
प्रा. डॉ. प्रकाश पवार
Modern Welfare State India: स्वातंत्र्य, सामाजिक समता, सामाजिक न्याय, नैतिकता आदी मूल्यविचार हे आधुनिक शासन व्यवहाराचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्ये शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्वात होते. यामुळे त्यांच्या शासन व्यवहाराचा मध्यवर्ती आशय आधुनिक कल्याणकारी राज्य असा घडत गेला.
शिवरायांचे विचार
छत्रपती शाहू महाराजांच्या शासन व्यवहारांचे एक प्रेरणास्थान छत्रपती शिवराय हे होते. शिवरायांनी न्यायावर आधारलेल्या आदर्श समाजाची संकल्पना वस्तुस्थितीमध्ये उतरवली होती. शाहू महाराजांच्या डोळ्यासमोर शिवरायांची न्यायावर आधारलेली आदर्श समाजाची संकल्पना होती. त्यामुळे प्रगत आणि मागास या दोन पैकी मागास घटकाला न्याय देण्याचा विचार त्यांच्या शासन व्यवहारात सातत्याने प्रवाही राहिला. विशेषतः भटके विमुक्त, अनुसूचित जाती, महिला यांचे मानवी हक्क हा त्यांच्या शासन व्यवहाराचा मध्यवर्ती गाभा होता.
सत्यशोधक विचार
छत्रपती शाहू महाराजांच्या शासन व्यवहारामध्ये महात्मा फुले यांची सत्यशोधक विचारसरणी सातत्याने वरचढ ठरत गेलेली दिसते. शाहू महाराजांच्या शासन व्यवहारांमध्ये सर्वधर्मसमभावाचा मुद्दा स्पष्टपणे दिसतो. यामुळे हिंदू समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज, अशा सर्वच समाजाशी व धर्माशी त्यांचे दैनंदिन संबंध सर्वधर्मसमभावाचे होते. परंतु १८९४ पासूनचा त्यांचा सार्वजनिक व्यवहार सर्वधर्मसमभावाच्या पुढे जाऊन सत्यशोधक विचार स्वीकारणारा घडत होता. शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य इत्यादी प्रकारची विषयपत्रिका महात्मा फुलेंपासून प्रेरणा घेऊन शाहू महाराजांनी निश्चित केली होती.
त्यामुळे शाहू महाराज केवळ एखाद्या दुसऱ्या प्रश्नासंदर्भातील शासन व्यवहार करत नव्हते. त्यांच्या शासनव्यवहाराचे खास वैशिष्ट्य समग्र परिवर्तन हे होते. या अर्थाने त्यांनी शासन व्यवहाराची व्यवस्था उभी केली होती. ११ जानेवारी १९११ रोजी कोल्हापुरात सत्यशोधक कार्यकर्त्यांची सभा झाली. त्यांनी ‘श्री शाहू सत्यशोधक समाज’ स्थापन केला. शाहू महाराजांनी या चळवळीला समाजचिकित्सा करण्यासाठी शासनाचा पाठिंबा दिला. तसेच त्या काळातील त्यांच्या शासन व्यवहाराचा आधार सत्यशोधक मूल्यविचार हा होता. दुसऱ्या शब्दात शाहू महाराजांच्या आधुनिक कल्याणकारी राज्याच्या शासन व्यवहाराचे स्रोत व प्रेरणा सत्यशोधक समाजाच्या विचारांमध्ये स्पष्टपणे दिसते.
विज्ञानाच्या मदतीने लोककल्याण
छत्रपती शाहू महाराजांच्या शासन व्यवहाराचे तिसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य विज्ञान हे होते. शाहू महाराजांनी विज्ञानाचे वातावरण तयार केले होते. लोकांच्या दैनंदिन जीवनाशी त्यांनी विज्ञानाचा संबंध जोडला होता. त्यामुळे वैज्ञानिक आणि गैरवैज्ञानिक हा फरक समजून घेऊन शाहू महाराजांनी शासन व्यवहार केला. शाहू महाराजांनी गैरवैज्ञानिक समाजाची चिकित्सा करण्यास पाठिंबा दिला.
शकुन अपशकुन, चेटूक विद्या, गारुडी विद्या, श्रेष्ठ-कनिष्ठता, वर्णभेद, जातीभेद, अशा असंख्य प्रथा गैरवैज्ञानिक पद्धतीच्या होत्या. त्यांनी समाजातील रूढी परंपरा डोळसपणे स्वीकारल्या. त्यामुळे त्यांच्या शासन व्यवहारात विज्ञान हे मानवतावाद या अर्थाने व्यवहार करत होते. त्यांनी राज्यकारभाराचे धोरण देखील वैज्ञानिक पद्धतीने निश्चित केले होते. लोकशाही, निवडणुका, लोकप्रतिनिधी या घडामोडी आधुनिक समाज विज्ञानातील होत्या. शाहू महाराजांनी त्यांच्या शासन व्यवहारात निवडणुका आणि लोकप्रतिनिधींना महत्त्व देण्यास सुरुवात केली. १९२० मध्ये निवडणुका घेऊन नगरपालिका लोकप्रतिनिधींच्या मार्फत त्यांनीच चालविण्याचे स्वातंत्र्य दिले.
याचा आधुनिक विज्ञानातील लोकशाही, निवडणुका, लोकप्रतिनिधी या संकल्पना त्यांनी राबविल्या. त्यांनी त्यांच्या शासन व्यवहारात आधुनिक वैद्यकशास्त्राचाही उपयोग करून घेतला. आजारावर शासकीय उपाय म्हणून त्यांनी वैद्यकशास्त्राचा विकास केला, त्याला पाठिंबा दिला. राज्याचे कृषी- औद्योगिक धोरण त्यांनी विज्ञानावर आधारित निश्चित केले. त्यांनी पन्हाळा येथे चहा- कॉफीची लागवड केली. तसेच त्यांनी कोल्हापूर येथे औद्योगिक वसाहत सुरू केली. याबरोबरच त्यांनी व्यापारालाही पाठिंबा दिला. त्यांनी राधानगरी धरणाचा प्रकल्प आराखडा इंजिनीयरकडून तयार करून घेतला. धरणाचे काम विज्ञानावर आधारित सुरू केले. तसेच त्यांनी समाज कल्याणाची कार्ये विज्ञानाच्या मदतीने केली.
आधुनिक शिक्षण पद्धती
छत्रपती शाहू महाराजांच्या शासन व्यवहाराचे चौथे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आधुनिक शिक्षण पद्धतीला महत्त्वाचे स्थान दिले होते. शाहू महाराजांच्या काळाच्या आधी कोणते शिक्षण द्यावे याबद्दल मोठा वाद उभा राहिला होता. वेदविद्येचे शिक्षण द्यावे कि पाश्चात्य शिक्षण द्यावे हा प्रचंड वादाचा मुद्दा होता. शाहू महाराजांनी या पार्श्वभूमीवर पाश्चात्त्य शिक्षण पद्धतीचा पुरस्कार केला. परंतु त्याबरोबरच त्यांनी परंपरागत शिक्षण पद्धतीतील ज्ञानाच्या स्रोताला पूर्णपणे नकार दिला नाही. त्यामुळे परंपरा आणि आधुनिकता या दोन्हींची सांधेजोड त्यांनी केले.
विशेष म्हणजे त्यांनी तलाठ्यांसाठी शिक्षण पद्धतीचा पुरस्कार केला. त्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली. मुलींसाठी सक्तीचे शिक्षण सुरू केले. वसतीगृह चळवळ त्यांनी शिक्षणासाठी सुरू केली. म्हणजेच थोडक्यात व्यक्तीकडे बहुविविध प्रकारची बुद्धिमत्ता असते. शिक्षणाच्या पद्धतीने व्यक्तीकडील बुद्धिमत्तेचा विकास करता येतो. जातनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष, लिंगभेदनिरपेक्ष पद्धतीने सर्व मानवांमधील बुद्धिमत्तेचा विकास करता येतो. हा प्रकल्प त्यांनी शासन व्यवहाराचा मध्यवर्ती भाग म्हणून राबविला.
या प्रकारच्या शासन व्यवहारामुळे व्यक्तीचा व्यक्तीवर विश्वास निर्माण झाला. त्यांनी शासन व्यवहारात ‘ब्लॅक अँड व्हाईट’ अशा दोन्ही बाजू समजून घेऊन त्यांचा विवेकाने व मानवतावादी दृष्टीने उपयोग केला होता. त्यामुळे त्यांचा शासन व्यवहार डावा की उजवा ठरविण्याऐवजी त्यांचा शासन व्यवहार समतोल आणि मध्यममार्गी होता. तसेच तो विवेकी, धर्मनिरपेक्ष या अर्थाने आधुनिक होता.(लेखक शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र प्रमुख आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.