Fertilizer Shortage : डीएपी टंचाईवर अशी करा मात

DAP Fertilizer : तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार पर्यायी खतांचा शेतकऱ्यांनी वापर केल्यास टंचाईवर सहज मात करता येऊ शकते.
Fertilizer Shortage
Fertilizer ShortageAgrowon
Published on
Updated on

DAP Shortage : खरेतर गुणवत्तापूर्ण निविष्ठांचा किफायतशीर दरात मागणीनुसार पुरवठा, तंत्रज्ञान स्वातंत्र्य आणि उत्पादित शेतीमालास रास्त भाव या तीन प्रमुख मागण्या देशभरातील शेतकऱ्यांच्या आहेत.

मागील अनेक दशकांपासून आमच्या या मागण्यांची पूर्तता करा, त्यानंतर आम्हाला सवलती, अनुदान, कर्जमाफीच्या कुबड्यांची गरज पडणार नाही, असा दावा शेतकरी करीत आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या या प्रमुख मागण्यांकडे दुर्लक्ष करीत भलतीच आश्‍वासने त्यांना याच नाही तर यापूर्वीच्या जवळपास सर्वच निवडणुकांत देण्यात आली. दुर्दैवी बाब म्हणजे दिलेल्या आश्‍वासनांची देखील राज्यकर्त्यांकडून पूर्तता होत नसल्याने ती चुनावी जुमलेच ठरतात. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार चरम सीमेवर आहे.

रब्बी हंगामाच्या तोंडावर निवडणुकीची धामधूम चालू होणार असल्याने त्याचा हंगामावर कोणताही परिणाम होणार नाही, याबाबत ‘ॲग्रोवन’ने यापूर्वीच केंद्र-राज्य शासन-प्रशासनाला सजग केले होते. परंतु त्याकडेही सपशेल दुर्लक्ष झाल्याने ऐन रब्बी पेरणीच्या काळात डीएपी खताची टंचाई राज्यात जाणवत आहे.

ही टंचाई दूर करण्यासाठी शासन-प्रशासन पातळीवर तातडीने कोणतीही पावले उचलली जात नाहीत, उलट खतांची सरसकट सर्वत्र टंचाई नाही, शेतकऱ्यांनी विशिष्ट ग्रेडचा आग्रह न धरता पर्यायी खतांचा वापर वाढवावा, असे सल्ले त्यांना कृषी विभागाकडून दिले जात आहेत.

Fertilizer Shortage
DAP Fertilizer : ‘डीएपी’साठी आग्रह नको; पर्यायी खताचा वापर करा

विशिष्ट खतांच्या टंचाईकाळात त्यांचा काळाबाजार वाढतो. लिंकिंगचे प्रकार करून शेतकऱ्यांना लुटले जाते. एखाद्या खताची सतत टंचाई जाणवत असल्यास बनावट, भेसळयुक्त खतांचे प्रमाण वाढते. यामुळे उत्पादन खर्चाच वाढ होऊन अपेक्षित परिणाम मिळत नाहीत, असा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसतो. डीएपीसह इतरही रासायनिक खतांचा मागणीनुसार पुरवठा होईल, यासाठी राज्य शासनाने केंद्राकडे पाठपुरावा करायला हवा. केंद्र सरकारने सुद्धा खतांचा मागणीनुसार तत्काळ पुरवठा होईल, याची काळजी घ्यायला हवी. राज्यात डीएपीची टंचाई भासत असली, तरी संयुक्त खते बऱ्यापैकी उपलब्ध आहेत.

१०ः२६ः२६, २०ः२०ः०ः१३, १२ः३२ः१६, १५ः१५ः१५ या संयुक्त खतांचा वापर डीएपीला पर्यायी ठरतो. या खतांमध्ये नत्र, स्फुरदाबरोबरच पिकांना पालाशदेखील मिळते. याशिवाय शेतकऱ्यांनी डीएपीला पर्याय म्हणून टीएसपी (ट्रिपल सुपर फॉस्फेट) खत वापरावे. यात ४६ टक्के स्फुरद आहे. त्यामुळे डीएपीच्या एका खताच्या गोणीऐवजी युरियाची अर्धा गोणी व टीएसपीची एक गोणी वापरणे उपयुक्त ठरू शकते. डीएपीमध्ये १८ टक्के नत्र व ४६ टक्के स्फुरद असते. शेतकऱ्यांनी डीएपीच्या एका गोणीऐवजी युरियाची अर्धी गोणी व ‘एसएसपी’च्या तीन गोण्यांचा वापर करावा. एसएसपीमध्ये स्फुरद १६ टक्के असून, गंधक व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत.

खरीप हंगामात बहुतांश शेतकऱ्यांनी डीएपी, १२ः३२ः१६, १४ः३५ः१४, सिंगल सुपर फॉस्फेट या खतांचा वापर केलेला असतो. ही खते पिकांना १५ ते २५ टक्क्यांपर्यंत त्या हंगामात उपलब्ध झालेली असतात. उर्वरित खते अवशेष स्वरूपात जमिनीतच राहतात. ही अवशेष स्वरूपातील जमिनीतील खते पिकांना उपलब्ध करून देण्यासाठी रब्बी हंगामात जैविक खतांचा (पीएसबी- फॉस्फेट सोलुबलायझिंग बॅक्टेरिया) पावडर अथवा द्रव स्वरूपात पर्यायी वापर शेतकऱ्यांनी केला पाहिजेत. पीएसबीचा वापर केला तर जमिनीतील २५ टक्के फॉस्फरस पिकांना उपलब्ध होण्यासाठी याची मदत होते. रब्बी पिकांना पाण्यात विद्राव्य खतांचा वापर देखील आपल्याला करता येऊ शकतो.

मोनो अमोनियम फॉस्फेट, ०ः५२ः३४, १२ः६१ः०, १९ः१९ः१९ या विद्राव्य खतांचा वापर पिकांच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेत फवारणीच्या स्वरूपात केल्यास ही खतेही पिकांना अधिक उपयुक्त ठरू शकतात. नॅनो डीएपीचा देखील एक चांगला पर्याय आता शेतकऱ्यांना उपलब्ध आहे. अशा प्रकारे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार पर्यायी खतांचा शेतकऱ्यांनी वापर केल्यास टंचाईवर सहज मात करता येऊ शकते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com