River Conservation : सूक्ष्मजीवांनी केले आयाड नदीचे पुनरुज्जीवन

Dying River Revive : अगदी सांडपाण्यामध्ये रूपांतरित झालेल्या या नदीला पुनरुज्जीवित करण्यामध्ये सूक्ष्मजीवांच्या समुदायांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. केवळ तीन महिन्यांत नदी शुद्ध, पुनरुज्जीवित झाली, यावर कुणाचा विश्‍वासच बसत नाही.
Sustainable Water Management
Sustainable Water ManagementAgrowon
Published on
Updated on

Sustainable Water Management : पुणे येथील संदीप आणि सायली जोशी हे दांपत्य विविध प्रकारच्या सूक्ष्मजीव समुच्चयावर  (Bactrial Consortia) काम करते. त्यांनी ग्रीन ब्रीज हे तंत्रज्ञान विकसित केले असून, २००३ मध्ये त्याला पेटंटही मिळाले आहे.

उदयपूर येथील पाणी परिषदेमध्ये नदी सुधाराच्या विविध मॉडेल्समध्ये त्यांच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या उभारणीशिवाय नदीतील पाणी शुद्ध करण्यासंबंधीच्या मॉडेलवर चर्चा झाली. या तंत्राचा एक प्रयोग संदीप यांनी पुणे येथील ‘कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग’ यांच्या विनंतीवरून मुळा नदी सुधारासाठी केला होता.

२००३ मध्ये ‘क्लीन रिव्हर कमिटी’चे प्रबेय सिन्हा व कमिन्स फाउंडेशनचे संजीव जगताप यांच्या सहकार्याने राबवलेल्या या प्रकल्पासाठी सल्ला किंवा आराखडा फी सुद्धा घेतली नव्हती. या सांडपाण्यात त्यांनी सूक्ष्मजीवांची अन्नसाखळी प्रस्थापित केली. सूक्ष्मजीवांच्या अन्नसाखळीमुळे ते पाणी जिवंत केले होते.

जिवंत पाणी म्हणजे पुरेसा ऑक्सिजन असलेले आणि त्यात सर्व प्रकारचे जलचर सुदृढपणे राहू शकणारे पाणी होय. या तंत्रासाठी कोणतेही मोठे बांधकाम, यंत्रे, अवजारे किंवा ऊर्जेची आवश्यकता नसते. सर्वांत महत्त्वाची बाब नियमनासाठी मनुष्यबळही लागत नाही.

Sustainable Water Management
River Revival : जीवरेखा नदीचा नवीन कृती आराखडा तयार करा

...असा मिळवला लोकसहभाग

याच ग्रीन ब्रीज तंत्रज्ञानाचा वापर उदयपूरच्या आयाड नदी व तलाव सुधारासाठी करण्याचा निर्णय झाला. या संकल्पामागे होते ते उदयपूरमधील प्रसिद्ध सर्जन डाॅ. तेज राजदान आणि उद्योगपती सिंघल यांचा. ते खूप आधीपासून नदी स्वच्छतेसाठी झटत होते.

त्यांनी समविचारी लोकांना सोबत घेत उदयपूर झील संरक्षण समिती स्थापन केली. या समितीच्या माध्यमातून संदीप जोशींना उदयपूरला आणण्याचे श्रेयही या दोघांचेच. या कामासाठी लागणाऱ्या निधीसाठी ‘उदयपूर चेंबर ऑफ काॅमर्स’ च्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील अनेक उद्योजक पुढे आले.

तर उदयपूर महानगरपालिकेने आराखडे मंजुरी, नदीतील अतिक्रमणे हटवणे, शासकीय परवानग्या मिळविण्यासाठी मोठी मदत करण्याचे मान्य केले. यथाशक्ती निधीसोबतच कामाच्या स्वरूपात मदतीचे नदीकाठावरील लोकांना आवाहन करण्यात आले. या सर्वांची तळमळ गावकऱ्यांपर्यंत पोचली. त्यामुळे राजघराण्यातील व्यक्तींपासून सामान्य मजुरांपर्यंत, उद्योजक, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी असे अनेकजण स्वयंस्फूर्तीने सामील झाले.

पाण्याला दुर्गंधी का सुटते?

पाण्यात अनेक सूक्ष्मजीव कार्यरत असतात. ते पाण्यात येणाऱ्या विविध सेंद्रिय पदार्थांचे विघटन करतात. विविध प्राण्यांची विष्ठा, मूत्र यात अनेक उपयुक्त सूक्ष्मजीव असतात. ते विघटनाचे काम वेगाने करतात. पण त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक सेंद्रिय पदार्थ सांडपाण्यामध्ये येत राहिल्यास किंवा रासायनिक घटकांमुळे सूक्ष्मजीवांची संख्या कमी झाल्यास त्यांची संपूर्ण अन्नसाखळी नष्ट होते.

या नैसर्गिक अन्नसाखळीमध्ये मित्र जिवाणू, बुरशी, शेवाळ आणि एकपेशीय प्राणी कार्यरत असतात. भक्ष्य आणि भक्षकांच्या संख्येमध्ये एक संतुलन आवश्यक असते. ते जेव्हा बिघडते, तेव्हा पाण्यात येणाऱ्या सेंद्रिय पदार्थांच्या विघटनाची प्रक्रिया अर्धवट होते.

पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. तेव्हा त्यात ऑक्सिजनरहित वातावरणात वाढणारे जिवाणू (अन् एरोबिक बॅक्टेरिया) वाढतात. त्यांच्याकडून विघटनाच्या प्रक्रियेत मिथेनसह अनेक वायू तयार होते. त्यातून पाण्याला दुर्गंधी येऊ लागते.

अर्थशास्त्राला चालना

सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे नदी जिवंत झाल्याने पाण्याची दुर्गंधी गेली. डासांचे प्रमाण कमी झाले. पाण्यावरील फेस तर नावालाही राहिला नाही. आयाड नदीपाठोपाठ उदयपूर तलावातील पाणीही स्वच्छ व शुद्ध होऊ लागले. पाण्याची रासायनिक शुद्धता वा प्रदूषण मोजण्यासाठी वापरली जाणारी मोजपट्टी म्हणजे बी.ओ.डी. आणि सी.ओ.डी. तसेच पाण्याचे जिवंतपणा मोजण्याची मोजपट्टी म्हणजे पाण्यात असलेला प्राणवायू (Dissolved Oxyen). या ग्रीन ब्रिज तंत्रज्ञानाने या वाहत्या पाण्याचा BOD व COD खूप खालच्या पातळीवर येऊन तो जवळजवळ नगण्य झाला. विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाणही आठ एककांपर्यंत आले. सामान्यतः ऑक्सिजनची पाण्यातील पातळी पाचपर्यंत असल्यास जलचरांच्या जगण्यासाठी चांगली मानली जाते.

Sustainable Water Management
Nandini River Revival : नंदिनी नदी पुनरुज्जीवीकरण अभियान

नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची शेती चांगली पिकू लागली. पूर्वी दूषित पाण्यावरील शेतीमाल म्हणून व्यापारी, ग्राहकही तो विकत घेण्यास टाळाटाळ करत असत. पूर्वी दोन दिवसांत सडणारा, खराब होणारा शेतीमाल आता आठ दहा दिवस चांगला टिकू लागला. ग्राहकांची मागणी वाढल्याने शेतकऱ्यांच्या फायद्यातही वाढ झाली.

हरित अर्थव्यवस्थेचे ‘हेल्दी इकोसिस्टीम गिव्हज हेल्दी इकॉनॉमी’ हे तत्त्व सिद्ध झाले. लोकसहभागातून नदी आणि तलावातील जैवविविधता समृद्ध होत गेली. त्या समृद्ध जैवविविधतेने स्थानिक मासेमारांसह अनेकांना रोजगार दिला.

या परस्परांच्या फायद्यांमुळे निसर्गाचे संवर्धन लोकांकडून अधिक काळजीपूर्वक आणि जोमाने होते, हे निश्‍चित. ज्या नदीच्या मासेमारीचे टेंडर फक्त अडीच लाख रुपयांना कसेबसे जात होते. तेच टेंडर पुनरुज्जीवनानंतरच्या पुढच्याच वर्षी चक्क अडीच कोटी रुपयांना गेले. यापेक्षा काय पुरावा हवा तुम्हाला नदी जिवंत होण्याचा...

गेल्या शतकाच्या प्रारंभी अमेरिकेतील हडसन नदी, इंग्लंडमधील थेम्स यासारख्या युरोप अमेरिकेतल्या अनेक नद्या प्रचंड प्रदूषित झालेल्या होत्या. या नद्यांतील ‘ऑडिओ लेव्हल’ प्रचंड कमी (जवळजवळ शून्य) झालेली होती. या नद्या स्वच्छ करण्यासाठी, त्यातील ‘डीओ’ पातळी वाढविण्यासाठी त्या देशातल्या शास्त्रज्ञांना चक्क पाच दशके लागली होती. या पार्श्‍वभूमीवर संदीप जोशींनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानामुळे आयाड नदीचे हे आरोग्य अवघ्या तीन महिन्यात सुधारले. त्यामुळेच संदीप जोशी यांच्या ग्रीन ब्रिज तंत्रज्ञानाचे जगभर कौतुक होते. पुढील लेखामध्ये आपण या तंत्रज्ञानाविषयी सविस्तर माहिती घेऊ.

सूक्ष्मजीवांच्या अन्नसाखळीचे पुनरुज्जीवन महत्त्वाचे...

नदी प्रदूषित होते, ती त्यात सातत्याने येणाऱ्या शहरी सांडपाण्यामुळे, औद्योगिक वसाहतीतून प्रक्रियेविना सोडल्या जाणाऱ्या विषारी पाण्याने. या पाण्यातील सूक्ष्मजिवांची अन्नसाखळी नष्ट झालेली असते. ती पुनरुज्जीवित करून प्रस्थापित करण्याची गरज असते. उदयपूर येथील आयाड नदी आणि तलावात येणाऱ्या सांडपाण्याचा संदीप जोशी यांनी सखोल अभ्यास केला. त्यात कोणते सूक्ष्मजीव समुच्चय सोडायचे, हे ठरवले गेले. त्यानंतर ‘ग्रीन ब्रिज’चे काम करण्यात आले. सूक्ष्मजीवांची संख्या वाढून अन्नसाखळी स्थिरावण्यास चार महिने लागले.

त्यानंतर सर्वप्रथम नदीचे पाणी लाल रंगाचे दिसू लागले. सामान्य लोक तर काय घडतेय, हेच न समजल्याने भांबावून गेले. पण ती नदी जिवंत होत असल्याचेच चिन्ह असल्याचे समजावण्यात आले. हा लाल रंग मॉयना नावाची गुलाबी बुरशी वाढत असल्याने येत होते. ही बुरशी माशांचे आवडते खाद्य आहे. नदीची परिसंस्था जिवंत होत होती. तिच्या उदरात विविध जिवांचा जन्म होत आहे.

सांस्कृतिक अर्थाने मैया, माता म्हटली जाणारी नदी खरोखरच सूक्ष्मजिवांची, अन्य सजीवांची आई होत असताना पाहण्याचा आनंद अद्वितीय असल्याचे जोशी दांपत्य सांगतात. नदीचे पाणी क्रमाक्रमाने शुद्ध होत गेले. पुढील दोन-तीन आठवड्यांतच माशांचे खाद्य उपलब्ध झाल्याने माशांची संख्या वाढत गेली. वाढत्या संख्येसोबतच माशांचा आकारही वाढू लागला. काही आठवड्यांनंतर कासवे, मगरही तिच्या पिलांसह नदीत आली. म्हणजेच सर्वोच्च भक्षक आल्याने नदीची अन्नसाखळी खऱ्या अर्थाने पूर्ण झाली.

- सतीश खाडे , ९८२३०३०२१८,

(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com