Heavy Rain : पावसाचा रुद्रावतार! सर्व यंत्रणांना सतर्क रहाण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश; पंचगंगा, वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळी वाढ, चंद्रपुरात अंधारी नदीला पूर

Maharashtra Rain News : राज्यातील बहुतांश भागात सुरू असलेल्या धुव्वाधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, मुंबई उपनगर आणि विदर्भातील अनेक नद्यांची पाणी पातळी वाढली असून अनेक ठिकाणी पूर आला आहे.
Heavy Rain
Heavy RainAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात गेले तीन ते चार दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने अनेक नद्यांनी पात्र ओलांडले आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांसह महापालिका आयुक्तांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. तसेच सर्व आप्तकालिन यंत्रणांना सतर्क रहाण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे

मधल्या काळात राज्यात पावसाने दांडी मारली होती. मात्र गेल्या चार-पाच दिवसांपासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाने राज्यभर हजेरी लावली आहे. याचदरम्यान हवामान विभागानं राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तर कोकणातील रत्नागिरी आणि विदर्भातील गडचिरोली या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला असून विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या असून नागरिकांना सर्वतोपरी मदत करताना हवामान खात्याच्या इशाऱ्याबाबत लोकांना अवगत करा अशा सूचना केल्या आहेत.

तसेच राज्यातील प्रशासनाने अलर्ट राहत आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून वेळोवेळी माहिती घेतली जावी. त्याप्रमाणे नियोजन आणि व्यवस्थापन करण्यात यावे अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिक्रिया दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिक्रिया दलास (SDRF) अलर्टमोडवर ठेवण्यात यावे. तर पुराचा धोका निर्माण होऊ नये म्हणून नियंत्रित पाण्याचा विसर्ग करण्याकडे लक्ष द्यावे अशा सूचना पाटबंधारे विभागास केल्या आहेत. तर जेथे जेथे पूरपरिस्थिती निर्माण होईल तेथे वाहतूक बंद करून ती पर्यायी मार्गावर वळवावी असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.

Heavy Rain
Heavy Rain Update : पावसाचं थैमान; मुंबई एपीएमसी बंद तर नागपुरात शाळांना सुट्टी जाहीर, पंचगंगेची वाटचार इशारा पातळीकडे

२ रेड तर ९ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

कोकणासह विदर्भातील एका जिल्ह्याला हवामान विभागानं रेड अलर्ट दिला आहे. यात कोकणातील रत्नागिरी रत्नागिरी आणि विदर्भातील गडचिरोली जिल्ह्याचा समावेश आहे. तर राज्यातील नऊ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे. यामध्ये ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा मराठवाड्यातील नांदेड, विदर्भातील गडचिरोली, वर्धा, नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे.

यलो अलर्ट

दरम्यान, राज्यातील मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून मुंबईसह पालघरसह पुणे आणि कोल्हापूरला देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे.

यादरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात सलग दोन दिवस पावसाने थैमान घातला आहे. त्यामुळे चंद्रपूर-मूल मार्गावर असणाऱ्या चिचपल्ली गावात गाव तलाव फुटला. यामुळे गावाला पाण्याने वेढले असून येथील १०० ते १५० घरांमध्ये पाणी शिरले आहे. तर धान्य आणि इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले असून जवळपास १०० बकऱ्या आणि काही जनावरे दगावली आहेत. तसेच अंधारी नदीला आलेल्या पुरात २५ गावकरी आडकले होते. त्यांची सुटका करण्यात अग्निशमन आणि पोलिसांना यश आले आहे.

Heavy Rain
Heavy Rain in Koyna Dam : महाबळेश्वरमध्ये २ हजार मिमी पाऊस, कोयना धरण अर्धशतकाच्या उंबरठ्यावर

गडचिरोलीचा संपर्क तुटला

गडचिरोली जिल्ह्यात देखील मुसळधार पावसामुळे दाणादाण उडाली असून जिल्ह्यातील ५ राष्ट्रीय महामार्गांसह जिल्ह्यातील ३० मार्ग पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे इतर भागाशी गडचिरोली जिल्ह्याचा संपर्क तुटला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर

गेल्या चार दिवसापासून असणाऱ्या पावसाने राज्याला झोडपून काढलेले असतानाच पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी कमालीची वाढली आहे.

कोयना धरणाचा पाणीसाठा वाढला

साताऱ्या जिल्ह्यात गेल्या २४ तासात दमदार पाऊस झाला आहे. येथील नवजा आणि कोयनानगर परिसरात क्रमश: १०० आणि ८५ मिलीमीटरची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणात ५१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सध्याही साताऱ्यात पावसाची संततधार सुरूच आहे.

वारणा आणि कृष्णा नदी

सांगली जिह्यातदेखील सतत पाऊस सुरूच असून यामुळे येथील वारणा आणि कृष्णा नदीची पाणी पातळी वाढत आहे. तर सांगलीच्या बंधाऱ्याला धबधब्याचे स्वरूप आल्याने गावकऱ्यांना पहारा द्यावा लागत आहे. येथे सेल्फी काढण्यासाठी तरुण-तरुणी पोहचत असल्याने अनर्थ घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने यात लक्ष घालावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पंचगंगा नदी पुलावर पुराचे पाणी

दरम्यान कोल्हापुर जिल्ह्यातील धरणक्षेत्रात सलग पावसाची रिपरिप सुरू असून पंचगंगेसह जिल्ह्यातील इतर नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. पंचगंगेची रविवारी सकाळी पाणी पातळी ३६ फूट ६ इंचावर पोहचली असून कुरुंदवाड, इचलकरंजी येथील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे येथील वाहतूक बंद करण्यात आली असून दुसऱ्या मार्गाने फिरवण्यात आली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील ८० बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com