Cotton Production : कापूस उत्पादनवाढीचे महत्त्वाचे मुद्दे

Cotton Cultivation : कापूस लागवड करताना जमिनीचा प्रकार, जातीचे गुणधर्म या बाबींचा विचार करून अंतराची निवड करावी. अपेक्षित उत्पादनासाठी शिफारशीनुसार खत मात्रा, पाणी नियोजन आणि पीक व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.
Cotton Production
Cotton ProductionAgrowon

डॉ.बी.डी.जडे

Cotton Production Update : राज्यातील कापूस उत्पादकता ही ३०६ किलो रुई प्रति हेक्टरी एवढीच आहे. उत्पादकता कमी असण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बहुतांश लागवड कोरडवाहू आणि पावसावर अवलंबून आहे. लागवड पावसावर अवलंबून असल्याने पेरणी योग्य वेळेवर करता येणे शक्य होत नाही. कापसाची लागवड जसजशी उशिरा होईल तशी उत्पादनात घट येते.

कापूस लागवड हलक्या जमिनीत करतात. त्यामुळे उत्पादन कमी मिळते. महाराष्ट्रातील उत्पादकता कमी असण्याचे कारण म्हणजे सिंचनाचा अभाव, असंतुलित पोषण, एकरी झाडांची कमी संख्या, उशिरा लागवड, हलक्या जमिनीत लागवड, पीक संरक्षणाकडील दुर्लक्ष. पाटपाणी पद्धतीमुळे पाण्याचा वापर भरपूर होऊन जमिनीत कायम वाफसा राहात नाही.

जमिनीतील कमी, जादा ओलाव्यामुळे पात्या, फुले, बोंडांची गळ मोठ्या प्रमाणावर होत असते. बोंड वाढण्याच्या अवस्थेत पुरेसा ओलावा, पुरेसे अन्नद्रव्य उपलब्ध नसल्यामुळे बोंडांचे वजन कमी भरते.

ठिबक सिंचनाचे नियोजन

१) जे शेतकरी निव्वळ पावसाच्या भरवश्यावर कापूस लागवड करतात त्यांना एकरी ३ ते ४ क्विंटल उत्पादन मिळते. ठिबक सिंचन पद्धतीवर कापूस लागवड करून एकरी १५ ते२० क्विंटल उत्पादन मिळते.

२) पूर्व मशागत झाल्यानंतर ठिबक सिंचनासाठी शेती सर्व्हेक्षणकरून आराखडा तयार करावा. त्यानुसार ठिबक सिंचन संचाचे नियोजन करावे. ठिबक सिंचन संचाची निवड करताना तडजोड करू नये. पाण्याचा स्रोत आणि गुणवत्तेनुसार फिल्टरची निवड करावी.

३) इनलाईन ठिबक पद्धतीचा अवलंब करावा. इनलाईन नळी १२, १६ आणि २० मि.मी. मध्ये उपलब्ध आहे. दोन ड्रिपर मधील अंतर जमिनीच्या प्रकारानुसार निवडावे.

४) मध्यम प्रकारच्या जमिनीकरिता दोन ड्रिपरमधील अंतर ४० ते ६० सेंमी आणि ड्रिपरचा प्रवाह ४ लिटर प्रती तास असलेली १२ मिमि किंवा १६ मिमि इनलाईन नळीची निवड करावी.

५) लोड शेडींगच्या काळात कमी प्रवाहाच्या ड्रिपरपेक्षा अधिक प्रवाहाचे ड्रिपर जास्त उपयुक्त ठरतात. कमी वेळेमध्ये अधिक क्षेत्र भिजू शकते.

Cotton Production
Cotton Market : कापूस वायद्यांमध्ये पुन्हा सुधारणा; शेतकऱ्यांना आज काय भाव मिळाला?

लागवडीचे अंतर

संकरित जातींची लागवड टोकण पद्धतीने करावयाची असल्याने योग्य अंतराची निवड करावी. पसरणाऱ्या जातीसाठी दोन रोपांमध्ये अंतर अधिक असावे. उभट वाढणाऱ्या जातीसाठी दोन रोपांतील अंतर कमी ठेवावे. जमिनीचा प्रकार, जातीचे गुणधर्म या बाबींचा विचार करून अंतराची निवड करावी.

लागवडीचे अंतर (फूट) --- एकरी झाडांची संख्या

४ X २ --- ५,४४५

४.५ X २--- ४,८४०

५ X २ --- ४,३५६

५ x १.२५ -- ६,९६९

५ x १.५ ----- ५,८०८

४ x १.५ ---७,२६०

४ x १.२५ ---- ८,७१२

४.५ x १.२५ ---- ७,७४४

५ x १ --- ८,७१२

५ x १.२५---- ६,९६९

लागवड

१) निवड केलेल्या अंतरावर उदा. ५'X२' ठिबक सिंचनाची इनलाईन नळी सरळ पसरावी. लागवड करण्यापूर्वी संच कमीत कमी १५ ते २० मिनिटे चालू करावा. जेणेकरून १ ते १.२५ लिटर पाणी पडेल. लागवड करताना चांगले कुजलेल्या शेणखताचा वापर करावा. ज्या ठिकाणी ड्रिपरचे पाणी पडले त्या ठिकाणी बियाणे २ ते ३ सेंमी खोल टोकावे. जमीन नेहमी वाफसा अवस्थेत राहील याची काळजी घ्यावी.

२) पाणी आणि खतांची उपयोगिता वाढविण्याकरिता विद्राव्य खतांचा वापर ठिबक संचामधून करावा. युरिया आणि पांढरा पोटॅश पाण्यात संपूर्ण विरघळत असल्यामुळे ठिबक सिंचनातून वापर करता येऊ शकतो. फर्टिगेशनसाठी फर्टिलायझर टॅंक किंवा व्हेंचुरीचा उपयोग करावा.

३) पिकाला माती परिक्षण अहवालानुसार खतमात्रा द्यावी. सूक्ष्म अन्नद्रव्ये, दुय्यम अन्नघटक, गांडूळ खत, निबोंळी पेंड किंवा शेणखतामध्ये मिसळून वापरावीत. फर्टिगेशन पूर्ण उगवण झाल्यावर सुरू करावे.

४) पीक वाढीच्या टप्यात शिफारशीनुसार विद्राव्य खतांची फवारणी करावी.

५) कायिक वाढ अधिक होऊ नये म्हणून नत्र खतांचा (युरिया) वापर हा माती परिक्षण अहवाल किंवा शिफारशीनुसार करावा.

६) जमिनीमध्ये ओलाव्याचे प्रमाण कमी-अधिक झाल्यास किंवा तापमानामध्ये अचानक बदल झाल्यास पात्या, फुलांची गळ होऊ शकते. ठिबक सिंचनाद्वारे जमीन कायम वाफसा अवस्थेत ठेवावी.

ठिबक सिंचनावर लागवड

लागवडीचे अंतर (फूट)---एकरी झाडांची संख्या

४ X १.५--- ७,२६०

४ X २--- ५,४४५

४.५ X १.५ --- ६,४५३

५ X १.५ --- ५,८०८

१) विविध अंतरावर लागवड केली असली तरी आपण एकरी २० क्विंटल पेक्षा अधिक उत्पादन मिळवू शकतो. आपण सरासरी एकरी झाडांची संख्या ५,००० आहे असे समजूयात.

२) बागायती कापसाच्या झाडाला जाती निहाय फळफांद्यांची संख्या १८ ते २२ पर्यंत मिळते. सरासरी १८ ते १९ फळफांद्या जरी मिळाल्या. प्रत्येक फळ फांदीवर ४ ते ५ बोंडे जरी मिळाली तरीही आपणास ७५ ते ८५ बोंडापेक्षाही अधिक बोंडे मिळतात.

३) ठिबक सिंचन पद्धतीने पाणी आणि रासायनिक खते दिलेल्या, फर्टिगेशन केलेली कापसाची बोंडे चांगली पोसली जाऊन वजनदार भरतात. कापसाच्या बोंडाचे सरासरी वजन प्रत्येकी ५ ते ६ ग्रॅम जरी मिळाले म्हणजेच प्रत्येक कापसाच्या झाडांपासून सरासरी ४०० ग्रॅम जरी कापूस मिळाला. सरासरी एकरी ५००० जरी झाडे असली तरीही एकरी २० क्विंटल किंवा त्याहून अधिक कापसाचे उत्पादन खात्रीने मिळू शकते. त्यानुसार पिकाचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

कोरडवाहूमध्ये लागवड

लागवडीचे अंतर (फूट) --- एकरी झाडांची संख्या

४ X १.२५--- ८,७१२

४ X १ --- १०,८९०

३.५ X १ --- १२,४४५

३.५ X १.२५ ---९,९५७

१) कोरडवाहू लागवडीसाठी जात निवडताना बागायती कपाशीसोबत स्पर्धा करू नये. कमी कालावधी आणि सरळ वाढणारी जात निवडावी. लागवडीचे अंतर ठरविताना जमिनीचा प्रकार विचारात घ्यावा.

२) हलक्या, मध्यम, भारी जमिनींकरीता विविध अंतरे दिली आहेत. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी कोरडवाहू लागवड केलेली आहे असे आपण समजूयात. कोरडवाहू कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी लागवड करताना उत्पादनाचा लक्षांक १० क्विंटल ठेवूनच पिकाचे व्यवस्थापन करावे.

Cotton Production
Cotton Market : कापूस बाजारावरील दबाव वाढला; कापूस भाव पुन्हा निचांकी पातळीवर

३) कोरडवाहू कापूस पिकाचे एकरी १० क्विंटल उत्पादन मिळण्यासाठी वरील विविध लागवडीची अंतरे विचारात घेऊन एकरी सरासरी ८,५०० ते १०,००० झाडे असावीत. प्रत्येक कापसाच्या झाडाला सरासरी १० ते १२ जरी फळफांद्या मिळाल्या आणि प्रत्येक फांदीवर तीन ते चार जरी चांगली बोंडे मिळाली तरी पुरेसे आहे.

प्रत्येक कापसाच्या झाडावर सरासरी २८ ते ३० कापसाची बोंडे जर मिळाली आणि रासायनिक खते तीन हप्त्यांमध्ये विभागून दिल्यास, तसेच विद्राव्य खतांचे फवारणी केल्याने बोंडाचे वजन ३.५ ते ४ ग्रॅम मिळणे सहज शक्य आहे. प्रत्येक झाडापासून १०० ते १२५ ग्रॅम कापूस मिळाल्यास एकरी १० क्विंटल पेक्षा अधिक कापसाचे उत्पादन मिळू शकते. कापसाचे वेचणी एकाच वेळी संपत नाही.

४) कोरडवाहू कापसाची दोन ते तीन वेचणी केली जाते. प्रत्येक झाडावर १०० ते १२५ ग्रॅम कापूस जरी मिळाला तरी एकरी ८,५०० ते १०,००० झाडांपासून एकरी १० क्विंटल उत्पादन मिळू शकते.

संपर्क - डॉ.बी.डी.जडे,९४२२७७४९८१, (वरिष्ठ कृषी विद्या शास्त्रज्ञ, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.जळगाव)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com