Water Management : भूजल पुनर्भरण, शेततळी अन् सूक्ष्मसिंचनावर कसा द्यावा भर?

Groundwater Recharge : पाण्याशिवाय वनस्पती किंवा सजीवांच्या शरीरात कोणतीही क्रिया होऊ शकत नाही. म्हणूनच अन्नापेक्षा पाण्याला जास्त महत्त्व दिलेले आहे. अर्थात, पाण्याचा योग्य वापर केला तरच जीवन, अन्यथा विष! म्हणून योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी पाण्याचा वापर करणे गरजेचे आहे.
Water Management
Water ManagementAgrowon

डॉ. भास्कर गायकवाड

Water Irrigation : आधुनिक शेती पद्धतीमध्ये संकरित वाण, रासायनिक खते यांचा वापर वाढला आहे. त्यातच आधुनिक यंत्रामुळे जमिनीची अधिक आणि अयोग्य प्रकारे मशागत केली जात असल्यामुळे पाण्याची गरज वाढली आहे. गोड्या व प्रवाही पाण्याचे स्रोत एकदम कमी असल्यामुळे भूजलाचा उपसा आणि वापरही वाढलेला आहे.

या अतिरिक्त पाण्याच्या माध्यमातून दरवर्षी एकरी तीन ते चार टनांपर्यंत क्षार जमिनीमध्ये ओतले जात आहेत. विशेषत: ऊस उत्पादक पट्ट्यामध्ये जास्त जमिनी क्षारवट- चोपण झालेल्या आहेत. राज्यामध्ये उसाचे पीक ५ टक्के इतकेच असले, तरी उपलब्ध पाण्याच्या ६० टक्के पाणी या पिकासाठी वापरले जाते.

एका बाजूला भूजलाचा अतिरेकी उपसा आणि वापर होत असताना भूजल पुनर्भरणासाठी कोणतेही प्रयत्न तितक्या क्षमतेने होताना दिसत नाहीत. त्यातच या जमिनीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर कमी झाला आहे. यामुळे क्षारांचे प्रमाण वाढत चालले. जमिनी टणक झाल्या.

पाण्याचा निचरा कमी झाला. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी झाली. त्यामुळेही पाणी वाहून जाऊ लागले. सेंद्रिय कर्ब कमी झाल्यामुळे जमिनीला सच्छिद्र ठेवणाऱ्या गांडुळे व जिवाणूंच्या संख्येला बसून त्यांचे प्रमाण कमी झाले. जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी झाले.

शेतीचे क्षेत्र कमी झाले आहे. अशा वेळी शेतातील मोठ्या ताली/ बांध जास्त जागा अडकवतात म्हणून त्या मोडून लहान झाल्या. बांधावरच्या झाडांच्या सावलीत पिके वाढत नसल्याचे दिसताच ती काढून टाकण्याचे प्रमाण वाढले आहे.

Water Management
Department Of Irrigation : उजनीसह पाच धरणांची साठवण क्षमता वाढणार

अनेक ठिकाणी बांधावर एकही झाड नाही, अशी स्थिती तयार झाली आहे. पाणी शेतात अडवणारे हे घटकच शेतीतून हद्दपार झाल्यामुळे पाणी वाहून जात आहे. परिणामी, शेतात पाणी मुरत नाही. झाडे नसल्याचा परिणाम पावसावरही होतो. म्हणजेच एकीकडे भूजलाचा उपसा वाढला, तर दुसरीकडे पाणी जिरवण्यासाठीची सर्व यंत्रणा मोडकळीस आलेली आहे.

जमिनीतील पाणी हे फक्त पिकाला देण्यासाठी उपयोगी ठरते असे नाही, तर ते जमिनीचे तापमान नियंत्रित करण्यातही मोलाचे ठरते. साध्या भाषेमध्ये जमिनीतील पाण्याची तुलना गाडीच्या रेडिएटरमधील पाण्याबरोबरच केली तर वावगे होणार नाही.

गाडीच्या रेडिएटरमधील पाणी कमी झाले किंवा संपले तर तापमान वाढून सरळ गाडीच्या इंजिनावरच परिणाम होऊ शकतो, हे नवख्यात नवख्या चालकाही माहीत असते. मग जमिनीत पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे जमिनीच्या तापमानावर आणि पर्यावरणावर कसा परिणाम होतो, हे सर्वांना जाणून घेतले पाहिजे.

आपल्याला फक्त पाणी उपसायचे माहीत आहे. मात्र त्याचा भरणा कोण करणार? आपण जमिनीतून किती पाणी उपसतो आणि त्यापैकी किती पाण्याचे पुनर्भरण करतो, याची आकडेमोड आपण प्रत्येकाने दर वर्षाला किमान एकदा तरी केली पाहिजे. पाण्याचे पुनर्भरण करण्यासाठी अनेक पद्धती आहेत.

एक तर शेतातील पाणी शेतात, गावातील पाणी गावात या संकल्पनेचा पूर्णपणे अवलंब होण्याची गरज आहे. आपल्या शेतांची, जमिनीची रचनाच अशी करावी, की त्यात पडलेला पावसाचा प्रत्येक थेंब अडला पाहिजे, जमिनीमध्ये जिरला पाहिजे. त्यासाठी जमिनीत पाणी जास्त जिरण्यासाठी त्यात सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे.

जमिनीचे बांध आणि बांधावर झाडे ही आपली संस्कृती असून, ती जपली पाहिजे. ज्या भागातून पाणी वाहून जाते, तेथे शेततळी तयार केली पाहिजेत. शेततळ्यामध्ये पावसाचे जास्तीचे पाणी साठवावे. त्यातून सावकाश पाणी जमिनीत मुरत राहील. अनेक शेतकरी नेमके उलट करतात, शेततळे बांधून त्यात भूजलाचा उपसा करून भरणा करतात. यात कसला आलाय फायदा?

आपण शेततळ्याबरोबरच गावतळीही गावातील जास्तीचे पाणी साठवून ठेवू शकतात. पूर्वीच्या काळातही गावतळी- शेततळी बांधून शेतकरी उपलब्ध पाण्यानुसार पिकाचे नियोजन करायचे. त्यांची पाणी वाटप करण्यासाठी एक विशिष्ट यंत्रणा होती. आता तो विचार होत नाही म्हणून बोअर- विहिरींचा अतिरेक झाला आहे.

त्यातून भूजलाचीही पळवापळवी सुरू आहे. एकमेकांची जिरवण्याच्या नादामध्ये भूजलाची पातळी खोल अधिक खोल होत चालली आहे. त्यातून पूर्ण शेतीच नव्हे, तर पुढे गावही तहानलेले राहण्याची शक्यता वाढली आहे. शेतकरी गरीब होत चालला असून, विहीर- बोअर खोदणारे श्रीमंत होत चालले आहेत.

आपण सर्व गावकऱ्यांनी विचारपूर्वक यात बदल करावा लागणार आहे. पावसाचे पाणी अडवणारे बंधारे, ते पाणी मुरवणारे शेततळी या संकल्पनेवर भर द्यावा लागेल. सिंचनासाठी पाणी देतानाही पारंपरिक पद्धतीऐवजी ठिबक किंवा तुषारसारख्या सूक्ष्मसिंचन पद्धतींचा वापर वाढवावा लागणार आहे.

या बाबी सुरुवातीला थोड्या खर्चिक वाटल्या तरी पाणी देण्याचे कष्ट व एक माणूस वाचतो. फळबाग, ऊस शेती, भाजीपाला या पिकांसाठी ठिबक सिंचन तर हंगामी पिके किंवा काही भाजीपाल्यासाठी तुषार सिंचन पद्धतींचा वापर केलाच पाहिजे. यामुळे जमिनीमध्ये कमी पाणी दिले जाते. क्षारांचे प्रमाण मर्यादित राहील.

पिकांच्या गरजेनुसार योग्य प्रमाणातच पाणी व अन्नद्रव्ये दिल्यामुळे ती वाया जाणार नाहीत. जमिनीवर सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे. त्याला जोड ठिबक/ तुषार सिंचनाची दिल्यास आच्छादनाखाली सतत ओलावा राहून जिवाणू/ गांडुळे यांची संख्या वाढेल.

पुढे या आच्छादनाचे कुजून सेंद्रिय खत तयार होते. या खत तयार होण्याच्या प्रक्रियेत मुळांना आवडणारा ह्यूमस नावाचा पदार्थही जास्त प्रमाणात तयार होतो. त्याचा फायदा पिकांच्या वाढीसाठी होतो.

Water Management
Jain Irrigation : लिंबूवर्गीय संस्थेचा जैन इरिगेशनसोबत करार

आज महाराष्ट्रातील एकूण लागवडीखालील क्षेत्राच्या फक्त १७ ते १८ टक्के क्षेत्र ओलिताखाली आहे. परंतु या पद्धतीने पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होऊन बागायती क्षेत्रात २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ करता येईल. याद्वारे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगारही वाढविता येईल.

कारण कोरडवाहूच्या तुलनेमध्ये बागायती क्षेत्रातून अधिक माणसांना रोजगार मिळतो. भूजलाचे पुनर्भरण, सिंचनाच्या पाण्याचे व्यवस्थापन, जमिनीची प्रत टिकवणे, शाश्‍वत उत्पादन आणि उत्पादनाचा उच्च दर्जा हे एकमेकांमध्ये गुंतलेले प्रश्‍न आहेत. ते सोडविण्यासाठी जमिनीत पाण्याचे पुनर्भरण, शेततळी आणि सूक्ष्मसिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन यांच्यावर भर देण्याशिवाय पर्याय नाही.

(लेखक शेती-पाणी प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com