
Jalgaon News : खानदेशात सूर्यफूल पिकाची लागवड (sunflower Cultivation) पूर्ण झाली आहे. यंदा जळगाव जिल्ह्यात सुमारे ३५० तर धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे १५० हेक्टरने लागवड वाढली आहे.
एकूण लागवड तीन हजार हेक्टरपर्यंत झाली आहे. मागील हंगामात सूर्यफूल लागवड घटली होती. परंतु यंदा लागवड काहीशी वाढली आहे.
अनेक शेतकऱ्यांनी हरभरा, कापूस पीक (Cotton Crop) आटोपल्याने सूर्यफूल पेरणीस पसंती दिली आहे. सूर्यफुलाची लागवड जळगाव जिल्ह्यात जामनेर, जळगाव, चोपडा, पाचोरा भागात अधिक झाली आहे. धुळ्यात शिरपूर तालुक्यात अधिक लागवड आहे.
तर नंदुरबारात शहादा, तळोदा व नवापूर तालुक्यांत सूर्यफूल पीक बऱ्यापैकी आहे. जळगाव जिल्ह्यातील लागवड सुमारे २२०० हेक्टर असल्याचा अंदाज आहे.
पेरणी जानेवारी व या महिन्यात अधिक झाली आहे. खरिपात लागवड जळगावसह नंदुरबारात कमी झाली होती. परंतु या हंगामात लागवड वाढली आहे.
कमी कालावधी, कमी पाणी आणि अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांना शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. कलिंगड, खरबूज लागवड यंदा अधिक आहे. यामुळे अनेकांनी कलिंगड लागवड टाळून सूर्यफुलास पसंती दिली आहे.
केळी पट्ट्यात सूर्यफूल लागवड बऱ्यापैकी आहे. बेवड म्हणूनही सूर्यफूल चांगले पीक मानले जाते. काळ्या कसदार व मध्यम जमिनीची निवड शेतकऱ्यांनी लागवडीसाठी निवडली आहे. अनेकांनी पाट पद्धतीने सिंचन करणे पसंत केले आहे. कारण या पिकास अधिकचे पाणी लागत नाही.
काही शेतकऱ्यांनी नोव्हेंबरमध्येही लागवड केली होती. यंदा लागवडीसाठी विविध महिन्यांची निवड शेतकऱ्यांनी केली आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या महिन्यांत सतत लागवड झाली आहे. ऑक्टोबरमधील पिकाची मळणी पूर्ण झाली आहे.
तर डिसेंबरमधील पीक मळणीवर येत आहे. पिकाचे नुकसान पक्षी अधिक करीत आहेत. तसेच रानडुकरांचा उपद्रवदेखील आहे. यामुळे शेतकरी पिकाच्या संरक्षणासाठी आठवड्यातून दोन - तीन दिवस रात्रीच्या वेळेस शेतात मुक्काम ठोकत आहेत.
खतांची गरज कमी
सूर्यफूल पिकास मका, संकरित ज्वारी आदी पिकांच्या तुलनेत खतांची गरज कमी आहे. शेतकऱ्यांनी फक्त एकदा खत दिले आहे.
तसेच फवारणीची गरज नाही. यामुळे मका पिकाच्या तुलनेत कमी खते व कमी कालावधी लागतो. तसेच उत्पादन एकरी किमान १२ ते १५ क्विंटल येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.