Pune News : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांच्या संकल्पनेनुसार राज्यात एकूण १० मधाची गावे करण्याचा मानस आहे. मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील मधाचे गांव संकल्पना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील भोर तालुक्यातील गुहिणी या गावाची निवड करण्यासाठी मधकेंद्र योजनेअंतर्गत जनजागृती शिबिराचे आयोजन शुक्रवारी (ता. १३) करण्यात आले.
जिल्ह्यातील पहिले ‘मधाचे गाव’ म्हणून भोर तालुक्यातील गुहिणी या गावाची निवड होण्याच्यादृष्टीने महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाकडून येथील परिसराची पाहणी करुन भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
महाबळेश्वर मध संचालनालयाचे संचालक डी. आर. पाटील, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस. आर. खरात, वेल्हे येथील तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यास या सामाजिक संस्थेचे व्यवस्थापक रमेश आंबेकर, गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ व मधपाळ उपस्थित होते.
महाबळेश्वर मध संचालनालयाचे संचालक डी. आर. पाटील यांनी मधकेंद्र योजनेची व मधाचे गाव संकल्पना राबविण्याबाबतची माहिती दिली. जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस. आर. खरात यांनी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य विकास योजना, मधकेंद्र योजना, मधाचे गाव या बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमानंतर संचालक श्री. पाटील यांच्या हस्ते येथील जंगल परिसरामध्ये जांभुळ या वनस्पतीचे वृक्षारोपण करण्यात आले.
असे आहे गुहिणी गाव :
गुहिणी गाव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तोरणा, राजगड, मढेघाट परिसराच्या कुशीत वसलेले असून भाटघर धरणाच्या पाठीमागील बाजूस निसर्गाच्या सानिध्यात असलेले एक छोटेसे गाव आहे.
मधमाशा पालनास उपयुक्त जांभुळ, आंबा, कारवी, करवर, अर्जुन, कांदळवन व आखरा आदी वनस्पतींचा फुलोरा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. गावातील सुमारे १५ मधपाळ पारंपरिक पद्धतीने आग्या, सातेरी, फुलोरी पिकळा मध गोळा करतात. विविध प्रकारच्या मधाच्या किमती आठशे ते एक हजार रुपये किलोच्या दरम्यान आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.