Climate Change : बदलते हवामान आंबा उत्पादकांच्या मुळावर

Mango Production : कोकणचा हापूस जगप्रसिद्ध झाला आहे. मागील काही वर्षांपासून हवामान बदलाने आंबा मोहर प्रक्रिया अनियमित झाली. रोग-किडींचा प्रादुर्भावाने उत्पादनात मोठी घट येत आहे. हापूस आंबा उत्पादकांचे बाजार समित्यांमध्ये देखील शोषण होते.
Mango Season
Mango SeasonAgrowon
Published on
Updated on

चंद्रकांत मोकल

Hapus Mango : कोकणचा हापूस जगप्रसिद्ध झाला आहे. मागील काही वर्षांपासून हवामान बदलाने आंबा मोहर प्रक्रिया अनियमित झाली. रोग-किडींचा प्रादुर्भावाने उत्पादनात मोठी घट येत आहे. हापूस आंबा उत्पादकांचे बाजार समित्यांमध्ये देखील शोषण होते.

कोकण भूमीला ७२० किलोमीटरचा भव्य समुद्रकिनारा लाभला आहे. कोकणातील खारी हवा आणि लाल माती अशा पोषक हवामानामुळे सुमधुर चवीच्या आंब्याच्या बागा येथे उभ्या राहिल्या. कोकणचा हापूस जगप्रसिद्ध झाला आहे. मात्र मागील ६-७ वर्षे जागतिक हवामान बदलामुळे (ग्लोबल वॉर्मिंग) अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, तापमान वृद्धी, गारपीट, थंडीचा असमतोलपणा व वादळासारखी संकटे येत आहेत. यामुळे आंब्यावर कीड-रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. मोहराने भरलेल्या आंब्याच्या बागा काळ्या पडत आहेत. मावा, तुडतुडे, फुलकिडे यांच्या आक्रमणामुळे साहजिकच आंब्याचे खासकरून हापूस आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटत आहे. आजची स्थिती पाहता उत्पादन ६० टक्के घटून ते अवघ्या ४० टक्क्यांवर आले आहे.

Mango Season
Climate Change : हवामान बदलामुळे आंबा, काजू बागायतदार चिंतेत

महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ या दृष्टीने राज्य शासन व कृषी विद्यापीठ स्तरावर या समस्यांचा पाठपुरावा करीत आहे. राज्य शासनाने आंबा उत्पादनात घटीची दखल घेऊन मागील वर्षी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली. डॉ. प्रकाश शिनगारे व अन्य सदस्य, तज्ज्ञ यांच्या प्रमुख उपस्थितीत १२ जानेवारी २०२४ रोजी नांदगाव, ता. मुरुड येथे कोकणातील आंबा, भाजीपाला व इतर सर्व प्रकारच्या फलोत्पादनातील शेतकऱ्यांच्या मोठ्या सहभागाने कृषी, फलोत्पादन, सिंचन, सेंद्रिय, फळपीक विमा परिषदेचे व प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन केले होते.

या व्यासपीठावरून शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यात आल्या आणि त्या शासनापर्यंत पोहोचविण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र शेतकऱ्यांना त्यांच्या समस्यांवर ठोस उपाय काही सापडला नाही. त्याचबरोबर रासायनिक कीडनाशकांना पर्याय म्हणून नैसर्गिक, सेंद्रिय व जैविक उत्पादने जास्तीत जास्त वापरायला हवीत. रासायनिक अवशेषमुक्त (रेसिड्यू फ्री) उत्पादन घेण्याकडे आंबा उत्पादकांनी अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. यासाठी कृषी मेळावे आणि कृषी फलोत्पादन परिषदांचे आयोजनही करण्यात येत आहे. त्यात राज्य व केंद्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांची उपस्थिती असते. शेतकऱ्याला अशा प्रकारचे मार्गदर्शन फायद्याचे असते.

यंदाचा हंगामदेखील निराशाजनक

कोकणातील हापूस आंबा उत्पादकांना यंदाचे वर्ष व येणारा हंगाम चांगला जाईल, अशी खात्री होती. हंगाम सुरू होताना नोव्हेंबर २०२४ ला थंडी कमी होती, नव्हतीच म्हणा ना! मात्र शेतकऱ्यांच्या सुदैवाने डिसेंबर २०२४ मध्ये थंडी बऱ्यापैकी सुरू झाली. आंब्याच्या बागा मोहरू लागल्या होत्या. कोकणातील ७० ते ८० टक्के बागांना मोठ्या प्रमाणात मोहर आला. जानेवारी २०२५ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत मोहर सुस्थितीत होता. कोकणातील शेतकरी मोहर संवर्धनाकडे चांगल्या प्रतीच्या कीडनाशकांची फवारणी करून लक्ष देत होते.

वातावरणातील बदलाच्या संकटावर या वर्षी काही अंशी मात करता येईल अशी त्यांना आशा होती. मात्र जानेवारी २०२५ च्या दुसऱ्या आठवड्यापासून चित्र प्रतिकूल बनले. थंडीचे प्रमाण बऱ्यापैकी राहिले असताना देखील कीड-रोगांच्या प्रादुर्भावामुळे कोकणातील आंबा बागा काळ्या पडू लागल्या. यातून काही बागा काळ्या न पडता चांगल्या राहिल्या मात्र आलेल्या मोहराचे संवर्धन न होता त्याचे आंब्यात परिवर्तन होऊ शकले नाही. फार कमी प्रमाणात वाटाण्यापेक्षा मोठे झालेले आंबे बागांना पाहावयास मिळतात. आणखी विचित्र परिस्थिती म्हणजे अनेक बागांना मोठ्या प्रमाणात पालवी आलेली दिसत आहे. त्यामुळे आपत्तीतून वाचलेल्या पहिल्या मोहराचे वाटाण्यापेक्षा मोठे झालेले आंबे टिकणे मुश्कील झाले आहे. दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारे पालवी आली होती. मात्र ती दुसऱ्या बहरानंतर मार्चमध्ये आली होती. त्यामुळे साहजिकच दुसऱ्या बहाराच्या मोहराला त्याचा फटका बसला होता.

या वर्षी मात्र पहिल्या बहाराच्या काही प्रमाणात वाचलेल्या आंब्यासाठी हा फार मोठा अडथळा ठरणार आहे. तसेच दुसऱ्या बहराची मोहर प्रक्रिया देखील थांबू शकते. यामुळे कृषी विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांपुढे निसर्गाच्या या असमतोलपणाचे फार मोठे आव्हान आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेने देखील या बाबींची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. अर्थात, पुढील एक दोन महिन्यांनंतरच खरे चित्र स्पष्ट होईल, की किती प्रमाणात या वेळी उत्पादन होईल? एकंदरीत हे वर्ष देखील कोकणातील आंबा उत्पादनांना निराशाजनक ठरेल, असे काहीसे चित्र आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर या जिल्ह्यांत आज दीड लाख हेक्टरहून अधिक प्रमाणात आंब्याची लागवड आहे. आंबा, काजू, चिकू फळांसाठी शंभर टक्के अनुदानाची योजना राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी सुरू केली होती, ती आजतागायत सुरू आहे त्यामुळे कोकणात आंबा, काजू, चिकू यांचे क्षेत्र वाढताना दिसत आहे.

बाजार समित्यांतही शोषण

कोकणातील आंब्याच्या ठोक विक्रीसाठी मुख्य बाजारपेठ म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती होय. कोकणातील हे उत्पादन कोल्हापूर, सांगली, पुणे व नवी मुंबई येथील बाजार समित्यांमध्ये विकले जाते. मात्र येथील दलाल, अडते व व्यापारी वर्गाकडून शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. अनेक वेळा ही मंडळी हापूस आंबा उत्पादकांना पावसाळ्यात, गौरीगणपतीच्या सणाचे औचित्य साधून आगाऊ पैसे देतात. ही पूर्वपरंपरागत पद्धत कोकणात कमी अधिक प्रमाणात आजही सुरू आहे. या व्यापारी दलालांच्या रेट्यामुळे त्यांना सुरुवातीला ज्या वेळी आंब्याला चांगला भाव असतो, त्या वेळी आंबे विक्रीसाठी पाठवावे लागतात. त्यामुळे दलाल व्यापारी वर्ग भाव पाहून शेतकऱ्यांचा आंबा खरेदी करतात.

बाजार समित्यांमध्ये होणाऱ्या व्यापारात आजही प्रचलित हत्ता पद्धतीचा अवलंब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे शोषण होते. शेतकरी वर्गाने आगाऊ पैसे घेण्याचे टाळावे व यातून आपली सुटका करावी, यासाठी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाकडून जनजागृती करण्यात येते. मात्र दलाल वर्गाचा प्रभाव हा यातील मोठा अडथळा आहे. आजही ६० ते ६५ टक्के आंबा बाजार समित्यांमध्ये विकला जातो. उर्वरित २५ टक्के आंबा किरकोळ बाजारात विकला जातो. १५ टक्के आंबा निर्यात होतो. भविष्यात हापूसची निर्यात वाढविण्यासाठी निर्यातक्षम उत्पादनावर भर द्यावा लागणार आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी कल्टारऐवजी शेणखत, लेंडीखत, कोंबडी खत तसेच मासळी खतांच्या वापरावर शेतकऱ्यांनी भर द्यावा, याचा चांगला परिणाम जाणवेल व बागेत पर्यावरणाचा खऱ्या अर्थाने समतोल राखता येईल.

- ९५९४८८४६६६

(लेखक महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष आहेत.) 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com