Ujani Dam : मार्चमध्येच उजनी धरण पोहोचले उणे ३६ टक्क्यांवर

Ujani Dam Storage : सध्या आठवड्याला एक टीएमसी पाणी संपतेय.
Ujani Dam
Ujani DamAgrowon

Solapur News : जिल्ह्यातील पाण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या मध्यम प्रकल्पांमध्ये दीड टीएमसीपर्यंत पाणी असून, जिल्ह्याची वरदायिनी असणारे उजनी धरण मार्चमध्येच उणे ३६ टक्क्यांवर पोहोचले आहे. पाण्याचे बाष्पीभवन, शेती व पाणीपुरवठ्याच्या योजनांसाठी होणारा उपसा, यातून उजनीतून दर आठ दिवसाला अंदाजे एक टीएमसी पाणी संपत आहे.

सध्याच्या परिस्थितीचा विचार करता उजनी धरण इतिहासात पहिल्यांदाच उणे ७० टक्क्यांपर्यंत जाईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे धरणाच्या बॅक वॉटरवरील पाणी उपशावर निर्बंध घालण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, बार्शी, माळशिरस, सांगोला या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून, उर्वरित तालुक्यांमध्ये देखील चिंताजनक स्थिती आहे. सध्या जिल्ह्यातील एकरूख, हिंगणी, जवळगाव, मांगी, आष्टी, बोरी व पिंपळगाव ढाळे या सात मध्यम प्रकल्पांमध्ये देखील सद्य:स्थितीत दीड टीएमसीपेक्षाही कमी पाणीसाठा आहे. उजनी धरण तळ गाठत असून, १५ मे दरम्यान सोलापूर शहरासाठी पुन्हा एकदा भीमा नदीतून सहा ते साडेसहा टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. बॅक वॉटरवरून आठ दिवसांत एकदा एक टीएमसी पाणी संपत आहे.

धरण परिसरातील शेतीसह इंदापूर, बारामती, धाराशिव, कर्जत-जामखेड या शहरांसह कुर्डुवाडीची पाणीपुरवठा योजना बॅक वॉटरला आहे. सोलापूरचे एक आवर्तन आणि बॅक वॉटरवरील उपसा, उन्हाळ्यातील बाष्पीभवन या पार्श्‍वभूमीवर मेअखेर धरणातील अंदाजे १५ टीएमसी पाणी संपेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

दुसरीकडे पाऊस लांबल्यास जुलैमधील आषाढी वारीसाठी देखील अडीच टीएमसीपर्यंत पाणी सोडावे लागेल आणि त्याचवेळी सोलापूर शहरासाठी आणखी एक अतिरिक्त आवर्तन सोडावे लागेल. त्या वेळी धरणातील मृतसाठा उणे ७० टक्क्यांपेक्षाही खोलवर जाऊ शकतो, असाही अंदाज वर्तविला जात आहे.

Ujani Dam
Ujani Water Dam : उजनी धरणातील पाणीसाठा पोहचला उणे पातळीमध्ये

बंधाऱ्याजवळ दोनच तास वीज
हिळ्ळी, चिंचपूर, औज, गुरसाळे, भोसे, पंढरपूर, उचेठाण या बंधाऱ्यांजवळील वीजपुरवठ्यावर निर्बंध घातले जाणार आहेत. त्यासंदर्भातील पत्र महावितरण अधिकाऱ्यांना पाठविल्याचे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी सांगितले. या बंधाऱ्याजवळील शेतकऱ्यांना आता दररोज केवळ दोन तासच वीज मिळणार आहे. पिण्यासाठी पाणी राखून ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

२६ गावे, २०४ वाड्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा
ऊन्हाची तीव्रता वरचेवर वाढतच असून, जिल्ह्यात सध्या २८ टॅंकर सुरू आहेत. २६ गावे आणि २०४ वाड्या-वस्त्यांवरील लोकांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मागील
सहा-सात वर्षांत पहिल्यांदाच मार्चमध्ये एवढे टॅंकर सुरू झाले आहेत. अजूनही दिवसेंदिवस टॅंकरची मागणी वाढत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com