Soybean Harvesting : सोयाबीन काढणीसाठी मजुरांची कमतरता आणि वाढलेल्या मजुरी दराची चर्चा निघाली की,काहीजण लगेच हार्वेस्टिंग मशीनचा पर्याय सुचवतात. त्यांना वाटत असावं की, एवढी स्वस्तात,सहज उपलब्ध होणारी बाब शेतकऱ्यांना कशी कळत नाही?
ही एक साधी बाब लक्षात घेण्यासारखी आहे की, हार्वेस्टर बाजारात येऊन आठ-दहा वर्षे होऊन गेली तरी आमच्या भागात पाच टक्के शेतकरीसुद्धा याचा वापर करीत नाहीत. ही बाब आपोआप सिद्ध करते की,सोयाबीनसाठी हार्वेस्टर वापरणं फारसं सोयीचं नाही.
एक म्हणजे, हार्वेस्टरने सोयाबीन काढणी करायची असेल तर, पिकाची उंची किमान तीन-चार फुट पाहिजे. फुट-दोन फुटाच्या पिकाची त्याने कापणी करता येत नाही. हार्वेस्टर साधारण एक फुटावरून पिक कापते.
त्याखालचा भाग व शेंगाही तशाच राहातात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा यासाठी जमीन समतल असावी लागते. तिसरा मुद्दा सोयाबीनच्या जमिनीत दगडधोंडे असायला नकोत. ते असतील तर हार्वेस्टरच्या ब्लेड तुटतात.
चौथा मुद्दा सोयाबीन थोडसं ओलसर असावं लागतं. कडक वाळलं असेल तर, पाचटासोबत बी ही जास्त प्रमाणात मातीत मिसळतं, बियाचा चुरा होतो. हार्वेस्टरचा वापर करण्यासाठी पुरेसं क्षेत्र हवं. दोन-चार एकरसाठी मशीन येत नाही.
पाचवा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे,हार्वेस्टरने सोयाबीनची रास करताना गुळी थेट मातीत मिसळते. ही गुळी पशुखाद्य म्हणून शेतकरी वापरतात. ज्वारीची पेर कमी झाल्यामुळे दुसरा चारा नाही. या गुळीचा मातीत मिसळून खत होत असला तरी, शेतकऱ्यांना ती चारा म्हणूनच हवी आहे. मजूर मिळत नाहीत तर, हार्वेस्टर वापरा असा सल्ला देणाऱ्यांना या अडचणी अजिबात माहिती नसतात. त्यांना वाटतं, मी शेतकऱ्यांच्या हिताचा सल्ला देतोय. त्याबद्दल ते स्वत:चं मोठं कौतूक करून घेतात. मी अशा सल्लागारांच्या सल्ल्यातील फोलपणा दाखवून देतो.
हे समजून घेण्याची गरज आहे की, ज्यांना सोयीचं आहे,ते शेतकरी हार्वेस्टरचा वापर करतातच. जे तंत्रज्ञान, यंत्र सोयीची आहेत,ती शेतकरी वापरतातच. मात्र याचा वापर करण्याचं प्रमाण अल्प आहे, याचं कारण हे तंत्रज्ञान सोयाबीनसाठी सोयीचं नाही. माझे शेतकरी मित्र डॉ. श्रीकांत गोरे यांनी गतवर्षी मजुरांची अडचण म्हणून सोयाबीनची हार्वेस्टरने रास केली होती.
यावर्षी ते मजुरांकडूनच काढत आहेत. महिनाभरापूर्वी मी त्यांना सल्ला विचारला होता की, हार्वेस्टरने सोयाबीनची रास करू का? त्यांनी स्पष्टपणे सांगीतलं, नका. एकतर तुमच्या जमिनीत दगड आहेत. दुसरं जवळपास वीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान होतं. मी गतवर्षी तो अनुभव घेतलाय. त्यावरून हा सल्ला देतोय.
मी हार्वेस्टर वापराबाबत ज्या अडचणी मांडल्या आहेत, त्या वस्तुनिष्ठ आहेत. त्यामुळे सोयाबीन काढणीसाठी हार्वेस्टर हा सर्वांसाठी पर्याय होऊ शकत नाही, हे स्पष्ट आहे.दुसरा मुद्दा नुकसानीचा आहे. हार्वेस्टरमुळे होणाऱ्या १५-२०टक्के नुकसानीकडं मी का डोळेझाक करू? उलट मी हे नुकसान टाळून मजुरांना वाढीव मजुरी देणे पसंद करेन.
सोयाबीन काढणीच्या काळात मजुरांची कमतरता जाणवतेय, याचे कारण सोयाबीन क्षेत्रात झालेली प्रचंड वाढ हे ही आहे. सोयाबीन न पेरलेला कोरडवाहू शेतकरी अपवादानेही सापडणार नाही. कारण शेतकऱ्यांपुढे दुसरा पर्यायच नाही. अवर्षण असो की अतिवृष्टी. सोयाबीन हे एकमेव असे पीक आहे की, शंभर टक्के पीक गेलं असं कधीच होत नाही. वाईटात वाईट परिस्थितीतही २५,३०,४० टक्के सोयाबीन हाती लागते. गुळी पशुखाद्य म्हणून वापरात येते.
सरकारने ठरवून भाव पाडले नसते, सोयापेंड, तेलाची आयात केली नसती तर, केवळ सोयाबीनच्या माध्यमातूनही कोरडवाहू शेतकऱ्यांचं भलं झालं असतं. त्यामुळे शेतकऱ्यांचा शत्रू निसर्ग नाही तर, सरकार आहे. दहा वर्षांपूर्वी सोयाबीनचे जे दर होते, तेच आजही आहेत.
ही बाब सरकार शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक कसे भीकेला लावत आहे, याचा ढळढळीत पुरावा आहे. दुर्दैवाने जे लोक या मुळ दुखण्यावर इलाज न करता, सरकारविरोधात रस्त्यावर न उतरता, मजुरांच्या वाढीव मजुरीचा मुद्दा समोर आणतात, तेव्हा त्यांची कीव करण्यापलीकडं मी काही करू शकत नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.