Sugarcane Farmers : साहेब जळालेल्या उसाचं चिपाड झालं आता तरी तोडा, शेतकऱ्यांची आर्त हाक

Kolhapur Sugarcane Farmers : ट्रॅक्टरचालकाची एंट्री फी सुद्धा ४०० ते ५०० रुपये झाली आहे. यामुळे शेतकरी अक्षरशः वैतागला असल्याने ऊस नको रे बाबा...! असे म्हणण्याची वेळ आलीय.
Sugarcane Farmers
Sugarcane Farmersagrowon
Published on
Updated on

Kolhapur Sugarcane Farmers : कोल्हापूर जिल्ह्यात ऊस हंगामाच्या सुरूवातीपासून शेतकरी आणि कारखानदार यांच्यात संघर्ष पहायला मिळत आहे. दरम्यान ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर कारखानदारांचे कर्मचारी आणि ऊस तोडणाऱ्या टोळ्या फडकरी यांच्याकडून खुशालीच्या नावाखाली भरमसाठ लूटमार सुरु आहे. खुशाली दिल्याशिवाय तुमच्या उसाला कोयता लावणारच नाही अशीच भूमिका ऊस तोडणाऱ्यांनी घेतली आहे. दरम्यान जिल्ह्यातील अनेक साखर कारखाना कार्यक्षेत्रात याचे प्रमाण वाढल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

यंदा कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दराच्या संघर्षामुळे साखर कारखाने उशिरा सुरू झाले. यामुळे जिल्ह्यातील काही टोळ्या कर्नाटकात गेल्याने कारखान्यांची काही अंशी यंत्रणा डळमळीत असल्याचे चित्र निर्माण केले आहे. दरम्यान टोळ्या कमी असल्याचा गैरफायदा घेत शेतकऱ्यांकडून भरमसाठ पैसे उकळण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच मुळात यंदा उसाचे उत्पादन कमी असल्याने उसाची पळवापळवी सुरू आहे. पण एकही कारखाना जादा दर देण्याच्या मानसिकतेत नाही. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे कोण लक्ष देणार अशीच स्थिती बनली आहे.

ऊस तोड फडकऱ्यांच्या भूमिकेमुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून, कारखानदारांचे मात्र या प्रकाराकडे नेहमीप्रमाणेच सोयीस्कर दुर्लक्ष सुरू आहे. मुळात उसाचे उत्पादन घटले आहे, त्यात टोळ्यांची वसुली शेतकऱ्यांना न परवडणारी ठरत आहे. अशा स्थितीतही टोळ्यांची मनमानी सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत.

कारखान्यांना वेळेत ऊस घालविण्यासाठी शेतकरी धडपडत आहे. त्याचाच गैरफायदा घेऊन टोळ्या उघडपणे खुशालीची मागणी करीत आहे. सुरुवातीपासूनच ही खुशालीची पद्धत सुरू केली आहे. प्रतिटनामागे १०० रुपये घेतली जाणारी खुशाली आता ५०० रुपयांवर पोहोचली आहे.

एक एकरातील ऊस घालविण्यासाठी पाच ते ८ हजार रुपये खर्च येत आहे. उत्पादन कमी, त्यात ऊस घालवण्यासाठीचा खर्च पाहता शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघेना झाला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. टोळ्यांवर कारखानदारांचे नियंत्रण नसल्याने हे दर वाढतच चालले आहेत.

शेतकऱ्यांची आर्त हाक

माझ्या क्षेत्राला जाण्यास वाट नसल्याने दुसऱ्या शेतकऱ्यांवर अवलंबून रहावे लागते यामुळे २३ डिसेंबरपासून मी जवाहर सहकारी साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाण्यास विनंती करत आहे. जवाहर सहकारी साखर कारखान्याचा ऊस उत्पादक सभासद असल्याने कारखाना कर्मचाऱ्यांकडे विनंती केली. यावर कारखाना कर्मचाऱ्यांनी उडवाउडवी उत्तरे दिली.

दरम्यान मागचा एक आठवडा झाले ऊस जळाला आहे. याबाबत कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना वारंवार विनंती करूनही ऊस तोडला जात नसल्याने कोणाकडे दाद मागायची हाच प्रश्न पडला आहे. तसेच कारखाना प्रशासनाचे ऊस फडकऱ्यांवर नियंत्रण नसल्याने पैशाची वारंवार मागणी होतेय.

दादासो बाळू शिरगुप्पे - ऊस उत्पादक शेतकरी

ऊस नको रे बाबा...!

ऊस घालवण्यासाठी मोठ्या शेतकऱ्यांना टोळ्यांची सरबराईच करावी लागते. त्यांची राहण्याची सोय करण्यासह आठवड्यातून एकदा मांसाहारी जेवणाचा बेत आखावा लागतो. कधी कधी ओल्या पार्टीचेही नियोजन करावे लागते. त्यांच्या राशनसाठी पैसेही द्यावे लागतात. ट्रॅक्टरचालकाची एंट्री फीसुद्धा ४०० ते ५०० रुपये झाली आहे. ही सरबराई करताना शेतकरी अक्षरशः वैतागला असून, ऊस नको रे बाबा...! असे म्हणण्याची वेळ आल्याचे एका शेतकऱ्याने सांगितले.

Sugarcane Farmers
Kolhapur Sugarcane : कोल्हापूर विभागात ऊस गाळप हंगाम जोमात, गतवर्षीच्या तुलनेत यंदा पिछाडी

हंगाम लांबणीचा परिणाम

दरम्यान एका साखर कारखान्याचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, कारखाना सुरू होण्यास विलंब झाल्याने आलेल्या टोळ्या परराज्यात गेल्या याचा थेट परिणाम कारखान्यावर झाला. परंतु एखाद्या शेतकऱ्याची अडचण असेल तर साखर कारखाना यावर पर्याय शोधतो. ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्क साधून लवकर ऊस तोडला जाईल याबाबत प्रयत्नशील राहू असे म्हणाले.

संचालक, अधिकारी फोन उचलत नाहीत

कोल्हापूर जिल्ह्यात एका कारखान्याची ओळख आदर्श साखर कारखाना म्हणून आहे. परंतु कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार आणि शेतकऱ्यांची उघड लुबाडणूक होत असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी होत असल्याचे चित्र आहे. याबाबत कारखान्याचे संस्थापक संचालक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु ते फोन उचलू शकले नाहीत. याचबरोबर शेती अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला तेही कारखाना कामात व्यस्थ असल्याने फोन उचलू शकले नाहीत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com