Wild Vegetables : आरोग्यदायी रानभाज्या

Healthy Vegetables : पावसाळ्यात डोंगर कपारीच्या कुशीत असलेल्या परिसरात अनेक प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध होतात. या रानभाज्या निसर्गतः जंगलात, शेताच्या बांधावर, माळरानात उगवून येतात.
Wild Vegetables
Wild Vegetables Agrowon
Published on
Updated on

डॉ. दत्तात्रय सोनवणे, अर्चना महाजन

पावसाळ्यात डोंगर कपारीच्या कुशीत असलेल्या परिसरात अनेक प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध होतात. या रानभाज्या निसर्गतः जंगलात, शेताच्या बांधावर, माळरानात उगवून येतात. या रानभाज्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात.

त्यामुळे त्यांचा आहारात उपयोग करणे फायदेशीर ठरते. या रानभाज्यांपासून विविध पदार्थ बनविले जातात. रानभाज्या शिजवताना त्यांच्यातील पोषणमूल्ये टिकविण्यासाठी कमी शिजवाव्यात. भाजी बनविताना पुदिना, कैरी, लिंबू यांसारख्या घटकांचा वापर करावा.

उपयुक्त रानभाज्या आणि त्यांचे फायदे ः

तांदुळजा ः

ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. बहुतांश ठिकाणी या भाजीचा दैनंदिन आहारात वापर केला जातो. शरीरात जीवनसत्त्व ‘क’ची कमतरता असल्यास या भाजीचे सेवन करणे फायद्याचे ठरते. विशेषत: गोवर, कांजण्या, नेत्र विकारी, पित्त विकार आणि मूळव्याध या विकारांत पथ्यकर म्हणून वापरण जरूर करावा. त्वचा विकारामध्ये यामध्ये दाह, उष्णता कमी करावयास ही भाजी उपयुक्त ठरते. डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी देखील ही भाजी गुणकारी ठरते.

Wild Vegetables
Wild Vegetables : पुरंदर किल्ले परिसरात बहरल्या रानभाज्या

घोळ ः

सामान्यपणे घोळ भाजीला घोळूची भाजी, घोळ किंवा घोळीची भाजी अशा नावांनी ओळखले जाते. घोळूच्या भाजीत भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व अ आणि क असते. तसेच काही प्रमाणात बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वही आढळते. या भाजीमध्ये लोह, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि मँगेनीज ही उपयुक्त खनिजे देखील मुबलक असतात.

फायदे ः

- घोळची भाजी खाण्याचे अनेक फायदे आहेत. घोळ भाजी अन्नपचनास मदत करते. यामुळे यकृताचे कार्यही सुधारते.

- ओमेगा-३ फॅटी ॲसिड मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे या भाजीचा आहारात समावेश केल्यास हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत होते. तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

- वाईट कोलेस्टेरॉल कमी होऊन चांगले कोलेस्टेरॉल वाढण्यास मदत होते.

- जीवनसत्त्व ‘अ’ मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे डोळ्यांचे आणि त्वचेचे आरोग्य सुधारते. तसेच वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.

- लोहाचे प्रमाण जास्त असल्याने हिमोग्लोबीन कमी असणालेल्या व्यक्तींसाठी ही भाजी गुणकारी ठरते.

- मूळव्याधाची त्रास कमी करण्यास ही भाजी उपयुक्त आहे.

Wild Vegetables
Wild Vegetables : रानभाज्या हा निसर्गातील अनमोल मोठा ठेवा : डॉ. इंगळे

करटुली ः

या रानभाजीला कारटुली, कंटोली, रानकारली, कर्कोटकी, कर्टुली़ अशा स्थानिक नावांनी ओळखले जाते. करटोलीला जून ते ऑगस्ट महिन्यांत फुले व त्यानंतर फळे तयार होतात.

फायदे ः

- करटोली हे डोकेदुखीवरील उत्तम औषध आहे. डोकेदुखीमध्ये करटुलीच्या पानांचा रस, मिरी, रक्तचंदन आणि नारळाचा रस एकत्र करून चोळल्यास आराम मिळतो.

- करटोलीचे भाजलेले कंद मूळव्याधीमध्ये उपयुक्त ठरतात.

- करटुली पाने कृमिनाशक असून, त्रिदोष, ताप, बद्धकोष्ठता, दमा तसेच वात, मूत्रस्राव व मधुमेहामध्ये करटोलीची फळे उपयुक्त आहेत.

- अति लाळ सुटणे, मळमळ होणे, हृदयाचे त्रास यातही करटोली गुणकारी आहे.

- करटोलीच्या फळांची भाजी कारल्यासारखी असते. ही भाजी रुचकर असून, पोट साफ होण्यासाठी उपयुक्त आहे.

- मधुमेह असलेल्या रुग्णांनी या भाजीचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते.

- सर्दी, खोकला, ताप या पावसाळ्यातील विकारांवर करटोलीची भाजी गुणकारी ठरते.

चिवळी ः

रानघोळ, भुईचौली, खाटेचौनाळ, चिवळी, लहान घोळ व छोटी घोळ किंवा चिघळ अशा विविध नावांनी ही रानभाजी ओळखली जाते. चिवळ ही वनस्पती ओलसर, पाणथळ जागेत, शेतात व बागेत तण म्हणून वाढते.

फायदे ः

- मार लागल्यास दाह आणि सूज कमी करण्यासाठी ही वनस्पती वाटून त्यावर बांधल्यास आराम मिळतो.

- चिवळ ही मूळव्याधीवर गुणकारी आहे.

- ही भाजी शीतल आणि रक्तशुद्धी करणारी आहे.

- शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी तसेच लघवी साफ होण्यासाठी उपयुक्त आहे.

- हातापायांची व डोळ्यांची होणारी जळजळ चिवळच्या भाजीने कमी होते.

पाथरी ः

- ही रोपवर्गीय वनस्पती सर्वत्र आढळते. ही वनस्पती सर्व पठारी प्रदेशात सावलीत, रेताड जमिनीत उगवते.

- पाथरीचा अंगरस ज्येष्ठ मधाबरोबर दिल्यास बाळंतीण स्त्रियांमध्ये दूध वाढण्यास मदत होते.

फायदे ः

- हे चाटण सुक्या खोकल्यातही उपयोगी पडते.

- जनावरांना चारा म्हणूनही पाथरी वापरल्यास दूध उत्पादनात वाढ मिळते.

- पाथरीच्या पानांची भाजीही औषधी गुणधर्माची असते. या भाजीचा उपयोग जुन्या त्वचा रोगामध्ये होतो.

- पचन सुधारते.

- कावीळ व यकृत विकारात ही भाजी फायदेशीर ठरते.

अर्चना महाजन, ७२४९४१०६८१

- डॉ. दत्तात्रय सोनवणे, ९४२१५८३४९५

(कृषिविद्या विभाग, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय, हाळगाव, जि. नगर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com