Pomegranate Farming : दुष्काळानेच लढायला शिकवलं

Rainfed Farming : दुष्काळ पचवण्याची ताकद दुष्काळानेच दिली. त्यानंच लढायला शिकवलं. सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील गुलाबराव पाटील यांनी मोठ्या संघर्षातून डाळिंब शेतीचा विस्तार केला. अनेक संकटे, नुकसान पचवून यशस्वी उत्पादन घेतलं.
Pomegranate Farming
Pomegranate FarmingAgrowon
Published on
Updated on

अभिजित डाके

Pomegranate Production : दुष्काळ पचवण्याची ताकद दुष्काळानेच दिली. त्यानंच लढायला शिकवलं. सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील गुलाबराव पाटील यांनी मोठ्या संघर्षातून डाळिंब शेतीचा विस्तार केला. अनेक संकटे, नुकसान पचवून यशस्वी उत्पादन घेतलं. आज मुलगा शरद निर्यातीचे उद्दिष्ट ठेवून नव्या उमेदीनं या शेतीचे धडे वडिलांच्या मार्गदर्शनाखाली गिरवतो आहे.

सांगली शहरापासून सुमारे शंभर किलोमीटरवर आटपाडी हा अवर्षणग्रस्त तालुका आहे. सिद्धहस्त लेखक व्यकंटेश माडगूळकर यांच्या ‘बनगरवाडी’ या प्रसिद्ध कादंबरीत हा परिसर आपण अनुभवला आहे. इथला दुष्काळ जगण्याची कसोटी पाहतो. पण शेतकऱ्याने कष्टाने फुलवलेला छोटासा मळाही भारी वाटतो. तालुक्यात टेंभू योजनेतून कृष्णा नदीचं पाणी फिरू लागलं आहे. त्यामुळे इथलं चित्र बदलत आहे. अर्थात, टेंभूचे पाणी कधी वेळेत मिळते. कधी वेळेत मिळत नाही. अशा परिस्थितीतही इथला शेतकरी खचून न जाता दर्जेदार लाल चुटूक डाळिंब पिकवताना दिसून येतो. याच आटपाडीपासून थोड्या अंतरावर पाटील मळा आहे. येथील शरद गुलाबराव पाटील हा बी. ई. मेकॅनिकल झालेला युवा शेतकरी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली डाळिंबाची प्रगतिशील शेती करतो आहे.

Pomegranate Farming
Pomegranate Farming : डॉलर अर्नरच्या दबदब्यासाठी...

दुष्काळानं लढायला शिकवलं

आपली शेती विकसित करण्यासाठी गुलाबरावांनी एकेकाळी खूप संघर्ष केला आहे. वडिलोपार्जित पाच-सहा एकर शेती होती. पाणी नसल्याने थोडीच शेती बागायती होती. सन १९९० पासून १० ते १५ एकरांत ते कापूस घ्यायचे. त्या पिकावरच कुटुंबाची आर्थिक प्रगती सुरु होती. सुमारे १५ वर्षांनंतर कापूस पिकवणं बंद केलं. दुष्काळ पाचवीलाच पुजलेला. पण गुलाबरावांच्या चेहऱ्यावर कधीही नकारात्मकता दिसून येत नव्हती. याच दुष्काळानं लढायला शिकवलं. शेतीत प्रत्येक टप्प्यात काय चुकले त्याचे आत्मचिंतन ते करायचे. त्यातून नवी उमेद जागृत व्हायची.

Pomegranate Farming
Pomegranate Farming : गुणवत्तापूर्ण, निर्यातक्षम डाळिंब उत्पादनात सातत्य

डाळिंब शेतीचा ध्यास

तालुक्यात त्यावेळी डाळिंब शेती विस्तारत होती. शेतकरी एकमेकांच्या बांधावर जाऊन पिकाचे शास्त्र जाणून घेत होते. गुलाबरावांनीही १९९३-९४ मध्ये या पिकाचे धाडस केले. गणेश वाणाच्या
पाचशे झाडांची लागवड केली. लागवड पद्धती, बहर, छाटणी अशा अनेक बाबी ते आत्मसात करू लागले. गुणवत्तापूर्ण उत्पादन घेऊ लागले. मुंबईला डाळिंबे जाऊ लागली. सन १९९६ च्या दरम्यान साडेचार लाख रुपये डाळिंबातून हाती येणार होते. पण व्यापाऱ्याकडून फसवणूक झाली. मोठा आर्थिक तोटा झाला. काय करावे सुचेना. पण हार न मानत पुन्हा नवी उभारी घेऊन डाळिंब फायद्यात आणायचे ठरवले.

कृष्णा अवतरली, पाण्याची चिंता मिटली

डाळिंबाचा लळा लागला. पीक यशस्वी होऊ लागले. मिळणाऱ्या पैशांमधून टप्प्याटप्प्याने शेती खरेदी करण्यास सुरुवात केली. दुष्काळ पचविण्याची ताकद दुष्काळानेच दिली होती. सन २००३ मध्ये दुष्काळ पडला. याच दरम्यान वाणबदल करून भगवा वाणाची रोपे सटाणा (जि. नाशिक) येथून आणली. ऐन दुष्काळात डाळिंबाची रोपे जगविण्याइतपत पाणी होते. पिकाचा अभ्यास झाल्याने फारशा अडचणी आल्या नाहीत. शेती विकत घेतली की त्यात डाळिंब
लागवड हे नित्याचे झाले होते. बाजारातील मागणी आणि दर याचा अभ्यास करत करत हळूहळू डाळिंब लागवडीचे क्षेत्र २२ एकरांपर्यंत पोहोचले. तालुक्यात २०१४ च्या सुमारास टेंभू योजनेचे पाणी आले. त्या आधारे २०१६ मध्ये नऊ किलोमीटरवरून तलावातून पाइपलाइन केली. त्यासाठी ३० लाखांचा खर्च आला. ‘टेंभू’च्या कृपेमुळे कृष्णा अवतरली आणि पाण्याची चिंता मिटली.

तरुण रक्ताकडे जबाबदारी

शरद इंजिनिअर असल्याने त्यांना नोकरी मिळाली असती. पण घरच्या शेतीतच प्रगती करावी असे त्यांना वाटू लागले. मग वडिलांकडे असलेली जबाबदारी तरुण रक्ताच्या शरद यांच्याकडे आली. त्यांनी डाळिंबाची युरोपला निर्यात करण्याच्या दृष्टीने पावले उचलली. ‘रेसिड्यू फ्री’ उत्पादन घेण्याचे धडे ते या क्षेत्रातील अनुभवी विजय मरगळे यांच्याकडून घेऊ लागले. त्यातून व्यवस्थापनात अनेक बदल केले. व्यापाऱ्यांमार्फत दरवर्षी एकूण क्षेत्रातून सुमारे १२० टनांपर्यंत डाळिंब निर्यात होऊ लागली.

सन २०१९ च्या दरम्यान अतिवृष्टी, परतीचा पाऊस, नैसर्गिक आपत्ती यामुळे बागेचे नुकसान झाले. मर, तेलकट डाग रोग, कुजवा, पिन होल बोरर आदींचा प्रादुर्भाव झाला. खर्च वाढला.
हळूहळू जुन्या झालेल्या बागा काढून टाकण्याचा निर्णय घेतला. त्याच शेतात पुन्हा डाळिंब न घेता
उसाची लागवड केली. आजमितीला डाळिंबाचे दहा एकर क्षेत्र असून २०२३ मधील ही नवी लागवड आहे. चार एकरांत शरद किंग वाणाची लागवड होणार आहे. याशिवाय पेरू साडेतीन एकर (पिंक तैवान) असून चिंच एक एकर व ऊस १६ एकर आहे.

शेतीत जपली सकारात्मकता

शरद सांगतात, की डाळिंबाचे एकरी पाच टनांपासून कमाल १४, १५ टनांपर्यंत उत्पादन साध्य केले आहे निर्यातक्षम फळाला किलोला ९० रुपयांपासून कमाल १९० ते २०० रुपयांपर्यंत दर मिळवला आहे. व्यापारी बांधावर येऊन खरेदी करतात. मजुरांविना शेती करण्याचा मुख्य प्रयत्न असतो. जिद्द, चिकाटी ठेवून सकारात्मक विचारांची जोड दिली आहे. काय चुकलं त्याचा अभ्यास करून तशा सुधारणा केल्या जातात. नव्या बागेत १४ बाय १० फूट अशी लागवड आहे. त्यातून हवा खेळती राहण्यासह प्रकाश संश्लेषण होऊन रोगांना काही प्रमाणात अटकाव करणे शक्य होणार आहे. डाळिंब संशोधन केंद्राकडून तेलकट डाग रोग, मर, फळकुजवा आदींविषयी प्रभावी मार्गदर्शन व डाळिंब मूल्यवर्धनासाठी शासनाकडून स्थानिक पातळीवर प्रक्रिया युनिट उभारणीसाठी पाठबळाची अपेक्षा शरद यांनी व्यक्त केली आहे.

शरद पाटील, ९८६०८२४००१, ९४२०७९२१३४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com