Pune News : सरकारने इंदापूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी निरगुडे (ता. इंदापूर) येथील शेतकरी भगवान बापू खारतोडे यांनी दोन दिवसांनंतर प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन उपोषण मागे घेतले.
इंदापूर तहसीलचे निवासी नायब तहसीलदार अजय पाटील यांच्या हस्ते लिंबूपाणी घेऊन उपोषण सोडले. या वेळी प्रशासनाच्या वतीने खारतोडे यांच्या मागण्या शासन स्तरावर पोहोचवण्याचे आश्वासनही देण्यात आले.
यंदाच्या कमी पावसामुळे इंदापूरसह तालुक्यात विविध ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे. निरगुडे परिसरातील बंधारे व तलाव कोरडे असल्याने जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याने हे तलाव व बंधारे येणाऱ्या आवर्तनातून भरण्याची विनंती जलसंपदा विभागाला करण्याचे प्रशासनाच्या वतीने मान्य करण्यात आले. त्याचबरोबर खारतोडे यांनी ज्या मागण्या केल्या आहेत त्या सर्व मागण्या लेखी स्वरूपात शासन स्तरावर पोहोचवण्याचे आश्वासनही पाटील यांच्या वतीने देण्यात आले.
शेतकरी खरतोडे यांनी १६ नोव्हेंबर रोजी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यावेळी प्रशासनाने त्यांना उपोषणापासून परावृत्त केले होते. मात्र आठ दिवसांत मागण्यांना मान्य झाल्यास पुन्हा २३ नोव्हेंबरपासून उपोषणाचा इशारा दिला होता, त्यानुसार त्यांनी २३ नोव्हेंबरपासून उपोषणाला सुरुवात केली होती, मात्र प्रशासन व ग्रामस्थांच्या मदतीने २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी उपोषण मागे घेण्यात आले.
महिनाभरात केलेल्या मागणी मान्य न झाल्यास पुन्हा उपोषण करण्याचा इशाराही खारतोडे यांनी दिला आहे. या वेळी मंडल कृषी अधिकारी संतोष सरडे, मंडल अधिकारी दीपक कोकरे, गाव कामगार तलाठी सतीश गायकवाड, श्रीमंत दराडे उपसरपंच हनुमंत काजळे, माजी सरपंच दादासाहेब भोसले, अमर भोसले, रामदास काजळे, युवराज भोसले, देवेंद्र राऊत इत्यादी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या मागण्या
- चारा छावणी व चारा डेपो सुरू करावेत.
- पिक विमा तत्काळ मिळावा.
- रेशन धान्याचे वाटप सुरू करावे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.