Agriculture Advisory: मागील आठवड्यात झालेल्या गारपिटी आणि वादळी पावसानंतर सर्व द्राक्ष विभागामध्ये या आठवड्यात वातावरण शांत राहणार आहे. येत्या आठवड्यातच नाही तर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत द्राक्ष विभागांमध्ये कुठेही पाऊस पडण्याची शक्यता अजिबात दिसत नाही, असेच बहुतेक हवामान तज्ज्ञांचे मत आहे. काही हवामान मॉडेल्स २७ -२८ एप्रिलनंतर पुन्हा काही दिवस पावसाचे वातावरण तयार होण्याची शक्यता वर्तवत आहेत. या पावसाच्या शक्यतेची खात्री मिळविण्यासाठी अजून भरपूर दिवस आहेत. तसे पाहता एप्रिलच्या शेवटी हलका पाऊस झालाच तर तो द्राक्ष बागांसाठी फायद्याचाच होऊ शकेल. .पश्चिमी प्रक्षोभांच्या प्रभावाखाली उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे नाशिक व पुणे भागात बऱ्याच ठिकाणी पहाटेचे तापमान कमी (१२ ते १५ अंश सेल्सिअस) अनुभविण्यास मिळाले. याच अनुषंगाने दुपारचे तापमानसुद्धा ३० अंश सेल्सिअसच्या जवळपास खाली गेले होते. येत्या १० तारखेनंतर वातावरण काही ठिकाणी अधुनमधून जरी ढगाळ राहिले तरी बहुतांश वेळेस आकाश निरभ्र राहील. याचमुळे सर्वच द्राक्ष विभागांमध्ये विशेषतः सांगली, सोलापूर, पंढरपूर भागांत दुपारचे तापमान पुन्हा वाढून ४० अंश किंवा त्याही पुढे जाण्याची शक्यता आहे. म्हणूनच एप्रिलच्या शेवटाला वातावरण ढगाळ झाले तरीही तापमान कमी करण्यासाठी ते फायद्याचे राहील..Grape Orchard Management : नवीन द्राक्ष बागेमध्ये रिकटची पूर्वतयारी.‘स्कायमेट’ने त्यांचा या वर्षाच्या मॉन्सूनचा (दक्षिण - पश्चिम) पहिला अंदाज जारी केला आहे. ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर या वर्षीच्या मॉन्सूनबद्दल सर्व शेतकऱ्याना कुतूहल आणि थोडी धास्ती आहेच. यू-ट्यूब किंवा स्कायमॅटच्या वेबसाइटवर जाऊन हा मॉन्सूनचा अंदाज आणि त्याच्याशी निगडित चर्चा शेतकऱ्यांनी स्वतः ऐकल्यास त्यांच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील. त्याचबरोबर मॉन्सूनबद्दलचे त्यांचे ज्ञान निश्चितच वाढेल. त्यातील काही ठळक बाबी येथे नमूद करत आहे..हा अंदाज जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या चार मॉन्सून महिन्यांचा आहे. भारतामध्ये संपूर्ण वर्षभरात होणाऱ्या पावसाच्या ७० ते ८० टक्के पाऊस या चार महिन्यांत होतो. त्याच बरोबर खरिपातील शेती आणि आपल्या धरणांमध्ये होणारा बहुतांशी पाण्याचा साठा याच पावसावर अवलंबून असतो..या वर्षी मॉन्सूनचा पाऊस सरासरीच्या ९४ टक्के (६ टक्के कमी) राहू शकतो. या अंदाजानुसार तो ८१७ मि.मी. असेल. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, भारताचा वार्षिक सरासरी पाऊस ११६०-१२५० मि.मी. आहे. त्यातील ८६८.६ मि.मी. (दक्षिण पश्चिम) मॉन्सूनमध्ये पडतो. खरे पाहता मागच्या १० वर्षांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असल्याने मागील १० वर्षांच्या दक्षिण- पश्चिम मॉन्सूनच्या पावसाची सरासरी ९०० मि.मी.च्या पुढे आहे. तर मागील ४० वर्षांची ही सरासरी ८१० मि.मी.च्या जवळपास आहे..मॉन्सून ९० टक्क्यांपेक्षा कमी असेल तरच दुष्काळी वर्ष मानले जाते. ९४ टक्के मॉन्सून हा फक्त सामान्यपेक्षा कमी (BELOW NORMAL) मानला जाईल. स्कायमेटच्या अंदाजानुसार, वर्षी भारतात जूनमध्ये १०१ टक्के, जुलैमध्ये ९५ टक्के, ऑगस्टमध्ये ९२ टक्के, तर सप्टेंबरमध्ये ८९ टक्के पाऊस पडणार आहे. ही टक्केवारी या महिन्याच्या स्थापित दीर्घ कालावधींच्या सरासरीवर (LPA -LONG PERIOD AVERAGES) आधारित आहे. हे एलपीए जून ते सप्टेंबर महिन्यांसाठी अनुक्रमे १६५.३, २८०, २५४.९, १६७.९ मि.मी. आहेत..संपूर्ण भारतात मॉन्सून ९४ टक्के असला, तरीही बिहार व उत्तर पूर्वेतील काही भागांत व दक्षिणेकडील काही भागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल. पंजाब व जवळपासच्या भागांत सरासरीपेक्षा फार कमी पाऊस पडेल. उरलेल्या भागांत म्हणजेच महाराष्ट्र आणि द्राक्ष विभाग सामील असून, तिथे सामान्यपेक्षा कमी (BELOW NORMAL) राहण्याची शक्यता आहे..‘एल निनो’ प्रभावित वर्षात इंडियन ओशन डायपोल (IOD) पॉझिटिव्ह असल्यास भारतात चांगला पाऊस होतो. २०१९ मध्ये मिळालेल्या चांगल्या मॉन्सूनचे उदाहरण ताजेच आहे. मार्च महिन्यात मिळालेल्या IODच्या अंदाजाप्रमाणे सध्या IOD उदासीन (न्यूट्रल) आहे. परंतु ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत तो पॉझिटिव्ह होण्याची शक्यता दाखविली जात आहे. म्हणूनच या महिन्यात पाऊस होईल, याची आशा अजून जीवित आहे. IODचा अंदाज पुढील फक्त ४-८ आठवड्यांसाठी खरा ठरतो. म्हणून जून महिन्यानंतर IOD पॉझिटिव्ह होईल असा अंदाज आल्यासच ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पाऊस पडेल असे सांगता येईल..Grape Orchard Management : पावसाळी वातावरणातील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन.रोग - किडीची शक्यतासध्याच्या वातावरणामध्ये छाटणीनंतर कोणत्याही प्रमुख रोगाची शक्यता दिसत नाही. कोणत्याही बुरशीनाशकाच्या फवारणीची आवश्यकता दिसत नाही. मात्र कोरड्या हवेत पिठ्या ढेकूण (मिलीबग) व लाल कोळी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात सुचविल्याप्रमाणे योग्य रणनीती अवलंबून या किडींच्या नियंत्रणासाठी त्यांचा प्रादुर्भाव वाढण्याआधीच करण्याचा प्रयत्न करावा..या वर्षीचा पावसाचा अंदाज पाहिल्यास बुरशीजन्य किंवा जिवाणूजन्य करपा रोगाच्या वाढण्याची शक्यता जूनच्या आधी तरी दिसत नाही. या वर्षी केवडासुद्धा बागेमध्ये जुलैपर्यंत कार्यरत होईल की नाही याबाबत शंका आहे. विशेषतः केवडा ज्या बागेत जानेवारीपासून कार्यरत दिसत नसल्यास तो जुलै महिन्यामध्ये मोठा पाऊस होऊन गेल्यानंतरच कार्यरत होईल. म्हणूनच कुठल्याही परिस्थितीत ताम्रयुक्त बुरशीनाशकांचा वापर करण्याचा विचारसुद्धा मनामध्ये आणू नये. विशेषतः ज्या ताम्रयुक्त बुरशीनाशकांमध्ये कॉपर सल्फेट आहे. .अशी बुरशीनाशके पाने जुनी होऊन त्यात काळोखी येईपर्यंत वापरू नये. कोवळी पाने या बुरशीनाशकातील कॉपर शोषून घेतात. त्याचे झाडांमध्ये वाईट परिणाम होतात. मुख्यतः पाने छोटी राहणे हा त्याचा त्वरित दिसणारा परिणाम होय. सुप्त अवस्थेतील घड छोटे राहणे किंवा घडच तयार न होणे असे टोकाचे परिणामही दिसू शकतात. आपल्या द्राक्ष सल्ल्यामधून आपण वेळोवेळी वातावरणाची माहिती देऊन केवडा आणि करपा कार्यरत केव्हा होईल, याच्या शक्यता सांगणारच आहोत. त्यामुळे सध्या तरी ताम्रयुक्त बुरशीनाशक फवारणी टाळावी..ओलांडा व फुटींना जपा...मागील आठवड्यात छाटणीपूर्व काळात लक्ष केंद्रित करण्याचा काही गोष्टींवर चर्चा केली होती. १० तारखेनंतरच्या उष्ण वातावरणात पानगळ होण्यासाठी आवश्यक पाण्याचा ताण देणे आता शक्य होईल. छाटणी अजून झालेली नसल्यास संपूर्ण पानगळ झाल्यानंतरच छाटणीचा निर्णय घ्यावा. चटणीआधी पाणी देऊन जमिनीत वाफसा आलेला आहे, याची खात्री करावी. या दोन महत्त्वाच्या गोष्टींमुळे छाटणीनंतर लवकर व एकसारखी फूट येणे शक्य होईल. .ज्या भागांमध्ये दुपारचे तापमान ४० अंशांच्या पुढे जाईल व सापेक्ष आर्द्रताही कमी होईल. अशा ठिकाणी छाटणीनंतर नवीन फुटींची काही पाने वाढेपर्यंत दुपारी २ वाजल्यानंतर जमेल तेव्हा ओलांड्यावर पाण्याची फवारणी करून घ्यावी. नवीन फुटी लवकर येण्यास मदत होईल. ओलांडा प्रखर उन्हापासून सुरक्षित होईल. वातावरणात धूळ असल्यास त्याबरोबर वेलींवर लाल कोळी किडीचा प्रादुर्भाव वाढतो. वेलींवर पाणी मारल्यास धूळ कमी झाल्याने लाल कोळींचेही वेळीच नियंत्रण होईल. दुपारचे तापमान ४० अंशांच्या पुढे जाते, अशा वेळी ओलांडा ५५ ते ६० अंश सेल्सिअस इतका गरम झालेला असतो..छाटणीनंतर पहिल्या ४५ दिवसांपर्यंत नवीन फूट चांगली वाढविणे गरजेचे आहे. या नवीन फुटीत अन्नद्रव्यांचा भरपूर साठा उपलब्ध असला पाहिजे. सुरुवातीच्या ४५ दिवसांपर्यंत प्रामुख्याने नत्र व फॉस्फरस उपलब्धता चांगली असणे आवश्यक आहे. मातीमध्ये घातलेल्या शेणखत किंवा इतर सेंद्रिय खतांमध्ये फॉस्फरसयुक्त खते मिसळून द्यावीत. छाटणीनंतरच्या ४५ दिवसांनंतर होणाऱ्या सूक्ष्म फळधारणेसाठी स्फुरदाची उपलब्धता अतिशय आवश्यक आहे..कीडनाशकांच्या शिफारशी लेबल क्लेमप्राप्त किंवा जॉएंट ॲग्रेस्कोप्राप्त आहेत.फवारणीचे प्रमाण हाय व्हॉल्यूम फवारणी पंपासाठीचे आहे.खरेदीवेळी पक्के बिल घ्यावे.बॅन किंवा ़‘रेस्ट्रिक्टेड’ आहे का पाहावे.लेबल क्लेम वाचावेत.पुरेशा ज्ञानाशिवाय रसायने एकमेकांत मिसळू नयेत.रसायनांचा गट तपासावा..पीएचआय, एमआरएल तपासावेत.पेरणी वा लागवडीपूर्वी संबंधित बियाणांवर कोणती बीजप्रक्रिया केलेली आहे, हे तपासूनच पुढील बीजप्रक्रिया करावी.मधमाशी, मित्रकीटकांना हानिकारक कीडनाशकांचा वापर टाळावा. पीक फुलोरा अवस्था लक्षात घेऊन कीडनाशकांचा समंजस वापर करावा.- डॉ. एस. डी. सावंत ९३७१००८६४९ (लेखक राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचेनिवृत्त संचालक आहेत.) .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.