
जितेंद्र दुर्गे, डॉ. नंदकिशोर चिखले, डॉ. वर्षा टापरे
Millet Year : जगभरामध्ये २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’ (Millet Year) म्हणून साजरे होत आहे. विविध पोषक घटकांनी युक्त असल्यामुळे भडधान्यांचे आहारातील (Millets In Diet) महत्त्व वाढते आहे. भरडधान्ये विविध आजारांमध्ये गुणकारी मानली जातात. या पिकांची उत्पादनक्षमता कमी असली तरी त्यांना चांगला बाजारभाव मिळतो.
भारताच्या वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची गरज पूर्ण करण्यासाठी हरित क्रांतीच्या (Green Revolution) माध्यमातून मुख्यत्वे गहू व तांदूळ पिकावर लक्ष केंद्रित करण्यात आले.
त्यामुळे काळाच्या ओघात दुय्यम भरडधान्य पिके लागवडीमध्ये मागे पडली गेली. आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षाच्या निमित्ताने या पिकांना नवसंजीवनी प्राप्त झाल्याचे दिसत आहे.
भरडधान्य पिकांचे वर्गीकरण ः
भरडधान्ये पिकांची विभागणी प्रामुख्याने दोन प्रकारात केली जाते. त्यात मुख्य भरडधान्य आणि दुय्यम भरडधान्य असे प्रकार पडतात. त्यांची लागवड प्रामुख्याने खरिप हंगामात पावसाच्या पाण्यावर पहाडी भागात केली जाते.
याशिवाय तृणधान्यवर्गीय नसलेले, मात्र तृणधान्यवर्गीय भरडधान्य पिकांप्रमाणेच सेवन केल्या जाणाऱ्या पिकांना ‘सुडोमिलेट्स’ (नॉन सीरियल मिलेट्स) असे म्हणतात.
तृणधान्यवर्गीय भरडधान्य पीक नसलेले, परंतु भरडधान्याप्रमाणेच सेवन केल्या जाणाऱ्या पिकांचा सुडोमिलेट्समध्ये समावेश होतो. यात १० ते १२ पिकांचा समावेश होतो.
१) मुख्य भरडधान्य पिके ः ज्वारी, बाजरी, नाचणी (नाचणीचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.)
२) दुय्यम भरडधान्ये ः राळा (भादली/सावा/कंगणी/ छोटी कंगणी/ हरी कंगणी), चिना (वारी), कोदो (कोद्रा), कुटकी (गुंडाली/सेवा), भगर (सवान/बुची).
३) सुडोमिलेट्स ः राजगिरा (लालमाठ/ हरामाठ/ सामदाना), कुट्टु, चिचासिड, वॅटलसीड, कानिवासीड, ब्रेडनट, पीटसीड (गुजफुलसीड), फॅरहेन मिलेट, हंजा, सब्जा.
दुय्यम भरडधान्ये व सुडोमिलेट्स फायदे ः
- सद्यःस्थितीत चांगला बाजारभाव.
- लागवड क्षेत्र अत्यंत कमी असल्यामुळे चांगली संधी.
- खरिपातील सोयाबीन व कपाशी तसेच रब्बीतील हरभरा व गहू पिकांस उत्तम पर्याय.
- पीक फेरपालटीसाठी चांगला पर्याय.
- पोषक घटकांनी युक्त.
- पेरणीसाठी एकरी कमी बियाणे लागते (पिकनिहाय साधारणत: अर्धा ते ४ किलो प्रति एकर)
- बियाणे खर्च, खतमात्रेत बचत.
- किडी, रोगांना बळी पडण्याचे प्रमाण कमी.
- एक किंवा दोन संरक्षित ओलितामध्ये शाश्वत उत्पादन.
महत्त्वाच्या बाबी ः
१) भरडधान्यांचे बियाणे आकाराने बारीक असल्यामुळे बैलजोडीचलित पेरणी यंत्राच्या (तिफण किंवा काकरी) साह्याने करावी. पहाडी प्रदेशात बियाणे फोकून पेरणी केली जाते. मात्र, ती शास्त्रोक्त पेरणी पद्धती नाही.
२) दोन झाडांतील अंतर आणि बियाणे प्रमाण योग्य राखण्यासाठी पेरणीवेळी बियाण्यासोबत १:१ किंवा १:४ किंवा १:९ या प्रमाणात रेती, लाकडी भुस्सा, गांडूळ खत, शेणखत किंवा राख यापैकी एक मिसळावे.
पेरणी पद्धती ः
१) सरत्याद्वारे पेरणी करताना दोन बोटांच्या चिमटीत (अंगठा व पहिले बोट म्हणजेच तर्जना), बियाणे घेऊन पेरणी करावयाची झाल्यास एक भाग बियाणे अधिक एक भाग रेती मिसळावी.
२) पहिल्या तीन बोटांच्या साह्याने पेरणी करताना (म्हणजेच अंगठा, तर्जनी व मध्यमा), एक भाग बियाणे अधिक चार भाग रेती मिसळावी.
३) पहिल्या चार किंवा पाच बोटांच्या साह्याने पेरणी करताना, एक भाग बियाणे अधिक नऊ भाग माळूची रेती मिसळावी.
- पेरणी उथळ म्हणजेच १.५ ते ३ सेंमी पेक्षा जास्त खोलीवर करू नये.
- पेरणीच्या आधी शेतात वरचा थर घट्ट करण्याच्या दृष्टीने पठाल मारावी.
- पेरणी थोडी उशीरा म्हणजेच पावसाचा जोर ओसरल्यानंतर करावी. जेणेकरून पेरणी केलेले बारीक बियाणे वाहून जाणार नाही किंवा दडपणार नाही.
- बीजप्रक्रियेकरिता ताजे शेण, गोमुत्र, हळद व राख यांचा वापर करावा. त्यानंतर बियाणे सुकवून नंतर पेरणी करावी.
पीकनिहाय लागवड पद्धती ः
पीक---पेरणीची वेळ----बियाणे प्रमाण (किलो/ एकर)---पेरणी खोली (सेंमी)---पेरणी अंतर (सेंमी)---अन्नद्रव्यांची मात्रा (किलो/एकर---कालावधी---वाण---उत्पादन (क्विंटल/एकर)
१) रागी/नाचणी---मे ते जुलै---पेरणीसाठी ३.५ ते ४ किलो, पुनर्लागवड ः २ किलो---२ ते ३ सेंमी---२२.५ ते ३० सेंमी बाय ७.५ ते १० सेंमी---२०:२०:१० किलो प्रति एकर. त्यापैकी पेरणीवेळी १० किलो नत्र आणि उर्वरित १० किलो नत्र पेरणीनंतर २५- ३० दिवसांनी---११० ते १३० दिवस---गौतमी, पद्मावती, निर्मल, कल्याणी, शारदा, गोदावरी, व्हीएल-१०१, व्हीएल-११०, व्हीआर-७०८, व्हीएल-१४९, दापोली -१, फुले नाचणी, दापोली सफेद, फुले कासारी, भैरवी, डीपीएल-१, जीपीयू -४५, जीपीयू-६७ ---ओलित ८ ते १०, कोरडवाहू ३ ते ४.५
२) राळा/ सावा---जुनचा पहिला पंधरवडा ते जुलै दुसरा पंधरवडा---४-५ किलो---२-३ सेंमी---२२.५ ते ३० सेंमी बाय ७.५ ते १० सेंमी---२०:२०:२० किलो--- ८०-१०० दिवस---अर्जुना, नगठाणा, चित्रा, एच-१, एच-२, सीओ-२, सीओ-४, पीएस-४, एआयए-३२६, एआयए ३०८५, एआयए ३०८८---ओलीत ः ६ ते ८, कोरडवाहू ः ३ ते ४
३) वरी---जुनचा शेवटचा आठवडा ते जुलै पहिला आठवडा---पेरणी ः ४ ते ५ किलो, पुनर्लागवड ः ३ किलो---२-३ सेंमी---२२.५ ते ३० सेंमी बाय ७.५ ते १० सेंमी---१०:१०:० किलो प्रति एकर---९० ते १०० दिवस---रामचिना, शामचिना, एआयए ३३६, एमएस-४८८४, वऱ्हाडा, बऱ्हाडा---ओलित ः ६ ते ७ क्विंटल, कोरडवाहू ः ३ ते ४ क्विंटल
४) कोद्रो---जून मध्य ते जुलै मध्य---पेरणी ः ४ ते ६ किलो---२ ते ३ सेंमी---२२.५ ते ३० सेंमी बाय ७.५ ते १० सेंमी---४०:२०:२० किलो प्रति एकर. २० किलो नत्र पेरणीवेळी, उर्वरित २० किलो नत्र पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी---१५० ते १८० दिवस---कोद्रा-१, दिंडोरी-७३, निवास-१, पाली-१, पीएससी १, पीएससी २, आयपीएस १४७-११, जेपीके ३, जेपीके १३, जेपीके ६५, जेके ४१, जेके ७६, जेके ४२, जेके ५५---ओलित ः ४-६ क्विंटल, कोरडवाहू ः २-३ क्विंटल
५) भगर / वरी---जुलै पहिला पंधरवाडा---४ ते ६ किलो---३ ते ४ सेंमी---२० ते २५ सेंमी बाय ७.५ ते १० सेंमी---१६:१२:८ किलो/ एकर, पेरणीवेळी ८ किलो नत्र, पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी ८ किलो नत्र.---९० ते १०० दिवस---अनुराग, आरएयू ३, व्हीएल १, व्हीएल २९२९, ईसीसी ७, व्हीएल २०३, फुले एकादशी--- ६ ते ७ क्विंटल.
६) कुटकी---जून शेवटचा आठवडा ते जुलै पहिला आठवडा---पेरणी ३ ते ३.५ किलो---२ ते ३ सेंमी---२२.५ सेंमी बाय ७.५ सेंमी---१०:१०:१० किलो---८० ते १०० दिवस---वरी १, दिंडोरी १, दिंडोरी २, पीआरसी ३, के १, जीपीयूपी ८, जीपीयुपी २१, के १, के २, सीओ २, सीओ ३, सीओ ४---४ ते ५ क्विंटल.
सुडोमिलेट्स (नॉन सीरियल मिलेट्स)
१) कुट्टु---ऑक्टोबर ते नोव्हेंबर---पेरणी ८ किलो---४ ते ६ सेंमी---३० सेंमी बाय १० सेंमी---८:४:४ किलो---९० दिवस कोटो, मनकान---४.५ ते ६ क्विंटल
२) राजगिरा---१५ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर---४०० ते ५०० ग्रॅम---१ ते १.५ सेंमी---४५ सेंमी बाय १५ ते २० सेंमी---२४:१६:८ किलो---९० दिवस---अन्नपूर्णा, सुवर्णा, फुले कार्तिकी, जीए १---पाने ः ४-५ टन, धान्य- ४-५ क्विंटल
३) चियासीड---ऑक्टोबर ते नोव्हेंबर---१ ते १.५ किलो---१.५ सेंमी---४५ सेंमी बाय १५ ते २० सेंमी---११५ ते १२० दिवस---५ ते ६ क्विंटल
जितेंद्र दुर्गे, ९४०३३०६०६७ (सहयोगी प्राध्यापक, कृषिविद्या विभाग,
डॉ. नंदकिशोर चिखले, (श्री. शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती)
डॉ. वर्षा टापरे, (प्रमुख, प्रादेशिक संशोधन केंद्र, (सोयाबीन), अमरावती)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.