Akola News : शेतकऱ्यांना कुठल्याही स्थितीत नुकसानात जाऊ देणार नाही. दिवसा १२ तास विजेसाठी प्रकल्प उभारणी, शून्य पैसे वीजबिल असे अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतले. आता आमचे सरकार आले की शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देणार, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मूर्तीजापूरमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, ‘‘भाजप निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांना १५ हजार रुपये अर्थसहाय्य देणार आहे. गेल्या वर्षात कापूस, सोयाबीनचे भाव पडल्याने पाच हजारांचे थेट अनुदान दिले. यापुढे जेव्हा जेव्हा या पिकांचे भाव हमीभावाखाली जातील तेव्हा दरातील तफावत सरकार थेट खात्यात जमा करेल, असा निर्णय घेतला आहे.
शेतकऱ्याला आपण नुकसानात जाऊ देणार नाही. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली पाहिजे, अशी मागणी होती. त्यासाठी महाराष्ट्रात देशातील पहिली शेती वीज वाहिनी कंपनी आपण काढली. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दिवसा १२ तास वीज मिळेल. हे सर्व करीत असताना शेतकऱ्यांना कृषिपंपाचे बिलही भरावे लागणार नाही, असा निर्णय घेतला.
सर्व पैसे सरकारने भरेल. पुढची पाच वर्षे शेतकऱ्यांना वीजबिल येणार नाही. त्याचबरोबर सौर कृषिपंपांचीही योजना आणली आहे. हा कृषिपंप घेतला तर २५ वर्षे पैसे भरावेच लागणार नाहीत. हे सरकार शेतरक्यांच्या पाठिशी उभे राहणारे आहे. आता आमचे सरकार आले तर पूर्ण कर्जमाफीही देणार आहोत. समाजातील सर्व घटकांचा विचार आपण केलेला आहे.’’
तेव्हा लोक हसायचे
मी जेव्हा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग बांधकामाबाबत बोलायचो तेव्हा लोक माझ्यावर हसायचे. पण आपण ते करून दाखवले. पाच वर्षांत समृद्धी एक्स्प्रेस-वे तयार झाला. त्यामुळे आता नागपूर-मुंबई जोडली गेली. अमरावतीला टेक्स्टाईल पार्क उभे राहिले. देशातील सर्वांत मोठा नदीजोड प्रकल्प करीत आहोत. ५५० किलोमीटरची एक नवीन नदीच तयार होणार आहे. यामुळे १० लाख एकर जमीन ओलिताखाली येईल. ८८ हजार कोटींचा हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर विदर्भात सिंचनाचे स्वप्न पूर्ण होईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महिलांना सक्षम करण्याचे धोरण
फडणवीस म्हणाले, की महिलांना सक्षम करण्याचे काम हातात घेतले आहे. महाराष्ट्रात ११ लाख लखपतीदिदी तयार केल्या. ज्या घरात मुलगी जन्माला येईल तिला १८ वर्षांची झाली की १ लाख रुपये मिळतील. मुलीच्या उच्चशिक्षणाची सोय सरकारने केली आहे. तीची फी राज्य सरकार भरीत आहे.
अडीच कोटी लाडक्या बहिणींना नोव्हेंबरपर्यंतचे पैसे देऊन सरकार मोकळे झाले. काँग्रेस नेत्यांनी ही योजना रद्द करण्यासाठी न्यायालयात पिटीशन दाखल केली आहे. पण न्यायालयाने ही योजना सुरूच राहील हे स्पष्ट केले. सरकार आले की १५०० च्या जागी २१०० रुपये देऊ, असेही फडणवीस म्हणाले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.