Minimum Support Price : हमीभावाबरोबरच हवी खरेदीची हमी

Article by Dr. Madhav Shinde : सरकारने शेतीमालाची किमान आधारभूत किंमत (हमीभाव) जाहीर करून ती अनिवार्य करायला हवी. याशिवाय उत्पादित शेतीमाल खरेदीची हमीही द्यावी; जेणेकरून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल.
Minimum Support Price
Minimum Support PriceAgrowon

डॉ. माधव शिंदे

Indian Agriculture : भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीक्षेत्राचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजही देशातील एकूण रोजगारामध्ये शेतीचा वाटा ४८ टक्के एवढा असून जवळपास ५५ ते ६० टक्के लोकसंख्येचे अर्थकारण शेतीवर अवलंबून आहे. जवळपास १७ टक्के राष्ट्रीय उत्पन्न या क्षेत्रामधून निर्माण होते. त्यादृष्टीने शेतीच्या विकासासाठी आजपर्यंत अनेक योजनाही राबवल्या जात आहेत. असे असले तरी, शेती उत्पादक कायम आर्थिक अडचणीत राहिलेला आहे.

याची कारणे अनेक असली तरी, प्रतिकूल बाजारपेठ हे एक प्रमुख कारण आहे. शेतीमाल बाजारपेठेत किंमत स्थैर्य नसल्याने उत्पादकांनाही आर्थिक स्थैर्य लाभताना दिसत नाही. या प्रतिकूल बाजारपेठेत शेतीमालाला किमतीची तरी हमी मिळावी, या हेतूने सध्या पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश या राज्यातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन उभे केलेले असून त्या आंदोलनाची दाहकता दिल्लीपर्यंत पोहोचल्याचे दिसून येते.

शेतीमाल बाजारपेठेला किमान आधारभूत किमतीचे कायदेशीर बंधन घालण्यात यावे, ही आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने काही प्रस्ताव दिलेले असले तरी, किमान आधारभूत किमतीच्या सक्तीबाबत सरकार अनुकूल नसल्याने हे आंदोलन थांबण्याची शक्यता कमी आहे.

मुळात शेतीमाल बाजारपेठेसाठी किमान आधारभूत किमतीची सक्ती करणे हिताचे नसल्याचे बाजारपेठ अभ्यासकांचे मत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित साधायचे की बाजारपेठेचे? या द्वंद्वामध्ये सर्वसामान्य शेतकरी मात्र पिचला जातोय. असे असले तरी सरकारला एकूण उत्पादनखर्चावर आधारीत शेतीमालाची किमान आधारभूत किंमत जाहीर करून ती अनिवार्य करायला हवी. त्याचबरोबर उत्पादित शेतीमाल खरेदीची तरी हमी द्यावी; जेणेकरून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल.

Minimum Support Price
Food Prices : खाद्यान्न भाववाढीत दडलेय काय?

आपल्या देशामध्ये शेतीमालाचा उत्पादनखर्च ठरवून त्याआधारे किमान आधारभूत किमती निश्चित करण्यासाठी १९६५पासून ‘राष्ट्रीय कृषी खर्च आणि मूल्य आयोग’ कार्यरत आहे. या आयोगाद्वारे जवळपास २३ पिकांच्या किमान आधारभूत किमती जाहीर केल्या जातात. मात्र, ज्या उत्पादनखर्चावर हे भाव निश्चित केले जातात, तो खर्च काढण्याची पद्धतच मुळात सदोष असल्याने जाहीर केली जाणारी किमान आधारभूत किंमत वास्तव उत्पादनखर्च भरून निघण्यास पुरेशी नसल्याचे अनेक अभ्यासकांचे मत आहे. असे असूनही किमान उत्पन्नाची हमी मिळावी, या उद्देशाने तिची सक्ती करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

वास्तविक पाहता शेती उत्पादने ही मूलभूत गरजेची असल्याने त्यांची बाजारपेठ ही नियंत्रित स्वरूपाची आहे. यामध्ये, शेतीमालाची बाजार किमतीने खरेदी करणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्या, खाजगी व्यापारी अशी खुल्या बाजारपेठेची यंत्रणा आहे. तर दुसरीकडे, सरकारी पातळीवर भारतीय खाद्यान्न महामंडळ, राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ, भारतीय कापूस महामंडळ अशा प्रकारची किमान आधारभूत दराने शेतीमाल खरेदी करणारी सरकारी यंत्रणा अस्तित्वात आहे. यांपैकी सरकारी यंत्रणेमार्फत खरेदी केल्या जाणाऱ्या शेतीमालाचे प्रमाण अल्प असून सर्वाधिक शेतीमाल खुल्या बाजारपेठेत विकला जात असल्याने किमान आधारभूत किमतीचे लाभ सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत, हे सत्य आहे.

भारतीय खाद्यान्न महामंडळ आणि सरकारी संस्थांद्वारे केवळ गहू आणि तांदळाची खरेदी करणारी कायमस्वरूपी यंत्रणा अस्तित्वात असली तरी, तिची व्यापकता काही राज्यांपुरतीच मर्यादित असून खरेदी केल्या जाणाऱ्या शेतीमालाचे एकूण उत्पादनाशी असलेले प्रमाणही खूप कमी आहे. २०१४-१५ मध्ये अन्न महामंडळ आणि सरकारी संस्थांद्वारे खरेदी केलेल्या गहू आणि तांदळाचे एकूण उत्पादनाशी असलेले प्रमाण फक्त ३१ टक्के होते. तर २०२२-२३ मध्ये ३०.७ टक्के उत्पादनाची खरेदी केली. याचाच अर्थ उर्वरित ७० टक्के गहू आणि तांदूळ खुल्या बाजारपेठेत विकला गेला जिथे किमान आधारभूत किंमत नसते.

दुसरीकडे, राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ (नाफेड) आणि भारतीय कापूस महामंडळ यासारख्या संस्थांद्वारे कडधान्ये व तेलबिया, कापूस यासारख्या पिकांची खरेदी केली जात असली तरी ती कायमस्वरूपी नसून खरेदी केल्या जाणाऱ्या शेतीमालाचे प्रमाणही अल्प असते. २०१८-१९ आणि २०२१-२२ या वर्षी नाफेडने देशातील तेलबिया आणि कडधान्याच्या एकूण उत्पादनाच्या अनुक्रमे केवळ ५.१ आणि ०.४ टक्के एवढीच खरेदी केल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

Minimum Support Price
Minimum Support Price : शेतकऱ्यांना हवी हमीभावाची गॅरेंटी

0.म्हणजेच उर्वरित शेतीमालाची विक्री बाजारभावानुसार होऊन देशातील असंख्य शेतकऱ्यांना ‘किमान आधारभूत’चा लाभ झाला नसल्याचे स्पष्ट होते. थोडक्यात सरकार शेतीमालाची किमान आधारभूत किंमत जाहीर करीत असले तरी, त्या दराने शेतीमाल खरेदी करण्याचे प्रमाण अल्प असून ठरावीक पिकांव्यतिरिक्त इतर पिकांची खरेदी करण्याची कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नसल्याने जाहीर केल्या जाणाऱ्या आधारभूत किमतीचा देशातील बहुतांश शेतकऱ्यांना लाभ होत नाही.

खरे तर, देशामध्ये शेतीमाल उत्पादनात विविधता असून देशपातळीवर उत्पादन आणि वितरणाचे योग्य नियोजन नसल्याने ना शेतकऱ्यांना लाभ होतो ना ग्राहकांना! त्यामुळे सरकारने आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे आपली यंत्रणा अधिक सक्षम आणि पारदर्शक करत या यंत्रणेद्वारेच शेतीमालाची किमान आधारभूत दराने खरेदी करून देशपातळीवर विक्री आणि वितरणाचे योग्य व्यवस्थापन केल्यास देशभरातील शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही लाभ होण्यास मदत होईल.

थोडक्यात, शेती उत्पादने जीवनावश्यक वर्गात येत असल्याने त्यांच्या किमती नियंत्रणात असाव्यात, असे धोरण असले तरी, कृषी निविष्ठांच्या किमतीसुद्धा नियंत्रणात असाव्यात, असेही धोरण सरकारने स्वीकारलेले होते. त्यानुसार खते, इंधन, औजारे, जलसिंचन साहित्य यासारख्या घटकांवर सरकारद्वारे अनुदाने देऊन त्यांच्या किमती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला जात असे.

त्यामुळे शेती उत्पादनखर्च आटोक्यात ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी मदत होत असे. मात्र गेल्या काही वर्षांपासून सरकारने शेतीसंदर्भातील अनुदाने कमी करण्याचा सपाटा लावल्याने निविष्ठांच्या किमती वाढून उत्पादनखर्चात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळते. त्या तुलनेत शेतीमालाच्या किमती वाढत नसल्याने शेती अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे.

अशा स्थितीत शेती अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सरकारने प्रथम किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यासाठी वास्तव उत्पादनखर्च गृहीत धरणे आवश्यक आहे. तसेच निश्चित केलेली आधारभूत किंमत (हमीभाव) केवळ जाहीर करून चालणार नाही, तर त्याद्वारे शेतीमाल खरेदीचे प्रमाणही वाढवावे लागेल. जेणेकरून त्याचे लाभ देशातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आणि ग्राहकांपर्यंतही पोहोचण्यास मदत होईल.

(लेखक अर्थशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com