर्धनास अयोग्य असते.

खाद्य व्यवस्थापन

साधारणपणे एक महिन्यापर्यंत बोटुकली आकाराचे मागूर मासे हे प्लवंकावर पूर्णतः अवलंबून असतात. मागूर मांसाहारी असल्यामुळे पूरक खाद्य द्यावे. त्यासाठी गोड्या पाण्यातील लहान ताज्या माशांचा खाद्य म्हणून समावेश करावा. अशा माशांची भुकटी तयार करून मागूर माशांना खाण्यास द्यावी.

कोंबडी किंवा प्राण्यांपासून मिळणारे ताजे मांस टाकले असता, माशांना चांगल्या प्रतीची प्रथिने मिळतात. काही वेळेस गांडुळाचे लहान तुकडे तलावात टाकावेत, जेणेकरून माशांना खाद्य उपलब्ध होईल. त्याचबरोबर पॅलेटेड मत्स्य खाद्याचा वापर करू शकतो. या माशांच्या आहारात ३० ते ३५ टक्के प्रथिने असावीत. खाद्य देत असताना पाण्याची गुणवत्ता खराब होणार नाही याची काळजी घ्यावी.

माशांची वाढ

९ ते १२ महिन्यांच्या संवर्धनानंतर मागूर १०० ते १५० ग्रॅम वजनाचा होतो. तलावातील पूर्ण पाणी काढून मागूर मासे पकडावेत. कारण थोडे जरी पाणी शिल्लक असेल तर मासे पकडण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात.

१०० ग्रॅमहून अधिक वजनाच्या मागूर माशाला बाजारात चांगला दर मिळतो. माशाची चव व पाण्याबाहेरही दीर्घ काळ जिवंत राहिल्यामुळे, भारतीय बाजारात हा मासा ४०० ते ८०० रुपये प्रति किलो दराने विकला जातो.

हा मासा जिवंत मासळी विक्री केंद्रात मोठ्या प्रमाणावर विकला जातो. १००० चौ.फूट तलावातून ६० ते ७० किलो उत्पादन मिळू शकते.

Magur Fish
Cage Fish Farming: पुण्यात पिंजरा मत्स्यसंवर्धन कार्यशाळा; मत्स्यव्यवसायात नवे तंत्र!

देशी आणि विदेशी थाई मागूर माशांतील फरक

देशी मागूर (क्लॅरियस मागूर) हायब्रीड थाई मागूर (क्लॅरियस गैरीपीनस)

तांबूस काळ्या रंगाचा मासा आकाराने लहान असतो. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वाढणारा आकाराने मोठा असतो.

बाजारात २५०-३०० ग्रॅम वजनापर्यंतच्या माशाला चांगली मागणी आहे. विस्तृत तोंडामुळे हा मासा तुलनेने मोठी शिकार संपूर्ण गिळण्यास सक्षम आहे. हा मासा साधारणपणे ३-४ फूट लांबीपर्यंत वाढतो.

माशाचे कमाल वजन हे फक्त १ किलोग्रॅम इतके वाढू शकते. याचे कमाल वजन हे ३० किलोपर्यंतसुद्धा जाऊ शकते.

माशाच्या डोक्यावर इंग्रजी यू (U) आकाराचे चिन्ह असते. माशाच्या डोक्यावर इंग्रजी व्ही (V) आकाराचे चिन्ह असते.

माशाची वाढ ही थाई मागूरपेक्षा मंद असते. मासा प्रति किलो ३५०- ५०० रुपये दराने विकला जातो. मार्केटमध्ये टबमध्ये कमी पाण्यात जिवंत मासा म्हणून विकला जातो. या माशाची किंमत ९०-१३० रुपये प्रति किलोपर्यंत असते.

भारतात विदेशी थाई मागूरवर बंदी का?

आशिया खंड आणि प्रामुख्याने भारतात मागूर ही मत्स्य प्रजात खूप प्रसिद्ध आहे. देशी मागूर (क्लॅरियस मागूर) आणि हायब्रीड थाई मागूर (क्लॅरियस गैरीपीनस) या दोन प्रकाराच्या माशांचे भारतात संवर्धन आणि विक्री केली जाते. परंतु विदेशी थाई मागूर मासा दिसायला देशी माशासारखाच असला तरी तो मानवी आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे देशी आणि विदेशी थाई मागूर माशांतील फरक ओळखणे आवश्यक आहे.

विदेशी थाई मागूर १९८९ च्या अखेरीस थायलंड येथून बांगलादेशामध्ये आणण्यात आला. त्यानंतर बांगलादेशमधून हा मासा अनधिकृतरीत्या भारतात दाखल झाला. भारत सरकारने १९ डिसेंबर १९९७ रोजी एक परिपत्रक जारी करून क्लॅरियस गॅरीपिनस संवर्धन, प्रजनन, वाहतूक आणि आयात यावर बंदी घातली आहे. २००० मध्ये राष्ट्रीय हरित लवादाने भारतात थाई मागूर नावाच्या माशाची शेती करण्यास बंदी घातली आहे. हा मासा मुख्यतः मांसाहारी आहे. त्यामुळे जलीय अधिवासातील इतर मासे व जलचर हे धोक्यात येतात आणि काही वेळेस कायमचे नष्ट ही होऊ शकतात.

संशोधनानुसार, भारतातील स्थानिक माशांच्या प्रजातींमध्ये ७० टक्के घट होण्यास थाई मागूर जबाबदार आहे, ज्यामुळे जलीय परिसंस्थेवर नकारात्मक परिणाम होतो. या माशाच्या खाद्यपद्धतीमुळे हा मासा नैसर्गिक परिसंस्थेमध्ये असलेल्या इतर स्वदेशी माशांकरिता हानिकारक ठरत आहे.

हा मासा पाण्यातील नैसर्गिक व जलीय परिसंस्था आणि तेथील जैवविविधतेसाठी अत्यंत घातक आहे. या शिवाय, थाई मागूर माशाचे संवर्धन करणारे त्यांना भाजीपाल्याचा कचरा, कुजलेले मांस खायला घालतात, ज्यामुळे पाणी प्रदूषित होते आणि जलसंस्थेची परिसंस्था नष्ट होते.

शास्त्रीय अभ्यासांतून असे निदर्शनास आलेले आहे, की विदेशी मागूर माशाचे सेवन हे शरीराकरिता हानिकारक आहे. हा मासा कमी खर्चात मोठ्या प्रमाणात उत्पन्न देत असल्याने या माशांच्या संवर्धनासाठी अनधिकृतरीत्या वापरल्याचे दिसून येते. या माशांमुळे देशी प्रजाती लुप्त होताना दिसत आहेत. या माशाच्या मांसात अनेकदा जड धातू जसे झिंक, कॅडमिअम आणि आर्सेनिक इत्यादीचे संक्रमणसुद्धा आढळून आलेले आहे. हे धातू मानवी शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहेत. यामुळे या माशाच्या संवर्धन, प्रजनन,

वाहतूक आणि आयात यावर बंदी घातली गेली आहे.

- डॉ. स्वप्नजा मोहिते, ९५४५०३०६४२, (विभाग प्रमुख, मत्स्य जीवशास्त्र, मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com