
Nagpur News: शेतकऱ्यांकडून वाढती मागणी लक्षात घेता सरकारकडून एचटीबीटी (हर्बीसाइड टॉलरंट बीटी) तंत्रज्ञानाला परवानगी दिली तरी बाजारात अनधिकृत एफ-२ दर्जाचेच बियाणे त्याआड विकले जाईल, अशी भीती शेती प्रश्नाचे अभ्यासक विजय जावंधिया यांनी व्यक्त केली आहे.
जावंधिया यांनी शासनाला उद्देशून लिहिलेल्या पत्रानुसार, दरवर्षी खरीप हंगामाच्या तोंडावर एचटीबीटी बियाणे वापराबाबत वातावरण निर्मिती केली जाते. त्याविषयीच्या चर्चाही सर्वदूर रंगतात. या वर्षी देखील अशा अनधिकृत बियाण्यांविषयी प्रसार केला जात त्याखालील लागवड क्षेत्रात वाढीचे प्रयत्न होत आहेत.
राज्यात सुमारे दीड ते दोन कोटी बियाणे पाकिटांची गरज राहते. विविध कंपन्या संकरित बियाणे वाणाचे उत्पादन करतात. परंतु अनधिकृत बियाण्यांचा शिरकाव बाजारात मोठ्या प्रमाणावर झाल्याने अधिकृत बियाणे विक्रेत्यांचा व्यवसाय संकटात सापडला आहे. सुमारे एक कोटी बियाणे पाकिट ही अनधिकृत बियाण्याची असल्याचे सांगितले जाते.
त्यावरूनच या व्यवसायाचा विस्तार लक्षात आल्याशिवाय राहत नाही. एफ-१ संकरित बियाणे तयार करताना एफ-१ आणि एफ-२ याचे संकर केले जाते. त्या माध्यमातून एफ-१ बियाणे मिळते. त्यापासून उत्पादित कापसातील सरकी वेगळी काढून त्याचा बियाणे म्हणून वापर केल्यास हे बियाणे एफ-२ म्हटले जाते. अशाप्रकारचे बियाणे स्वस्त राहते. सरासरी ४० रुपये किलो असा दर एफ-२ बियाण्यांचा आहे.
बाजारात मात्र ही सरकी थेट एचटीबीटी बियाणे म्हणून थोडी प्रतवारी आणि प्रक्रिया व पॅकिंग करून थेट २००० रुपयांना विकल्या जात आहे. हा गोरखधंद्यावर आणि त्या माध्यमातून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या फसवणुकीवर नियंत्रण मिळवायचे असेल तर सरकारने सरळ वाणाचे बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी विजय जावंधिया यांनी केली आहे.