
भरत टेमकर, डॉ. दत्तात्रय गावडे
Onion Storage Tips: कांदा नाशिवंत असल्यामुळे साठवणुकीत सुमारे २५ ते ४० टक्क्यांपर्यंत नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी कांदा साठवणगृहाची रचना योग्य असणे आवश्यक आहे. स्थानिक बाजारपेठेत भावाची स्थिरता आणण्यासाठी व निर्यातीची उपलब्धता वाढविण्यासाठी साठवण आवश्यक आहे.
कांदा हा दैनंदिन आहारातील अविभाज्य भाग आहे. इतर भाज्या किंवा फळे हंगामाप्रमाणे उपलब्ध झाली तरी चालतात, परंतु कांदा हा दररोज भाज्यांमध्ये आवश्यक असतो. त्यासाठी वर्षभर कांद्याची उपलब्धता होणे गरजेचे असते. कांदा प्रामुख्याने सप्टेंबर-ऑक्टोबर (२० टक्के), फेब्रुवारी-मार्च (२० टक्के) आणि एप्रिल महिन्यात (६० टक्के) काढला जातो. खरिपाचा नवीन कांदा ऑक्टोबरनंतर बाजारात येऊ लागतो. खराब हवामानामुळे खरिपाचा कांदा वाया गेला, तर फेब्रुवारीनंतर रांगड्या कांद्याची आवक सुरू होते. म्हणजे जून ते ऑक्टोबर, प्रसंगी फेब्रुवारीपर्यंत रब्बी हंगामात तयार झालेला
कांदा पुरवून वापरावा लागतो. त्यासाठी कांदा
साठवणुकीची अत्यंत गरज भासते. खरीप हंगामात कांदा काढला की लगेच मागणी असल्यामुळे बाजारात विकला जातो. तसेच कांदा सुकविण्यासारखी परिस्थिती व वातावरण नसल्याने खरिपाचा कांदा साठवला जात नाही. रांगडा हंगामातील कांदा सुकवून साठवता येऊ शकतो. परंतु खरी साठवण ही रब्बी कांद्याचीच करावी लागते. बदलत्या हवामानामुळे खरीप कांद्याचा पुरवठा अनिश्चित होत चालला आहे. अशा परिस्थितीत रब्बी हंगामात तयार झालेला आणि साठविलेल्या कांद्यावरच अधिक भर देणे आवश्यक आहे. तसेच स्थानिक बाजारपेठेत भावाची स्थिरता आणण्यासाठी व निर्यातीची उपलब्धता वाढविण्यासाठी साठवण आवश्यक आहे.
कांदा नाशिवंत असला तरी सतत पुरवठ्याच्या
दृष्टीने साठवण करणे अपरिहार्य ठरते. साठवणुकीत कांद्याचे सुमारे २५ ते ४० टक्क्यांपर्यंत नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी कांदा साठवणगृहाची योग्य रचना कशी असावी याबाबत माहिती असणे आवश्यक आहे.
साठवणीमध्ये कांद्याचे होणारे नुकसान
कांदा ही एक जिवंत वस्तू आहे. त्याचे मंदपणे श्वसन चालू असते. तसेच पाण्याचे उत्सर्जन देखील होत असते. साठवणुकीत कांद्याचे तीन प्रकारे नुकसान होते.
वजनातील घट
कांदा काढणीनंतर व्यवस्थित सुकवला तरी मे ते जुलै या काळात वातावरणातील तापमान जास्त असते. त्यामुळे वजनात घट येते. ही घट जातीपरत्वे २५ ते ३० टक्के असते.
कांद्याची सड
कांदा काढणीनंतर तो चांगला सुकविला नाही, तर वरचा पापुद्रा चांगला वाळत नाही. कांद्यावरील पापुद्रा ओलसर राहिला किंवा काढणी वेळी जखमा झालेल्या असतील तर त्यातून रोगकारक जंतूंचा शिरकाव होतो. परिणामी, कांद्याची सड होते. कांद्याची सड विशेषतः जुलै ते ऑगस्ट या दरम्यान जास्त होते. या काळात १० ते १५ टक्के नुकसान होते. साठवणुकीच्या काळात मान कुज, निळी कुज, तपकिरी बुरशी किंवा मऊ कुज इत्यादी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन सड वाढते. या बुरशी शेतामधूनच कांद्यासोबत साठवणगृहापर्यंत पोहोचतात.
कोंब येणे
कांदा काढणीसाठी तयार झाल्यानंतर माना मऊ होतात आणि पात आडवी होते. या काळात पानातील काही रासायनिक द्रव्ये कांद्यामध्ये उतरतात. ही रासायनिक द्रव्ये कांद्याला सुप्त अवस्था प्राप्त करून देतात. रांगडा आणि रब्बी कांद्याच्या माना व्यवस्थित पडतात. सुप्त अवस्था आणणारी रसायने कांद्यामध्ये उतरतात आणि म्हणून रब्बी कांदा काढणीनंतर लगेच कोंब न येता टिकतो. परंतु खरिपातील किंवा रांगडा कांद्याच्या माना पडत नाही. कांदा तयार झाला तरी त्याची वाढ चालू असते. नवीन मुळे आणि कोंब येत राहतात. कांद्यामध्ये सुप्तावस्था येत नाही. खरीप कांदा काढून त्याची पात कापली, की लगेच २ ते ४ दिवसांत त्याला कोंब येतात. याचे प्रमाण ७० ते ८० टक्के असते. म्हणूनच खरिपाचा कांदा टिकत नाही. तो लगेच वापरावा लागतो.
रब्बी कांदा चांगला सुकविल्यास त्यास लगेच कोंब येत नाहीत. परंतु ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांतील कमी तापमानामुळे काही रासायनिक बदल होतात. त्यामुळे कांद्याची सुप्तावस्था संपते व कोंब बाहेर येतात. या काळात कोंब येण्यामुळे जातीपरत्वे १० ते १५ टक्के नुकसान होते.
साठवणुकीवर परिणाम करणारे घटक
जातींची निवड
कांद्याच्या सर्वच जाती साठवणुकीत एकसारख्या प्रमाणात टिकत नाहीत. खरिपात तयार होणाऱ्या जातींचा कांदा टिकत नाही. रब्बी हंगामात तयार होणाऱ्या जातींचे कांदे ४ ते ५ महिने साठवणुकीत टिकतात. त्यातही जातीपरत्वे बराच फरक पडतो.
खत व पाणी नियोजन
सेंद्रिय खतांचा वापर केल्यामुळे कांद्याची साठवणक्षमता वाढते. त्यासाठी लागवडीवेळी जास्तीत जास्त शेणखत किंवा हिरवळीच्या खतांचा वापर करणे आवश्यक आहे. नत्राच्या सर्व मात्रा लागवडीनंतर ६० दिवसांच्या आतमध्ये द्याव्यात. उशिरा नत्र दिले, तर माना जाड होतात आणि कांदा टिकत नाही. तसेच साठवणुकीत बुरशीजन्य रोगांना लवकर बळी पडतो. कोंब येतात. काढणीपर्यंत पिकास पाणी दिले गेले तर कांद्याच्या माना पडत नाही. जमिनीत ओलावा राहिल्यामुळे नवीन मुळे फुटतात. अशा कांद्यांना काढणीनंतर कोंब येतात. त्यामुळे जमिनीचा प्रकारानुसार काढणी अगोदर २ ते ३ आठवडे पाणी बंद करावे. कांद्याच्या ५० ते ७० टक्के माना पडल्यानंतर काढणी करावी.
कांदा सुकवणे
काढणीनंतर कांदा शेतातच पातीसह सुकू द्यावा. कांद्याच्या ओळी लावताना पहिल्या ओळीतील कांदा दुसऱ्या ओळीतील पाल्याने झाकला जाईल अशाप्रकारे शेतात ३ ते ४ दिवस सुकू द्यावा. नंतर माना ३ ते ४ सें.मी. लांब ठेवून पात कापावी. चिंचोळी, जोडकांदे व डेंगळे कांदे वेगळे काढावेत. उर्वरित कांदे सावलीत ढीग करून १० ते १५ दिवस
ठेवावेत. या काळात कांद्याच्या माना वाळून पिरगळतात. तसेच वरचा पापुद्रा वाळून कांद्याला घट्ट चिकटतो. अशा वाळलेल्या भागातून रोगजंतूंचा कांद्यात सहज प्रवेश होत नाही. अशाप्रकारे वाळलेला कांदा अधिक काळ चांगला टिकतो.
साठवणगृहातील वातावरण
कांद्याची दीर्घकाळ साठवण करायची असल्यास, साठवणगृहातील तापमान व आर्द्रता या बाबींचा विचार प्रामुख्याने करावा लागतो. जास्त आर्द्रता (७५ ते ८० टक्के) व तापमान यामुळे मुळांची वाढ तसेच बुरशीची वाढ होते आणि कांदा सडतो. याउलट आर्द्रता अचानक कमी झाली (६५ टक्क्यांपेक्षा कमी) तर वजनातील घट वाढते.
त्यासाठी साठवणगृहात ६५ ते ७० टक्के आर्द्रता आणि तापमान २५ ते ३० अंश सेल्सिअसच्या दरम्यान असावे. मे-जून महिन्यांत साठवणगृहातील तापमान अधिक, तर आर्द्रता कमी असते. त्यामुळे वजनातील घट होते. जुलै ते सप्टेंबर या महिन्यांत आर्द्रता ७० टक्क्यांपेक्षा जास्त असते, त्यामुळे सड वाढते. तर ऑक्टोबर-डिसेंबर या काळात तापमान कमी होते, त्यामुळे कोंब येतात. नैसर्गिक वायुविजनाचा वापर करून साठवणगृहाची रचना केली, तर तापमान व आर्द्रता काही अंशी मर्यादित ठेवून साठवणुकीत नुकसान कमी करता येते.
साठवणगृहाची रचना
बहुतांश ठिकाणी कांदा चाळीची क्षमता, उभारण्याची दिशा, चाळ उभारणीसाठी जागेची निवड, चाळ उभारणीसाठी आवश्यक साहित्य याबाबत एकसारखेपणा आढळत नाही. आच्छादनासाठी सिमेंटचे पत्रे, पन्हाळी पत्रे कौल किंवा उसाचे पाचट यांचा वापर केला जातो. काही ठिकाणी दगडाच्या दोन भिंतीमध्ये कांदा साठवून तो प्लॅस्टिकच्या पेपरने झाकले जाते. अशा प्रकारच्या चाळीत कांद्याची सड मोठ्या प्रमाणात होते. साठवणीच्या काळातील हवामानाचा विचार करून नावीन्यपूर्ण कांदा चाळी विकसित केल्या आहेत.
कांदा चाळीची रचना
कांदा साठवणुकीसाठी चाळ ही दोन पाखी असावी. चाळीची रुंदी १६ फूट, तर मध्यभागी ४ फुटांची मोकळी जागा असावी. चाळीची लांबी आवश्यकतेनुसार ४० ते ६० फूट असावी. तळाला १ फुटाची मोकळी जागा असावी. चाळीची उंची मध्यभागी ८ फूट, तर बाजूने ५ फूट असावी. एक टन कांदा साठवणुकीसाठी ५० घनफूट जागा आवश्यक असते. साधारणपणे ४० फूट लांबीच्या दोन पाखी साठवणगृहात ६ फूट बाय ४ फूट बाय ४० फूट म्हणजे ९६० घनफूट जागा मिळते. त्यात साधारणपणे २० टन कांद्याची साठवणूक करणे शक्य होते. याप्रमाणे दोन्ही पाखीत मिळून ४० टन कांद्याची साठवण करता येते.
एका पाखीमध्ये कांद्याची उंची ४ फूट असावी. उंची वाढवली, तर तळाला दाब वाढतो. उत्सर्जित हवेचे चलन-वलन लवकर होत नाही व त्यामुळे कांदा सडतो. प्रत्येक पाखीमध्ये ३ इंच व्यासाचा व सर्वांगावर लहान छिद्रे असणार पी.व्ही.सी.पाइप मध्यावर घालावा. त्यातून गरम हवा लवकर बाहेर काढली जाते. काही भागात कौलाच्या एक पाखी चाळी वापरल्या जातात. परंतु त्यात तळाशी मोकळी जागा ठेवली जात नाही. त्यामुळे नुकसान वाढते. अशा चाळीची रुंदी ४ फूट व लांबी ४० ते ६० फूट असावी. मध्यभागी उंची ८ फूट, तर बाजूची उंची ५ फूट असावी. कौलाच्या पाख्या उभ्या भिंतीतून ३ फूट लांब असाव्यात.
महत्त्वाच्या बाबी
चाळीसाठी उंचावरील व पाणी न साचणारी जागा निवडावी.
दोन पाखी चाळ ही पूर्व-पश्चिम उभारावी, तर एक पाखी चाळ दक्षिणोत्तर उभारावी.
चाळीच्या तळाला मुरूम व वाळूचा थर देऊन नंतर चाळीची उभारणी करावी.
चाळीच्या तळाशी १ फुटाची मोकळी जागा ठेवावी. जेणेकरून खालील मोकळ्या जागेतून रात्री थंड हवा चाळीत येते. व गरम झालेली हवा चाळीच्या वरच्या त्रिकोणी भागात जमा होते. रात्री चाळीचे दरवाजे उघडे ठेवल्यास वाऱ्यासोबत गरम हवा बाहेर जाते.
चाळीचे छप्पर शक्यतो उसाच्या पाचटाने झाकावे. चाळीवरील कौले आर्थिकदृष्ट्या महाग पडतात व चाळ उभारणीचा खर्च वाढतो. तर सिमेंट किंवा पन्हाळी पत्र्यांनी चाळीत उष्णता वाढते. सिमेंटपत्रे व त्यावर उसाच्या पाचटाने आच्छादन केले, तर तापमान कमी राहण्यास मदत होते.
चाळीचे छप्पर उतरते असावे. छप्पर उभ्या भिंतीच्या ३ फूट पुढे असावे, त्यामुळे पावसाचे ओसाडे कांद्यापर्यंत पोहोचत व कांदा खराब होत नाही.
- डॉ. दत्तात्रय गावडे, ९४२१२७०५१०
(कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव, जि. पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.