Solapur News : सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यासह हजेरी लावू लागल्याने जिल्ह्यात ऐन उन्हाळ्यात पावसाळ्याचा अनुभव येऊ लागला आहे. मंगळवारी रात्री ते बुधवारी सकाळपर्यंत जिल्ह्यातील आठ महसूल मंडलात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक ३०.५ मिलिमीटर पावसाची नोंद अर्जुननगर (ता. करमाळा) महसूल मंडलात झाली आहे. करजगी (ता. अक्कलकोट) मंडलात २५.८ तर जवळा (ता. सांगोला) मंडलात २९ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
सोलापूरच्या तापमानाचा पारा ४३ ते ४४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होता. वाढलेल्या तापमानाला अवकाळी पावसामुळे लगाम बसला आहे. सोलापुरात सध्या पावसाळी वातावरण तयार झाले आहे. मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावत असल्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी वीज कोसळण्याच्याही घटना घडत आहेत. बुधवारी सकाळपर्यंत जिल्ह्यातील आठ महसूल मंडलात २० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.
अर्जुननगर, जवळा, करजगी या शिवाय होटगी मंडलात २५.३, करमाळा मंडलात २७.३, मार्डी मंडलात २६, केम मंडलात २०, भोसे मंडलात २१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अवकाळी पावसादरम्यान वाऱ्याचा वेग असल्याने ग्रामीण भागात पत्रे उडणे, झाडे कोसळणे यासह इतर नुकसान झाले आहे.
नुकसानीची माहिती संकलित करण्याचे काम महसूल प्रशासनाच्यावतीने हाती घेण्यात आले आहे. अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर सोलापूरच्या वातावरणात गारवा पसरला आहे. सोलापूरच्या तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. बुधवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात ५.५ मिलिमीटर सरासरी पाऊस झाला आहे.
अवकाळीचा ३६६ एकरला तडाखा होताहेत रिकामे
सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये रविवारपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. रविवार, सोमवार व मंगळवार या तीन दिवसात जिल्ह्यातील ३६६ हेक्टरला फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे ४६५ शेतकरी बाधित झाले आहेत. दहा जनावरांचा मृत्यू तर ५२ घरांची अंशतः पडझड झाली आहे.
जिल्ह्यात १२ व १३ मे रोजी झालेला अवकाळी पावसात अक्कलकोट तालुक्यातील एका लहान जनावराचा मृत्यू झाला. बार्शी तालुक्यातील एक, अक्कलकोट तालुक्यातील तीन व मोहोळ तालुक्यातील एक अशा पाच जनावरांचा मृत्यू झाला. माढा तालुक्यातील १४ व मंगळवेढा तालुक्यातील तीन अशा १७ घरांची अंशतः पडझड झाली
करमाळा तालुक्यातील १८४ हेक्टरवरील पिकांना फटका बसला. यामध्ये २५१ शेतकरी बाधित झाले. मोहोळ तालुक्यातील ४०.२० हेक्टरला अवकाळीचा फटका बसला. यामध्ये ११३ शेतकरी बाधित झाले आहेत. सांगोल्यातील सतरा शेतकऱ्यांचे अकरा हेक्टरवरील, पंढरपुरातील सात शेतकऱ्यांचे २०.९ हेक्वटरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीन शेतकऱ्यांचे २.८७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. रविवारी व सोमवारी झालेल्या अवकाळीचा फटका ३९१ शेतकऱ्यांना बसला आहे. करमाळा तालुक्यात १४ मे रोजी अवकाळीने धुमाकूळ घातला. या तालुक्यातील १२५ हेक्टरवरील पिकांना फटका बसल्याने ७४ शेतकरी बाधित झाले आहेत. करमाळा तालुक्यातील ३५ घरांची पडझड झाली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.