Ratnagiri News : हवामान विभागाकडून पुढील आठवड्यात पावसाची शक्यता व्यक्त केल्यामुळे भातकापणीवर पावसाचे सावट निर्माण झाले आहे. हळवी (कमी कालावधीत होणारी) भातशेती कापणीयोग्य झाली आहे. जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पावसाचा पॅटर्न बदलल्यामुळे उशिरा तयार होणाऱ्या भात बियाण्यांची लागवड करत आहेत. तरी यंदा जिल्ह्यात सुमारे १० हजार हेक्टरवर हळवी बियाण्यांची लागवड करण्यात आली असून त्यातील सुमारे ३० टक्के क्षेत्र कापणीयोग्य आहे.
पीकपाहणी ऑनलाइन अहवालानुसार यंदा जिल्ह्यात ४० हजार हेक्टर क्षेत्रावर भातलावण्या करण्यात आल्या आहेत. त्यातील सुमारे पंचवीस टक्के क्षेत्रावर हळवी बियाण्यांची लागवड होते. हळवी बियाणे ९० ते १०० दिवसात तयार होतात. यंदा जूनमध्ये मोसमी पाऊस वेळेवर दाखल झाला असला तरिही पुढे काही काळ पावसाने विश्रांती घेतली.
त्यामुळे पेरणी पाच ते सहा दिवस उशिराने झाल्या. त्याचा परिणाम भात लावण्यांवर झाला. त्यामुळे हळवी बियाण्यांची तशी थोडी उशिरानेच लागवड झाली आहे; परंतु जुलै, ऑगस्ट या कालावधीत समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकरी समाधानी आहे. सप्टेंबरमध्ये पावसाचा जोर ओसरला असला तरी अधूनमधून सरी पडत आहेत. सायंकाळी अधिक पाऊस पडत असल्यामुळे भातशेतीला त्रासदायक ठरू शकतो.
सध्या कोकणात हळवी बियाण्यांची शेती कापणीयोग्य झाली आहे. शेतकरी पावसाच्या विश्रांतीकडे लक्ष ठेवून आहेत. गेले दोन दिवस जिल्ह्यात कडकडीत ऊन पडले आहे. पावसाने अशीच विश्रांती घेतली तर कापणीला सुरुवात होईल. यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे उत्पादन अधिक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापणीनंतर पावसात भात भिजले तर नुकसानीची शक्यता आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.