
Amaravati News : जलयुक्त शिवार अभियान टप्पा दोनमध्ये अमरावती जिल्ह्यात १०० कोटी रुपयांची कामे करण्यात येणार होती. त्यासाठी १२१७ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. मात्र निधीची बोंब असल्याने कामांमध्ये कपात करून १११ कामांची निविदाप्रक्रिया राबविण्यात आली. आर्थिक स्थिती बघता यातील ६६४ कामांचाच कार्यारंभ आदेश देण्याची वेळ आली व त्यातील २१.६६ कोटींची ५७३ कामे पूर्ण करता आली आहेत.
शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या (विशेष निधी) कामांची चाके खरीप हंगाम सुरू झाल्याने मातीत रुतली आहेत. निविदाप्रक्रिया करण्यात आलेल्या ११६१ कामांपैकी ५७३ कामे पूर्ण झाली असून २१.६६ कोटींचा खर्च झाला आहे. या टप्प्यात १०० कोटींची कामे करायची होती, प्रत्यक्षात मात्र २१.६६ कोटींचीच कामे होऊ शकली आहेत. निधी नसल्याने कामे करता आली नसल्याचे कारण समोर आले आहे.
जलयुक्त शिवार अभियान दोन अंतर्गत नऊ विभागांमार्फत १७४५ कामांचा आराखडा मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी १२८१ कामांना तांत्रिक मान्यता देण्यात आली. या कामांसाठी १०६.७१ कोटी रुपये खर्च अपेक्षित करण्यात आला होता. यातील १२१७ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली व १००.२१ कोटी रुपयांची तरतूद अपेक्षित होती.
प्रत्यक्षात ११६१ कामांच्या निविदाप्रक्रिया झाल्यात व ६६४ ला कार्यारंभ आदेश देण्यात आले. त्यातील ५७३ कामे पूर्ण झाल्याची माहिती मृदृ व जलसंधारण विभागाने दिली. यावर २१.६६ कोटी रुपये खर्च करण्यात आला.
टप्पा दोनमध्ये नवीन कामांऐवजी जुन्याच (टप्पा एक) मधील कामांच्या दुरुस्तीचा समावेश होता. नाला खोलीकरण झालेल्या नाल्यांतील गाळ काढण्यासह तलावातील गाळ काढणे, रिचार्ज शाप्ट बसविणे, नाल्यांचे सरळीकरण अशा कामांचा अधिक समावेश होता. आगामी पावसाचे पाणी थांबवून त्याचा शेतीच्या सिंचनासाठी उपयोग करण्याचा उद्देश करण्याचा हेतू या अभियानाचा आहे. तथापि ज्या संख्येने कामांचा आराखडा तयार करण्यात आला त्या तुलनेत झालेल्या कामांची संख्या निम्म्याहूनही कमी आहे, हे विशेष.
टप्पा दोनमध्ये सर्वाधिक ६७७ कामांची निविदा भूजल सर्वेक्षण विभागाची होती. त्यापैकी तालुकानिहाय ३५ गावांमध्ये ४४४ कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली. त्यातील २३३ कामे मार्गी लागली व २०१ कामे पूर्ण झालीत. या यंत्रणेला कामांसाठी निविदाप्रक्रियेत कंत्राटदार मिळू शकलेले नाहीत. तब्बल चार वेळा प्रक्रिया केल्यानंतरही कंत्राटदारांनी प्रतिसाद दिलेला नाही.
यंत्रणानिहाय कामे व खर्च (कोटी रुपये)
मृद् व जलसंधारण ः १११ (६.४९), लघुसिंचन जिल्हा परिषद ः १०० (६.५४), कृषी ः ५९ (०.९८), भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा ः २०१ (१.२०), वनविभाग ः ४ (०.५४), अमरावती पाटबंधारे ः १८ (१.४४), लघू पाटबंधारे अचलपूर ः ४० (१.४३), ऊर्ध्व वर्धा पाटबंधारे ः ३९ (३.८१), सामाजिक वनीकरण ः १ (०.६)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.