
Akola News : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापनादिनाचे औचित्य साधून आयोजित शिवार फेरीला शुक्रवारी (ता. २९) येथे सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी कृषी विद्यापीठाचे प्रक्षेत्र शेतकऱ्यांच्या उच्चांकी गर्दीने फुलून गेले होते. पश्चिम विदर्भातील
अकोला, वाशीम, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यांतून हजारोंच्या संख्येने शेतकरी, कृषी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
सन १९८२ पासून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शिवार फेरी हा विस्तार कार्यक्रम विद्यापीठ स्थापनादिनानिमित्त आयोजित केला जातो. विद्यापीठ निर्मित संशोधन शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पाहता यावे, यासाठी हे नियोजन केले जाते.
या वर्षीच्या शिवार फेरीचे खास वैशिष्ट्ये म्हणजे २० एकर क्षेत्रावर एकाच ठिकाणी थेट पीक प्रात्यक्षिके प्रत्येकी एक गुंठा क्षेत्रावर तयार करण्यात आलेली आहेत.
सोबतच विद्यापीठाच्या विविध संशोधन विभागांच्या ११०० हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक क्षेत्र म्हणून पाहता येत आहे. तसेच १५२९ हे क्षेत्रावर खरीप हंगामातील विविध पिकांचे पैदासकार बियाणे बीजोत्पादन कार्यक्रमही पाहावयास मिळत आहे.
शुक्रवारी सकाळी ९ वाजता विद्यापीठाच्या शेतकरी सदन परिसरात शेतकऱ्यांची नावनोंदणी करण्यात आली. येथे डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला अभिवादन करीत शेतकऱ्यांच्या वाहनाला हिरवा झेंडा दाखवून शिवारफेरीला औपचारिक सुरुवात झाली. या वेळी कुलगुरू डॉ. शरद गडाख उपस्थित होते.
एकाच जागेवर विविध खरीप पीक वाण, तंत्र, शिफारशींचे सुमारे २२५ थेट प्रात्यक्षिके पाहायला मिळत आहेत. पारंपरिक पिकांच्या तुलनेत शेतकऱ्यांचा कल नवनवीन पिकांकडे अधिक दिसून आला. या ठिकाणी तेलबिया विभागात २६ वाणांची लागवड केलेली आहे. या ठिकाणी सूर्यफुलाचे तीन संकरित व एका सुधारित वाणाची लागवड केली आहे.
पीडीकेव्ही सूरज हा नवीन वाण लावलेला आहे. भुईमुगाच्या एकूण ७ वाणांची लागवड असून, त्यात प्रामुख्याने TAG 73 हा वाण आहे. शिवाय सोयाबीनच्या १० वाणांची लागवड इथे पाहावयास मिळत आहे.
सोयाबीन पीक बीबीएफ पद्धतीने पेरणी केल्यास अति पाऊस झाला तरी सरीमधून पाणी निघून जाते व पावसाचा ताण पडल्यास त्याच सरीमधून पिकाला पाणी देता येते.
ट्रॅक्टरने आंतर मशागत, तण व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन करण्यासही सोयीचे होते. याचे प्रात्यक्षिक बाभूळगाव ब्लॉकवर करण्यात आलेले आहे. चारही जिल्ह्यांतून हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
कापूस प्रक्षेत्रावर काय पाहाल?
- विद्यापीठ निर्मित नवीन विकसित बीटी वाण
- कापूस संरचना व्यवस्थापनाविषयी प्रयोग व प्रात्यक्षिक प्लॉट
- अति घनता लागवड तंत्रज्ञान प्रात्यक्षिक प्रक्षेत्र
- लागवड तंत्रज्ञान, कीड व रोग नियंत्रण व शेतकऱ्यांच्या गरजेवर आधारित लागवड तंत्रज्ञान शिफारशीविषयी प्रात्याक्षिके
शिवार फेरीतील आजचे जिल्हे
शिवारफेरीच्या दुसऱ्या दिवशी आज, शनिवारी (ता. ३०) वर्धा, यवतमाळ, गडचिरोली आणि नागपूर या चार जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा सहभाग राहणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.