Organic Curb : सेंद्रिय कर्बाचे महत्त्व

Organic Matter : सेंद्रिय पदार्थांचे कण, ह्युमस, विरघळलेला सेंद्रिय पदार्थ व बुरशीप्रतिरोधक सेंद्रिय पदार्थ हे घटक मातीत उपलब्ध असतात. मातीचा प्रकार, जडणघडण, मातीचे व्यवस्थापन आणि त्या प्रदेशातील हवामान हे सर्व घटक मातीतील सेंद्रिय पदार्थांवर परिणाम करतात.
Organic Curb
Organic CurbAgrowon
Published on
Updated on

डॉ. एस. एन. पोतकिले, डॉ. पी. एन. दवणे, डॉ. वाय.बी. धार्मिक

Soil Organic Matter : मातीतील सेंद्रिय पदार्थ प्रामुख्याने कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून बनलेले असतात. सेंद्रिय पदार्थांच्या अवशेषांमध्ये अन्नद्रव्ये, नत्र, स्फुरद, पोटॅशिअम, गंधक, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम यांचे प्रमाण अल्प असते.

सेंद्रिय पदार्थांचे कण, ह्युमस, विरघळलेला सेंद्रिय पदार्थ व बुरशीप्रतिरोधक सेंद्रिय पदार्थ हे घटक मातीत उपलब्ध असतात. मातीचा प्रकार, जडणघडण, मातीचे व्यवस्थापन आणि त्या प्रदेशातील हवामान हे सर्व घटक मातीतील सेंद्रिय पदार्थांवर परिणाम करतात.

सेंद्रिय खतांचा अभाव, रासायनिक खतांचा अधिक वापर, एकपीक पद्धती, पाण्याचा अतिवापर, जमिनीची धूप, अन्नद्रव्यांची वाढती गरज आणि या सर्वांचा मातीवर पडणारा भार यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत जाते. त्याचा पिकांच्या वाढीवर, उत्पादनावर, उत्पादकतेवर आणि गुणवत्तेवर परिणाम दिसून येतो.

भौतिक गुणधर्मात सुधारणा

सेंद्रिय कर्ब अति सूक्ष्म चिकण मातीच्या कणांशी संयोग होऊन चिकण माती ह्युमस असा संयुक्त पदार्थ तयार करतात. त्यामुळे मातीच्या भौतिक गुणधर्मात सुधारणा होते. जमिनीची घनता कमी होऊन मातीच्या कणाकणांतील पोकळी वाढून हवा खेळती राहते.

पाणी मुरण्याची व निचरा होण्याची क्षमता वाढते, जमिनीची धूप थांबते. जमिनीची जलधारणा शक्ती वाढते, जमिनीची जडण-घडण रचना अनुकूल होते. या सर्व भौतिक गुणधर्मात सुधारणा होत असल्याने पीकवाढीला गती मिळते.

सेंद्रिय पदार्थ कुजण्याची क्रिया होत असताना डिंकासारखा पदार्थ निर्माण होतो (यालाच वैज्ञानिक भाषेत पॉलीसॅकराइड असे म्हणतात). हा डिंकासारखा पदार्थ अनेक मातीचे लहान कण एकत्र आणून त्याची दाणेदार रचना तयार करतो. शास्त्रीय भाषेत त्याला मातीची कणरचना म्हणतात.

Organic Curb
Organic Curb : जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे महत्त्व

रासायनिक गुणधर्मात सुधारणा

सुपीक जमिनीतील कर्बःनत्र गुणोत्तर हे ९:१ ते १२:१ च्या दरम्यान असते. ह्युमस किंवा जमिनीतील सेंद्रिय पदार्थांमध्ये एकूण नत्राचे प्रमाण ५ ते ५.५ टक्के आणि कर्बाचे प्रमाण ५० ते ५८ टक्के इतके असते.

तसेच विविध पिकांच्या अवशेषातील कर्ब: नत्र गुणोत्तर प्रमाण हे २५:१ ते १०४:१ पर्यंत असते. शेणखतात हेच प्रमाण २०:१ असे असते. गुणोत्तराचे प्रमाण जितके अधिक तितका जास्त वेळ ते कुजण्यास लागतो. कमी गुणोत्तरामुळे सेंद्रिय स्वरूपातील नत्र, स्फुरद, गंधक व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे रूपांतर रासायनिक स्वरूपात लवकर होऊन ते पिकांना उपलब्ध होते.

मात्र, २०:१ गुणोत्तरापेक्षा अधिक कर्ब नत्रः गुणोत्तर असेल तर सर्व अन्नद्रव्ये सेंद्रिय स्वरूपात परावर्तित होऊन त्याचे स्थिरीकरण होते आणि पिकांना ती अन्नद्रव्ये उपलब्ध होत नाही. साधारणतः १३:१ ते १६:१ हे गुणोत्तर अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने अधिक उपयुक्त आहे.

- सेंद्रिय कर्बामुळे रासायनिक द्रव्याची उपलब्धता वाढून नत्र आणि स्फुरदाच्या उपलब्धतेवर अनुकूल परिणाम होतो.

- रासायनिक नत्राचा ऱ्हास टळतो, स्फुरद स्थिरीकरणाची प्रक्रिया मंदावते आणि स्फुरदाची उपलब्धता वाढण्यास मदत होते.

- जमिनीचा सामू उदासीन ठेवण्यास मदत होते.

- जमिनीमधील सेंद्रिय कर्बाद्वारे जिवाणूंना ऊर्जा पुरविली जाते. त्यामुळे जिवाणूंची कार्यक्षमता वाढून अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.

- सेंद्रिय कर्बातील फुलविक आम्ल आणि ह्युमिक पदार्थामुळे रासायनिक सूक्ष्म अन्नद्रव्ये युक्त पदार्थांचा ऱ्हास अथवा स्थिरीकरण होत नाही. विद्राव्य स्वरूपात ही अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होते.

- जैविक गुणधर्मात सुधारणा

- जमिनीतील सूक्ष्मजीवांचे गट

- सेंद्रिय पदार्थ कुजविणारा गट

पिकाला अन्नद्रव्य पुरविणारा गट

यातील पहिला गट जमिनीला सुपीकता देत असतो, तर दुसरा गट पिकाला पोषण पुरविण्यात तसेच अन्न पोषणात जिवाणू ॲक्टिनोमायसेटिस व बुरशींच्या अनेक प्रजाती कार्यरत असतात. कुजविण्याच्या क्रियेतून अनेक सेंद्रिय आम्ल, संजीवके व वाढ वृद्धिंगत पदार्थ तयार होत असतात.

जमिनीतील वेगवेगळ्या जिवाणूंना सेंद्रिय कर्बाद्वारे ऊर्जा पुरविली जाते. त्यामुळे कार्यक्षमता चांगली होऊन अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.

स्थिर सेंद्रिय कर्ब

कुजण्यास हलका असलेला पदार्थ कुजविल्यास तयार होणारे खत देखील हलक्या दर्जाचे असते. म्हणजेच ३ ते ४ महिन्यांच्या हंगामी पिकाअखेर त्याचा परिणाम संपून जातो. याविरुद्ध कुजण्यास जड असणारे पदार्थ कुजविल्यास स्थिर कर्ब तयार होतो.

या स्थिर कर्बाची उपलब्धता जमिनीत बऱ्याच वर्षांपर्यंत असू शकते. यालाच शास्त्रीय भाषेत ‘ह्युमस’ असे म्हणतात. कुजण्यास हलके पदार्थ जिवाणूंपासून, तर मध्यम दर्जाचे ॲक्‍टिनोमायसेटस व कुजण्यास जड पदार्थ बुरशींकडून कुजाविले जातात.

Organic Curb
Organic Farming : लोहा तालुक्यात होणार सेंद्रिय शेतीचे क्लस्टर

सेंद्रिय कर्ब वाढविण्याचे उपाय

- सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त वापर.

- पीक अवशेषांचे आच्छादन म्हणून वापर करावा.

- कमी मशागत करावी.

- पिकांचे अवशेष न जाळता जमिनीत गाडावेत.

- एकपीक पद्धती व आंतरपीक पद्धतीमध्ये कडधान्य पिकांचा समावेश करावा.

- धैंचा किंवा बोरू सारखी हिरवळीचे पीक जमिनीत गाडावे.

- मृद् व जल संधारणाचे उपाय करून जमिनीची धूप टाळावी.

- वखराच्या शेवटच्या पाळी अगोदर सेंद्रिय किंवा कंपोस्ट खताचा वापर करावा.

- जैविक खतांचा वापर वाढवावा. तसेच त्यांचा वापर शेणखतात मिसळून व बीजप्रक्रियेसाठी करावा.

- खतांची मात्रा संतुलित प्रमाणात योग्य वेळी व योग्यप्रकारे द्यावी. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा.

- सेंद्रिय कर्ब हा पिकांच्या अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेसाठी व सूक्ष्म जीवाणूंच्या वाढीसाठी, ह्युमिक कर्ब जमिनीचे भौतिक गुणधर्म सुधारण्यासाठी तसेच निष्क्रिय कर्ब जमिनीचे तापमान वाढविण्यासाठी आवश्यक असतात. सेंद्रिय कर्बामुळे विकरांचे प्रमाण वाढून अन्नद्रव्यांचे उपलब्धतेवर चांगला परिणाम होतो. ही विकरे अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवितात. नत्र स्फुरद व पालाश यांची उपलब्धता वाढविण्यासाठी विविध प्रकारचे जिवाणू कारणीभूत असतात.

संपर्क - डॉ. एस. एन, पोतकिले, ९४२२२८४८३४, (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com