हरवलेल्या वस्तूंच्या आठवणी कशा विसरणार?

गेल्या १२५ वर्षांमध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण भागातल्या दररोजच्या जगण्याच्या किती वस्तू आपण हरवल्या हे अभ्यासणेसुद्धा आपल्या सगळ्यांना भूतकाळात घेऊन जाणारे आहे. यामध्ये घरातल्या वस्तू, शेतातल्या वस्तू, आणि दैनंदिन वापरातील अनेक वस्तू आपण हरवल्या आहेत.
Agriculture
AgricultureAgrowon

गेल्या १२५ वर्षांमध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण (Rural Maharashtra) भागातल्या दररोजच्या जगण्याच्या किती वस्तू आपण हरवल्या हे अभ्यासणेसुद्धा आपल्या सगळ्यांना भूतकाळात घेऊन जाणारे आहे. यामध्ये घरातल्या वस्तू, शेतातल्या वस्तू, आणि दैनंदिन वापरातील अनेक वस्तू आपण हरवल्या आहेत. १९५०-५१ पर्यंत असलेली कातडी मोट आणि त्यानंतर आलेली पत्र्याची मोट आता दिसेनाशी झाली आहे. मोट गेली म्हणून नाडा गेला, सौंदड गेला, थारोळे गेले.

खळ्यासाठी शेतातली सोडलेली मोकळी जागा, काही लोकांनी धुम्मसने चोपून त्यावर सारवून तयार केलेले खळे किंवा मोठ्या बागायतदाराने तयार केलेले सिमेंटचे खळे बघता बघता दिसेनासे झाले. एकत्र कुटुंबाच्या वाटण्या होत गेल्या आणि प्रत्येक मुलाचे क्षेत्र कमी होऊन बांधाची रुंदी कमी होऊ लागली. बांधावरील झाडे तुटू लागली. बघता बघता झाडे दिसेनाशी झाली. वाडी- वस्तीवर असलेले सार्वजनिक उकिरडे, भावाभावांचे गोठे यांवर घरे बांधायला सुरुवात झाली. कित्येक वाड्या-वस्त्यांवर राहती जागा कमी पडू लागल्यामुळे आपापल्या शेतामध्ये मोठमोठी घरे बांधून शेतकरी राहू लागले.

Agriculture
Indian Media : वृत्तपत्रांचे बदलते जग

लाकडी खणांची घरे गेली आणि आधुनिक घरे बांधली जाऊ लागली आधुनिक घरांमध्ये दुधा दह्यांचे शिंक, चूल, फडताळ, रांजण, मडक्यांची उतरंड, पत्र्यांचे डबे, टोपलं, ताक घुसळायची रवी, रांजणी, रॉकेलचे दिवे, तेलाचे दिवे, मुसळ, उखळ, जाते आदी दिसेनासे झाले. जाते गेले तसे जात्यावरील ओव्या ऐकायला येणे बंद झाले. १९४० ते १९६० च्या दरम्यान जात्याची जागा कुककुक आवाज करणाऱ्या पीठ गिरण्यांनी घेतली. सार्वजनिक पीठ गिरण्यांऐवजी आता अलीकडे पुन्हा घरोघरी घरघंट्या येऊ लागल्या आहेत.

वैयक्तिक, सार्वजनिक आणि पुन्हा वैयक्तिक असा हा प्रवास झाला आहे. नव्या वर्षाला खत आणि औषधांबरोबर मिळणारे कॅलेंडर १९७० पर्यंत भिंतीवर टांगलेले दिसायचे. आधुनिक घरे बांधल्यावर एक सलग लाकडी पट्टीवर लावलेले देव देवतांचे फोटो, आजी आजोबा, चुलते आणि अकाली मृत्यू पावलेली तरुण मुले यांचे फोटो दर्शनी भागांवर दिसेनासे झाले आहेत. घरातील गॅसबत्ती गेली आणि लुकलुकणारे बल्ब घरात दिसू लागले. पहिल्यांदा ज्या वेळी वीज आली तेव्हा १९३०-५० च्या काळात केवळ बल्ब बसविण्यात आले. १९८० च्या दशकात बल्ब जाऊन ट्यूब आल्या आणि २००० नंतर एलईडी ट्यूब आल्या.

Agriculture
Agriculture Economy : शेतीमालाच्या किमती वाढूनही नफा मर्यादित

घरासमोरचा रांजण, रांजणावरचा तोंडल्याचा वेल, रांजणाचे लाकडी झाकण, घरात कधी तरी निघणाऱ्या किडुक मिडुकासाठी तयार केलेला लोखंडी वाकडा आकडा, उखळ, रवी, दगडी जातं, पाटा-वरवंटा, टपालाने आलेली पत्रे अडकून ठेवायची वाकडी तार, मडक्यांची उतरण, १९५०-८० या काळात महाराष्ट्रातून दिसेनाशी झाली. पंगतीने जेवायला बसल्यावर पितळीला लावायचे लाकडी वटकावने, पितळी तांब्या, पराती, वीज पडू नये म्हणून बाहेर टाकायचा लोखंडी बत्ता किंवा लोखंडी गज, कातडी कव्हर लावलेला रेडिओ, घासलेटाचा स्टोव्ह, दंत मंजन, स्टोव्हला लावायचा काकडा, पत्र्याची पिन अशा अनेक वस्तू आता हरवल्या आहे.

फॅशन बदलली म्हणून पूर्वीच्या ढगळ प्लेटच्या पँट, देव आनंद सारखा शर्ट, त्यानंतर आलेल्या बेलबॉटम पँट, महिलांचे झगे, वाहाणा आता दिसत नाहीत. फेट्यांची व टोप्यांची संख्या कमी झाली असून, समारंभात एकमेकाला द्यायचे टॉवेल-टोपी यांचा वापर कमी झाला आहे. चष्म्याच्या हजारो डिझाइन आल्या असून, प्रत्येक रंगाच्या ड्रेसवर वेगवेगळ्या रंगाच्या फ्रेम वापरण्याच्या सोयी आल्या आहेत. एका माणसाला एक चप्पल, एक बूट ही एकेकाळी असलेली ऐट आता संपुष्टात आलेली आहे. एका इंचाची होईपर्यंत वापरावयाची शिसपेन्सिल आता इतिहास जमा झाली आहे.

१९७०-८० पर्यंत संपलेली पेन्सिल दाखविल्याशिवाय दुसरी पेन्सिल वापरायला वडील देत नसत आणि आता घरामध्ये मुलामुलींकडे किमान आठ ते १० पेन्सिल, रबर सापडतील. खापराच्या पाटी नंतर आलेली पत्र्याची पाटी दोन्ही नामशेष झाले आहेत. टाक, दौत, बोरू, सांडलेली शाई पुसण्यासाठी डस्टर हरवले आहे. नंबर डायल करायचा तबकडीचा टेलिफोन, त्यानंतर आलेला साधा फोन, पेजर, छोटा मोबाईल दिसेनासा झाला आहे. कॅसेट प्लेअर, व्हिडिओ कॅसेट आणि ग्रामोफोनच्या तबकड्यादेखील आता दिसत नाहीत.

ग्रामीण घरातील हजारो पिढ्यांमध्ये न झालेले बदल गेल्या दोन दशकांमध्ये झाले आहेत. ७०-८० वयापर्यंत जगणाऱ्या ज्येष्ठ लोकांना हा बदल जरा जास्त जाणवतो. आधुनिक वस्तूंशी तोंड देताना त्यांची दमछाक होत आहे. गुंतागुंतीचे तंत्रज्ञान, तरुणांना सोपे वाटत असलेतरी वयोवृद्ध माणसांना वापर करताना नवीन प्रश्‍न निर्माण होत आहेत. एल.ई.डी. टी.व्ही. घरी आणला तरी तो टीव्ही सुरू करण्यासाठी आजी आता नातू शाळेतून कधी येतो याची वाट पाहत आहे. माणसे आउटडेटेड झाली की वस्तू आउटडेटेड झाल्या हेच कळेनासे झाले आहे. मानवी जीवनात बदल घडत असतो. परंतु प्रत्येक पिढीने हाताळलेल्या वस्तूंशी त्या त्या पिढीमध्ये जगताना स्मरण जोडलेले असते. वस्तू हरवल्या की त्यांच्याशी जोडलेले ऋणानुबंध नाहीसे होतात आणि त्या वस्तूच्या आठवणीनेच माणसे हळवी होतात. त्यामुळेच जगभरातील सैनिक युद्धभूमीवर आपल्या जवळच्या माणसाची एखादी वस्तू स्मृती म्हणून बाळगतात. या वस्तूंच्या आठवणी कशा विसरणार...

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com