

Pune News : ‘‘राज्यात २४ जिल्ह्यांमध्ये कमी पावसामुळे ‘मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती’ जाहीर करण्यात आली आहे. तेथील पीक नुकसानीच्या अंदाज अहवालांना विमा कंपन्यांनी आक्षेप घेतले आहेत. त्यावर विभागीय आयुक्तांकडे सुनावणी सुरू झाली आहे,’’ अशी माहिती कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी मंगळवारी (ता. १०) पत्रकारांना दिली.
चालू खरीप हंगामात पाऊस समान बरसला नाही. जूनच्या तिसऱ्या आठवड्यात पाऊस सुरू झाला. त्यातही जूनमध्ये राज्यात एकूण सरासरीच्या ४६ टक्के कमी पाऊस झाला. जुलैत मात्र सरासरीपेक्षा ४० टक्के पाऊस जादा पडला आहे.
ऑगस्टमध्ये पुन्हा पाऊस कमी बरसला. या महिन्यात तो सरासरी २८६ मिलिमीटर होण्याऐवजी केवळ ११० मिलिमीटर झाला. सप्टेंबरमध्ये मात्र पावसाची स्थिती चांगली होती. कारण या महिन्यात तो ३० टक्के जादा बरसला आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
पावसाची स्थिती असमान असतानाही राज्यात खरिपाचा पेरा लक्ष्यांकाइतका झालेला आहे. मात्र २१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड असलेल्या २४ जिल्ह्यांमध्ये राज्य शासनाने ‘मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती’ (मिड सीझन अॅडर्व्हसिटी) जाहीर केली आहे.
या भागांमध्ये कृषी विभागाचे अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी व शेतकरी यांनी संयुक्त पाहणी केली आहे. त्याचे अहवाल सादर करण्यात आले आहेत. काही ठिकाणी या अहवालांवर विमा कंपन्यांनी आक्षेप घेतले आहेत.
त्यावर विभागीय आयुक्तांकडे सुनावणी सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या रकमेपैकी २५ टक्के आगाऊ रक्कम (अग्रिम) देण्याची कार्यवाही केली जाईल, असेही आयुक्त म्हणाले.
यंदा विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना केवळ एक रुपया हप्ता रक्कम द्यावी लागली. त्याचा अतिरिक्त भार राज्य शासनाने उचलून ती रक्कम विमा कंपन्यांकडे जमा केली आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची अंतिम रक्कम मात्र पीक कापणी प्रयोगातील उंबरठा उत्पन्नाचे अहवाल आल्यानंतर मिळेल, असे आयुक्तांनी सांगितले.
‘रब्बीसाठी अनुकूल स्थिती’
‘‘राज्यात शेवटच्या टप्प्यात झालेल्या जादा पावसामुळे रब्बी हंगामासाठी अनुकूल स्थिती तयार झाली आहे. शेतकऱ्यांनी रब्बीची पिके घेताना त्या त्या पिकांचे लागवड अंतर तसेच मशागत तंत्र शास्त्रीय पद्धतीने अवलंबावे. त्यामुळे अपेक्षित उत्पादन येण्यासाठी मदत होईल. शेतकऱ्यांनी शक्य तेथे ‘रुंद सरी वरंबा’ पद्धतीचा वापर करावा,’’ असे आवाहन कृषी आयुक्तांनी केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.