Sangli News : राज्यात द्राक्षाची आगाप फळ छाटणी आटोपली आहे. आगाप फळ छाटणी १५ टक्के म्हणजे सुमारे ६७ हजार एकरांवर झाली आहे. सद्यःस्थिला गोळी घड, पोंगा आणि फुलोरावस्थेत या विविध टप्प्यांवर बागा आहेत. मात्र सतत पडणाऱ्या पावसाचा फटका या बागांना बसला आहे. परिणामी, पाच टक्के गोळी घड जिरण्याची समस्या उद्भवू लागली असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.
राज्यात द्राक्षाचे सुमारे साडेचार लाख एकर क्षेत्र आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्याचा पूर्व भाग, सातारा जिल्ह्यातील फलटण आणि नाशिक जिल्ह्यातील सटाणा, मालेगाव, बागलाण, देवळा आणि चांदवड या तालुक्यांत प्रामुख्याने आगाप फळ छाटणी घेतली जाते. यंदाच्या हंगामात या सांगली, सातारा आणि नाशिक जिल्ह्यांतील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी आगाप फळ छाटणी घेतली आहे. राज्याच्या एकूण क्षेत्रापैकी आगाप फळ छाटणी १५ टक्के म्हणजे ६७ हजार ५०० एकरांवर शेतकऱ्यांनी घेतली आहे.
सद्यःस्थितीला आगाप फळ छाटणी झालेल्या बागा गोळी घड, पोंगा आणि फुलोवस्थेत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. त्याचा फटका या बागेला बसू लागला आहे. परिणामी, घड जिरण्याची समस्या उद्भवू लागली असल्याचे चित्र आहे. तर काही भागात पोगांवस्थेतच कुज होण्यास प्रारंभ झाला आहे. त्यातच नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष घड वाढीच्या विविध टप्प्यांत अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे ६७ हजार ५०० एकरांपैकी पाच टक्के बागा गोळी घड जिरणे, डाऊनी संकटात सापडल्या असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटाच्या चक्रात अडकला आहे.
आजमितीस १५ ते २०टक्क्यांपर्यंत फळ छाटणी
आगाप फळ छाटणी उरकल्यानंतर अंदाजे ३ लाख ८२ हजार ५०० एकरांवरील द्राक्षाची फळ छाटणी सप्टेंबर महिन्यापासून सुरुवात होते. मात्र यंदा राज्यभरात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी फळ छाटणी थांबवली आहे. वास्तविक पाहता वीस दिवस फळ छाटणी लांबणीवर पडली आहे. परंतु या पावसामुळे पानगळ झाली असल्याने शेतकऱ्यांना फळ छाटणी करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. शेतकऱ्यांनी गेल्या आठवड्यापासून फळ छाटणीला सुरुवात केली आहे. आजअखेर सुमारे १५ ते २० टक्क्यांपर्यंत फळ छाटणी झाली आहे.
येत्या पंधरवड्यात फळ छाटणी गती येणार
राज्यभरातील द्राक्ष शिवारात शेतकऱ्यांनी फळ छाटणीचे नियोजन सुरू केले आहे. येत्या पंधरा दिवसांत फळ छाटणीला गती येणार आहे. त्यामुळे ऑक्टोबर अखेर सुमारे ७० टक्के छाटणी पूर्ण होईल. त्यानंतर नोव्हेंबर महिना आणि डिसेंबर महिन्यांत राहिलेल्या भागात फळ छाटणी उरकली जाईल, असे द्राक्ष बागायतदार संघाने सांगितले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.