Satara News : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत २०१९ मध्ये जिल्हा बॅंकेचे सभासद शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित होते. त्यांना लवकरच या अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी अशा वंचित असलेल्या कर्जदार शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे.
येत्या सात सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले आहे. कर्जमाफीत न बसलेले पण वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.
यापैकी दोन टप्प्यांत शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप झाले; काही शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नसल्याने त्यांचे प्रोत्साहन अनुदान रखडले होते. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे सर्वाधिक १०५४ शेतकऱ्यांचे अनुदान प्रलंबित आहे. आता या शेतकऱ्यांना शासनाकडून लवकरच प्रोत्साहन अनुदान मिळण्याचे संकेत आहेत.
योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या (विशिष्ट क्रमांक देण्यात आलेल्या) परंतु, आधार प्रमाणीकरण न केलेल्या कर्जदार शेतकऱ्यांनी विकास सेवा सोसायटीशी संपर्क साधून नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन प्रमाणिकरण त्वरित करून घ्यावे, असे आवाहन श्री. पाटील व डॉ. सरकाळे यांनी केले आहे.
जिल्हा बँकेची आज सभा
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची अमृतमहोत्सवी वर्षातील ७४ वी वार्षिक साधारण सभा येत्या आज (शुक्रवारी) दुपारी एक वाजता बँकेचे मुख्य कार्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे.
बँकेच्या सर्व सभासदांनी या सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन बॅंकेचे अध्यक्ष खासदार नितीन जाधव पाटील यांनी केले आहे. दरम्यान, बॅंकेला २०२३-२४ या आर्थिक वर्षात उच्चांकी करपूर्व ढोबळ नफा १७९ कोटी ८० लाख, तर सर्व तरतुदीनंतर निव्वळ नफा ८५ कोटी झाला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.